माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला व्हावा - मुख्यमंत्री
शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११
नवीन विभागीय आयुक्त कार्यालयाची इमारत सुसज्ज, देखणी असली तरी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करुन गतिमान प्रशासन सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पुण्यात विभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलाव, विविध क्रीडांगणाचे व नूतन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यानंतर अल्पबचत भवन मध्ये आयोजित समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
पंधरा कोटी छत्तीस लाख रुपये खर्च करुन विधान भवन परिसरात नवीन विभागीय आयुक्त कार्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे. ऐतिहासिक विधान भवनाच्या मुख्य इमारतीत आयुक्त कार्यालय आहे. १८६४-६५ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. ऐतिहासिक स्वरुप अबाधित ठेवून त्याच बाजूला तशाच स्वरुपाची तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य हरित भारत संकल्पनेनुसार असून कॅल्शियम सिलिकेट विटांचा वापर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला वन मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, महापौर मोहनसिंग राजपाल, जिल्हा परिषद अध्यक्षा सविताताई दगडे, आमदार रमेश बागवे, अपर मुख्य सचिव जे. एस. सहारिया, प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, विभागीय आयुक्त दिलीप बंड, मनपा आयुक्त महेश पाठक, जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
नवीन इमारतीमुळे लोकांची सोय झाली असली तरी, लोकाभिमुख प्रशासन देण्याबरोबरच गतिमान व पारदर्शक पद्धतीने काम करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, झालेला बदल सर्व सामान्यांना दिसले पाहिजे. यापुढे ई-ऑफीस संकल्पना राबवून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फाईलीचा वापर करण्याचा मानस आहे. ई-प्रशासनाचा वापर केला तर निश्चित गती मिळते. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी सुरुवातीस विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. सध्याच्या युगात सर्वत्र आधुनिक तंत्राचा वापर होत आहे. महसूल विभागातर्फे स्वर्णजयंती राजस्व अभियान राबविण्यात येत असून याचा उपयोग ई-प्रशासनात होण्याची आवश्यकता आहे.
काही जिल्हाधिकाऱ्यांनी नवनवीन योजना राबविल्या. त्याचा एकत्रितपणे उपयोग केला जात आहे. १९२० नंतर पहिल्यांदा शेत जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकरी हा महत्वाचा घटक असून आरोग्याच्या दृष्टीने राजीव गांधी जीवनदायी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. भविष्यात गतिमान प्रशासन राबविण्याचा आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा महसूल विभाग प्रयत्न करील अशी ग्वाही दिली.
यावेळी वन, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील , महापौर मोहनसिंग राजपाल, मदत व पुर्नवसन विभागाचे अपर मुख्य सचिव जे. एस. सहारिया, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची भाषणे झाली.
पुणे विभागीय आपत्ती व्यवस्थापन प्रणालीच्या वेबसाईटचे व पुणे स्लम ऍ़टलस या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच वास्तू विशारद अंजली कलमदानी व किरण कलमदानी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक भाषणात विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली, उपस्थिताचे आभार जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मानले.
येरवडा येथील सुमारे १३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलाव व विविध क्रिडांगणांचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, क्रीडा आयुक्त शिरीष कारले, विभागीय आयुक्त दिलीप बंड, क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, जिल्हाधिकारी विकास देशमुख, क्रीडा विभागाचे उपसंचालक आनंद व्यंकेश्वर तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निश्चित करण्याच्या योजनेनुसार पुण्यात येरवडा येथे १३ कोटी रुपये खर्च करुन विभागीय क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, लॉन टेनिस आणि बास्केट बॉल क्रीडांगण आदी सुविधाचे उद्घाटन यावेळी मुख्यमंत्री श्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. क्रीडा आयुक्त शिरीष कारले यांनी मुख्यमंत्री व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाहणी करुन काही उपयुक्त सूचना केल्या. उपस्थित युवा खेळाडूंची ओळख करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा