केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावरील
हल्ला भ्याड व निषेधार्ह - मुख्यमंत्री
मुंबई, दि.24 : केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार यांच्यावर नवी दिल्ली येथे करण्यात आलेला हल्ला भ्याड असून या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एका माथेफिरूने आज श्री. पवार यांच्यावर नवी दिल्लीत अचानक हल्ला केला. याबाबत प्रतिक्रिया देताना श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, श्री. पवार हे केंद्र सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री असून ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रकार सर्वथैव निंदनीय आहे. या तरूणाने गेल्याच आठवड्यात अशाच प्रकारचा राजकीय हल्ला केला होता, अशी माहिती आहे. असे असतानाही त्याच्यावर कारवाई न होता त्याला ज्येष्ठ मंत्र्यांच्या जवळपास पोहचू देणे ही सुरक्षाव्यवस्थेतील एक गंभीर त्रुटी आहे. या हल्लेखोरावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. श्री. पवार यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करून यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांनी या कृत्यामुळे विचलित न होता संयम पाळावा, असेही मी आवाहन करतो.
---0---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा