मार्च 2012 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता चाचणीतून
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वगळावे
--------------
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे विनंती
मुंबई, दि.22 : मार्च 2012 मध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता चाचणीमधून महाराष्ट्राला वगळावे आणि राज्यातील विद्यार्थ्यांचा 2013 पासून होणाऱ्या चाचणीच्या वेळी समावेश व्हावा अशी विनंती पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री गुलाम नबी आझाद यांना एका पत्रान्वये केली आहे.
बारावीतील विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रात काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
मुख्यमंत्री या पत्रात म्हणतात की, राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी (NEET) सीबीएसईने जाहीर केलेला अभ्यासक्रम हा राज्याच्या मंडळापेक्षा निराळा आहे आणि अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थ्यांना कळविण्यास खूप उशीर झाला आहे. राज्यातील वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राज्य पातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षा ही मराठी, इंग्रजी आणि उर्दूतून होते तर राष्ट्रीय पात्रता चाचणी 2012 ही केवळ इंग्रजी आणि हिंदी या भाषेतूनच घेतली जाणार आहे यामुळे मराठी आणि उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.
दोन परिक्षांच्या आयोजनात तफावत
सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने केंद्र शासन मेडिकल कौन्सिलला राष्ट्रीय पात्रता चाचणी (पदवीपूर्व आणि पदव्युत्तर) घेण्यासंदर्भात निर्देश देणार आहे. मेडिकल कौन्सिलकडून मिळालेल्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी 2012 मध्ये तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ती 2013 यावर्षी होणार आहे. त्यामुळे दोन्ही परिक्षांच्या आयोजनामध्ये तफावत पडणार आहे.
राज्य मंडळाच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठीचा राष्ट्रीय पात्रता चाचणीचा सध्याच्या अभ्यासक्रम सीबीएसई अभ्यासक्रमापेक्षा निराळा असल्यामुळे अशा 80 टक्के विद्यार्थ्यांवर अन्याय होईल आणि केवळ 15 ते 20 टक्के सीबीएसई विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल.
राष्ट्रीय पात्रता चाचणीचा उद्देश परिक्षांची संख्या कमी करणे हा आहे. राज्याची सामायिक प्रवेश परीक्षा ही वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, परिचारक तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येते. राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश चाचणी घेण्यामुळे राज्याची प्रवेश परीक्षा घेणे टळणार नाही. राष्ट्रीय परीक्षेमध्ये गणिताचा विषय नसल्यामुळे अभियांत्रिकी प्रवेश या चाचणीमार्फत होऊ शकणार नाही. राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी एनसीईआरटी आणि राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार अभियांत्रिकी आणि इतर परिक्षांच्या दृष्टीने तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण येण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री या पत्रात म्हणतात.
--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा