रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अणुवीज निर्मितीकडे
वळण्याशिवाय कोणताही पर्याय नाही : मुख्यमंत्री
मुंबई, दि. २७ : अणुऊर्जा हा ऊर्जेचा सुरक्षित, पर्यावरणानुकुल आणि शाश्वत स्त्रोत असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अणुवीज निर्मितीकडे वळण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही, असे स्पष्ट व परखड प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या श्री. राजा पटवर्धन लिखित ‘जैतापूरचे अणुमंथन’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी श्री. चव्हाण यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे एका समारंभात झाले, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार व ‘दिव्य मराठी’चे संपादक कुमार केतकर, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रकल्प संचालक संदीप सिंघाराम, लेखक राजा पटवर्धन, ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते.
श्री. चव्हाण यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने जागतिक इंधन समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि एकंदरच अणुऊर्जा प्रकल्पांच्या अपरिहार्यतेबद्दल स्पष्टोक्ती केली. मुख्यमंत्री म्हणाले की, माझी वैयक्तिक पार्श्वभूमी अभियांत्रिकीची आहे. माझ्याकडे २००४ साली पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी  पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्री पदाबरोबरच  अंतरिक्ष विज्ञान आणि अणुऊर्जा खात्याचा स्वतंत्र कार्यभार दिला, तेव्हापासून माझा या विषयाशी संपर्क आला. त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष असलेले डॉ. अनिल काकोडकर आणि अनेक ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञांकडुन आपल्याला याबाबतचे एक प्रकारचे प्रशिक्षणच मिळाले. मीसुद्धा वैयक्तिक आवड आणि खात्याची जबाबदारी म्हणुन या विषयात खोलपणे शिरलो.  देशातील सर्व अणुऊर्जा प्रकल्पांना मी भेट दिली. कदाचित अणुऊर्जेची एवढी सखोल माहिती घेतलेला आणि जास्तीत जास्त अणुऊर्जा प्रकल्पांना भेट देणारा मी देशातील एकमेव राजकीय नेता असेन.
या पार्श्वभूमीनंतर मुख्यमंत्र्यांनी जैविक इंधनाच्या साठ्यांबद्दल जागतिक आणि राष्ट्रीय वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अभावी आपण सद्या एकुण गरजेच्या ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात अतिशय अमूल्य असे परकीय चलन खर्चुन करतो. ही गरज सतत वाढत असुन येत्या ४ वर्षात ती ९० टक्क्यांपर्यंत जाईल. विजेच्या  बाबतीतही अशीच अवस्था आहे. सद्या आपल्या देशात एकुण विजनिर्मितीपैकी ६८ टक्के विज कोळशापासुन बनते. जलविद्युतचे प्रमाण १७ टक्के आहे. सौर, पवन अशा अन्य मार्गांद्वारे १२ टक्के विज उपलब्ध होते. अणुऊर्जेचे प्रमाण फक्त २.१२ टक्के आहे. कोळशाचे साठे झपाट्याने संपत आहेत. देशांतर्गत कोळशाचा दर्जा फारसा चांगला नाही. त्यामुळे आयातीवर अवलंबुन रहावे लागते.
अशा स्थितीत देशाची ऊर्जेची गरज भागवून विकास साधायचा असेल, तर अणुऊर्जेसारख्या शाश्वत उर्जास्त्रोताला कोणताही पर्याय नाही. यामुळेच केंद्र सरकारने याकडे वळण्याचे ठरवले. जैतापूर प्रकल्पाची सुरुवात आजकालची नाही. केंद्राने यासाठी नेमलेल्या साईट सिलेक्शन कमिटीने जैतापूरची जागा प्रकल्पासाठी अतिशय योग्य असल्याचा अहवाल दिला होता. सर्व प्रकारची काळजी घेऊनच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला झालेला विरोध हा कोणतीही शास्त्रीय माहिती न घेता राजकीय स्तरावर झालेला विरोध होता. मात्र उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आंदोलकांबरोबर प्रदीर्घ चर्चा करुन त्यांच्याशी समन्वय साधला. त्यांचे हे योगदान अतिशय महत्वाचे आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.

प्रकल्पग्रस्तांशी महत्वाच्या वाटाघाटी करुन या प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्यात महत्वाचा वाटा उचललेले उद्योगमंत्री नारायण राणे यांचेही तडाखेबंद भाषण झाले. ते म्हणाले की, देशाच्याआणि राज्याच्या प्रगतीसाठी विज अत्यावश्यक आहे. मात्र हे माहित असुनही केवळ राजकीय स्वार्थासाठी या प्रकल्पाला विरोध झाला. अणुऊर्जेबद्दल कोणतीही शास्त्रीय माहिती न घेता हा विरोध केवळ राजकीय कारणांसाठी झाला. या प्रकल्पाबद्दल जाणुनबुजुन अपसमज निर्माण करण्यात आले. अशा परिस्थितीत श्री. राजा पटवर्धन यांनी  अतिशय शास्त्रीय दृष्टीकोनातून लिहिलेले हे पुस्तक विरोधकांचे पितळ उघडे पाडणारे आहे.
अशा प्रकारचे विकासाचे प्रकल्प आले की त्यांना विरोध करण्यासाठी ठराविक माणसेच पुढे येतात. काही परकीय देशांचे धोरण राबविण्यासाठी हे लोक  विकासाच्या मुळावर येतात. यामुळेच श्री. पटवर्धन यांचे कार्य हे राष्ट्रहिताचे असुन त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असे श्री. राणे म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले की,  हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचे वैज्ञानिक आत्मचरित्रच आहे. कारण लेखक श्री. पटवर्धन हे जैतापूरचे भूमिपूत्र असून स्वत: प्रकल्पग्रस्त आहेत. या प्रकल्पाला काही विशिष्ट लोकांकडुन झालेला विरोध हा राजकीय स्वरुपाचा आणि श्री. राणे यांच्या वैयक्तिक विरोधातील होता. त्याला कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाची किंवा तात्विक जोड नव्हती. मात्र श्री. पटवर्धन यांनी अतिशय कठीण विषय सोप्या शब्दात मांडुन हे पुस्तक लिहुन राष्ट्रीय विकासात मोठे योगदान दिले आहे.
पुस्तकाचे लेखक राजा पटवर्धन यांनीही यावेळी आपले मनोगत सविस्तरपणे मांडले व पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली. श्री. सिंघाराम यांचेही भाषण झाले. श्री. भिडे यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.
                            ०००००




शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

दिवाळी अंक २०१३ साठी जाहिरात
ज्या दिवाळी अंकांना जाहिरात मंजूर झाली, असे मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने किंवा माहिती व जनसंपर्क विभागाने कळविले असेल, अशांनी ही जाहिरात उतरवुन घ्यावी व प्रसिद्ध करावी. माहिती व जनसंपर्क विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. जाहिरात वितरण आदेश माहिती व जनसंपर्क कक्षाच्या जाहिरात विभागाकडुन प्राप्त करुन घ्यावा. (जाहिरात उतरवुन घेण्यासाठी तिच्यावर उजवी क्लिक करुन 'save image as' हा ऑप्शन स्वीकारुन जाहिरात आपल्या संगणकावर सेव्ह करावी.) जाहिरातीचा आकार लोकराज्य मासिक आकाराचे पूर्ण पान असा आहे.

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१३


देशाने गोल्डन व्हॉईस गमावला :मुख्यमंत्री
मुंबई, दि. 24: अनेक भारतीय भाषांमधील गाणी गाऊन भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या मन्ना डे यांच्या निधनाने देशाने गोल्डन व्हाईस गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
‘तमन्ना’ या चित्रपटाच्या माध्यमातून 1942 साली पार्श्वसंगीत क्षेत्रात पदार्पण केलेल्या मन्ना डे यांनी 400हुन अधिक गाणी म्हटली. केवळ हिंदीच नव्हे तर मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम तसेच कन्नड, गुजराथी, कोकणी अशा अनेक भाषांमधून गाणी गाऊन संगीताला कुठलीही सीमारेषा नसते हे त्यांनी सिध्द केले. त्यांची अनेक गाणी इतकी लोकप्रिय झाली आहेत की, ती आजही सहजपणे आठवतात.
 कमी वयात गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करून अनेक वर्षे सिनेरसिकांच्या मनावर राज्य केलेल्या मन्ना डे यांनी पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके असे अनेक सर्वोच्च पुरस्कार मिळविले होते, यातच त्यांची महानता लक्षात येते.  त्यांच्या निधनाने एक चतुरस्त्र गायक आपण गमावला असला तरी त्यांच्या सुमधुर गाण्यांमधून ते कायम आपल्यातच राहतील, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

0000000




सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

डॉ. महेमुदूर रहमान अभ्यास गटाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
मुंबई, दि. 21 : राज्यातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या कारणांचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटाचा अहवाल अभ्यास गटाचे अध्यक्ष डॉ. महेमुदूर रहमान यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केला. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव टी. एफ. थेक्केकारा उपस्थित होत्या.
राज्य शासनाने मे 2008 मध्ये हा अभ्यासगट नियुक्त केला होता. केंद्र शासनाचे निवृत्त सचिव व अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. महेमुदूर रहमान या अभ्यास गटाचे अध्यक्ष आहेत. अभ्यास गटात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ. अब्दुल शबान, औरंगाबादच्या सर सैय्यद कॉलेजचे माजी प्राचार्य प्रो. मोहंमद तिलावत अली, निर्मला निकेतनच्या उपप्राचार्य डॉ. फरीदा लांबे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रा. डॉ. राणू जैन, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रा. विभूती पटेल आणि डॉ. विणा पुनाचा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता.
या अभ्यास गटाने मुस्लिम समाजातील युवकांचे शासकीय नोकऱ्यांमधील प्रमाण, दलित मुस्लिमांचे प्रश्न, वक्फ मंडळाच्या जागा तसेच मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांचा सखोल अभ्यास केला. अभ्यासाअंती तयार झालेला अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर केला.

00000


शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

पंतप्रधान ग्राम सडक योजनेखाली राज्यात
354 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी
केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई, दि. 19 : राज्याच्या विविध भागातील 105 रस्त्यांची कामे आणि 29 पुलांची कामे अशा 354 कोटी रुपयांच्या कामांना पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मंजुरी दिल्याचे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री            श्री. जयराम रमेश यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज पत्राद्वारे कळविले आहे.  639 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या या कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेंतर्गत छोटी खेडी आणि वस्त्या मुख्य रस्त्यांना जोडल्या जातात.  नव्याने मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमुळे 10 जिल्ह्यांतील 30 वस्त्या मुख्य रस्त्यांना जोडल्या जाणार आहेत.  पंतप्रधान ग्राम सडक योजना-टप्पा 2 मध्ये महाराष्ट्राला 2 हजार 620 कि. मी. चे रस्ते मंजूर केले जाणार आहेत.  यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावेत म्हणजे त्यांना नोव्हेंबर 2013 पर्यंत मंजुरी देणे शक्य होईल असे श्री.रमेश यांनी म्हटले आहे. 
केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांनी मंजुरी दिलेली कामे खालील प्रमाणे आहेत :-

अ.क्र.
जिल्हा
रस्त्यांची कामे
लांबी (कि. मी.)
किंमत (रु.कोटी)

रस्त्यांची कामे
1
अहमदनगर
21
49
24
2
अमरावती
16
56
22
3
चंद्रपूर
8
82
45
4
जळगाव
6
42
18
5
नांदेड
4
48
16
6
नंदूरबार
7
131
92
7
नाशिक
13
45
25
8
पुणे
16
89
40
9
ठाणे
6
15
8
10
यवतमाळ
8
82
35

पूल
1
अमरावती
1
30 मिटर
0.63
2
भंडारा
8
210 मिटर
6.01
3
गोंदिया
13
430 मिटर
16.95
4
नाशिक
2
86 मिटर
1.55
5
ठाणे
1
24 मिटर
0.38
6
यवतमाळ
4
166 मिटर
3.29

                                                              -----0---

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

महाराष्ट्राला करमणूक क्षेत्रातील प्राईम डेस्टीनेशन बनवू
- मुख्यमंत्री
          मुंबई, दि. 18:- बॉलिवूडच्या रुपाने देशातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग मुंबईत विकसित झाला आहे. यापुढील काळात चित्रपटसृष्टीसाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधांची उपलब्धता करुन महाराष्ट्राला करमणूक क्षेत्रातील एक प्राईम डेस्टिनेशन बनविले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
          मुंबई ॲकॅडमी ऑफ मुव्हींग इमेजेस (मामी) यांच्यावतीने आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहयोगाने आयोजित 15 व्या मुंबई चित्रपट महोत्सवाचा काल सायंकाळी येथील लिबर्टी सिनेमागृहात श्री. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात  आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
          यावेळी मामीचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, उद्योगपती अनिल अंबानी, टिना अंबानी, महोत्सवाचे संचालक श्रीनिवासन नारायणन, चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, कोंकणा सेन-शर्मा यांच्यासह देश-विदेशातील चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रपट अभिनेते दिग्दर्शक कमल हासन यांना भारतीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्रेंच चित्रपट निर्माते कोस्टा गावराज यांना श्री. बेनेगल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
          मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील चित्रपट उद्योगाचे प्रमुख केंद्रस्थान आहे. हे लक्षात घेऊन चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत व्यापक प्रयत्न केले जातात. करमणूक कर, मुद्रांक शुल्क आदींबाबत चित्रपट उद्योगाच्या शासनाकडे काही मागण्या आहेत. याबाबतीत लवकरच मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्रेंच चित्रपट निर्माते कोस्टा गावराज यांनी राजकारणावर आधारीत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. महाविद्यालयीन जीवनात आपण त्यांच्या चित्रपटांचे चाहते होतो, असे ते म्हणाले. कमल हासन यांनी भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अनमोल योगदान दिले आहे, असे गौरवोद्गारही श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
          याप्रसंगी श्री. बेनेगल, श्री. गावराज, श्री. हासन यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. 'द बटलर' या इंग्रजी चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

                                                * * * *


गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३

कुंभमेळ्यासाठी 2,380 कोटी रूपये खर्चाच्या आराखड्याला मान्यता
पायाभूत सुविधांची कामे 31 मार्च 2015 पूर्वी पूर्ण करावीत
-         मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, दि. 17 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जुलै-ऑगस्ट 2015 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेली पायाभूत सुविधांची सर्व कामे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून 31 मार्च 2015 पूर्वी पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले. या कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित केलेल्या दोन हजार 380 कोटी रूपयांच्या खर्चाच्या आराखड्याला मान्यताही देण्यात आली. ज्येष्‍ठ मंत्र्यांच्या समावेश असलेले एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेणार असून केंद्र सरकारने यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणार आहे.
कुंभमेळा आयोजनासाठी नेमलेल्या शिखर समितीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री आर. आर. पाटील, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, खासदार समीर भुजबळ, खासदार प्रतापराव सोनवणे, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, पोलिस महासंचालक संजीव दयाळ, महंत भक्तचरणदासजी, महंत संविधानंद सरस्वती, महंत शंकरानंद सरस्वती, महंत केशवपूरीजी, महंत पिनाकेश्वर गिरीजी, महंत उदयगिरीजी, महंत नारायणदासजी, नाशिक पुरोहित संघाचे प्रमुख सतीश शुक्ल, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे तसेच विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सादरीकरण करून 2015-16 वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची तपशीलवार माहिती दिली. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन व नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे यापूर्वीचा मेळा 2003-04 मध्ये झाला होता. नाशिक येथे वैष्णव पंथाचे तीन आखाडे असून त्र्यंबकेश्वर येथे शैव पंताचे दहा आखाडे आहेत. 2003 साली झालेल्या कुंभमेळ्यात एक ते दीड लाख साधू आणि 50 ते 60 लाख भाविकांनी हजेरी लावली होती. यावर्षी साधू व भाविक मिळून एक कोटी लोक कुंभमेळ्यासाठी येतील, असा अंदाज आहे. या दृष्टीने शाही स्नान परिसरातील कामे, पाणीपुरवठा योजना, रस्ते व पूल, मलनिस्सारण, कायमस्वरूपी शौचालये, विद्युत व्यवस्था आदी सोयी सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी करावी लागणार आहे. साधूग्रामची उभारणी करण्याबाबत तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमांबाबत शैव आणि वैष्णव आखाडे आणि प्रशासन यांचा समन्वय ठेवण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
कुंभमेळ्याचा कार्यक्रम जाहिर
अखिल भारतीय आखाडा परिषद आणि पुरोहित संघाने 2015-16 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा पुढीलप्रमाणे जाहिर केल्या आहेत. ध्वजपर्व प्रारंभ-14 जुलै 2015, आखाडा ध्वजारोहण 19 ऑगस्ट 2015, ध्वजपर्व शेवट – 11 ऑगस्ट 2016. तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पहिले शाही स्नान 29 ऑगस्ट 2015 रोजी, दुसरे शाही स्नान 13 सप्टेंबर 2015 रोजी तर तिसरे शाही स्नान 25 सप्टेंबर 2015 रोजी होणार आहे. 
बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कुंभमेळ्याचे आयोजन आणि व्यवस्थापन ही राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. अत्यंत कमी जागेमध्ये दाटीवाटीच्या शहरात हे आयोजन करावयाचे आहे. मेळ्याला येणाऱ्या भाविकांची आणि साधूमहंतांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. या सर्वांसाठी पुरेशा आवश्यक तात्पुरत्या व कायम स्वरूपी सुविधा उभारणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी साधूग्रामसाठी जागा आरक्षण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांच्या हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. शाही मार्गांचे रूंदीकरण करण्यासंदर्भात विशेष बैठक बोलाविली जाईल. या मार्गातील अतिक्रमणे काढणे अत्यंत अवघड विषय असून राजकीय मतैक्य आवश्यक आहे. यासंदर्भात मी स्वत: महिनाभरात नाशिकचे पालकमंत्री श्री. छगन भुजबळ आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या समवेत नाशिक येथे भेट देऊन सर्व ठिकाणांची पाहणी करणार आहे, असेही श्री. चव्हाण यांनी जाहिर केले. 
पंतप्रधानांना भेटणार
आपण येत्या शनिवारी नवी दिल्ली येथे जात असून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची वेळ मागितली आहे. ही भेट झाली तर या संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचे पत्र त्यांना देऊन केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी देण्याची विनंती करणार आहे. त्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवालासह अंतिम प्रस्ताव तयार करून तो घेऊन ज्येष्ठ मंत्र्यांसमवेत पुन्हा पंतप्रधानांना भेटणार आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले. तात्पुरत्या कामावर निधी खर्च करण्यापेक्षा कायमस्वरूपी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. नाशिक महानगर पालिकेने पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी पाठविलेला कर्जप्रस्ताव मंजूर करण्यास कोणतीही अडचण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राधान्यक्रम ठरवा – भुजबळ
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मी आतापर्यंत यासंदर्भात तीन-चार बैठका घेतल्या असून कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने करून त्यासाठीचा निधी अर्थसंकल्पीय करून घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. दोन वर्षे आधीच काम सुरू केल्याने सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला. सध्या विविध रस्त्यांची 181 कोटी खर्चाची कामे सुरू असून 380 कोटींची कामे निविदास्तरावर आहेत. विविध खात्यांच्या मंत्री महोदयांना पत्र लिहून आपण त्यांना संबंधीत खात्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही विनंती केली आहे, असे ते म्हणाले.
शाही स्नानाची कुंडे आणि गोदावरी नदी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे, यासाठी पाणी शुद्धीकरणाचाही प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आराखड्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी महानगरपालिका-जिल्हा व मंत्रालय अशा तीन पातळ्यांवर कामे झाली पाहिजेत, असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, साधू महंत या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. काटेकोर नियोजन आणि कालबद्ध अंमलबजावणी करून आम्ही कुंभमेळ्याचे शिस्तबंध नियोजन करण्यात यशस्वी होऊ, असा निर्धार श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला.
कार्यक्षम अधिकारी नेमावेत -  आर. आर. पाटील
गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले की, यावेळच्या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे. यासाठी नीट अंदाज घेऊन नियोजन केले पाहिजे. सर्व विभागामध्ये कार्यक्षम अधिकारी नेमण्याचा व कुंभमेळा संपेपर्यंत त्यांची बदली न करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी, शनीशिंगणापूर आणि तिर्थस्थळांना भेटी देतात. त्यामुळे अन्य तिर्थस्थळांचा वाहतूक आराखडा बनवावा. भीमाशंकर, घृष्‍णेश्वर याठिकाणीही पायाभूत सुविधांची उभारणी करावी. नाशिक येथील दाटीवाटीची व कमी जागा, होणारी गर्दी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन चोख बंदोबस्‍त ठेवण्यात येईल, असे ते म्हणाले.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कामांचे वेळापत्रकानुसार पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार समीर भुजबळ, खासदार प्रतापराव सोनवणे, आमदार सर्वश्री हेमंत टकले, जयप्रकाश छाजेड, प्रशांत हिरे, वसंत गिते, उत्तमराव ढिकले, बबनराव घोलप, माणिकराव कोकाटे, नितीन भोसले, श्रीमती निर्मला गावित यांनी अत्यंत मौलिक सूचना केल्या.
नाशिकचे महापौर यतीन वाघ, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष योगेश तुंगार, नाशिकच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिकरे, बैरागी संघटनेचे डॉ. प्रमोद बैरागी यांनीही चर्चेत भाग घेतला.

00000

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

राजकारण आणि समाजकारण यांचा अनोखा मेळ साधणारे
श्री. मोहन धारिया हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 14 ऑक्टोबर :  राजकारण आणि समाजकारण यांचा अनोखा मेळ साधणारे श्री. मोहन धारिया हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व होते. समाजाच्या विविध क्षेत्रात वावरताना त्यांनी मिळविलेले अजातशत्रुत्व हेच त्यांच्या कार्याचे खरे मूल्यमापन होय. वनराई च्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात श्री. चव्हाण म्हणतात की, स्वातंत्र्यपूर्व काळातील एक महत्वाचा दुवा श्री. धारिया यांच्या निधनाने निखळला आहे. विद्यार्थीदशेत वयाच्या अठराव्या वर्षी मुरुडच्या नबाबाविरुध्द आंदोलन छेडणाऱ्या धारिया यांची आंदोलन आणि चळवळीशी असलेली नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. विशेष म्हणजे जुन्या काळातील असूनही त्यांनी आधुनिक काळाबरोबर चालून नव्या पिढीशीही उत्तम प्रकारचे नाते निर्माण केले. त्यांच्या कार्यकर्ता परिवारातील युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ हे याचीच साक्ष देते.
पाण्याचे संकट त्यांनी आधीच ओळखले आणि त्यातून वनराई चळवळ जन्माला आली. केवळ सरकारवर अवलंबून न राहता विकासकामांमध्ये समाजाचा सहभागही महत्वाचा असतो, हे त्यांनी कृतीमधून दाखवून दिले. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय मंत्री पदापर्यंत झेप घेतली तरी ते राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात जास्त रमले. या दोन्हींचा त्यांनी साधलेला समतोल हे त्यांचे वैशिष्टय होते.
तरूण तुर्क अशी स्वत:ची ओळख त्यांनी काँग्रेस पक्षात तयार केली होती.
श्री. धारिया यांच्यासारखे मनमिळाऊ, अजातशत्रू नेतृत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

0000000