महाराष्ट्राला
करमणूक क्षेत्रातील प्राईम डेस्टीनेशन बनवू
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 18:- बॉलिवूडच्या रुपाने देशातील
सर्वात मोठा चित्रपट उद्योग मुंबईत विकसित झाला आहे. यापुढील काळात
चित्रपटसृष्टीसाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधांची उपलब्धता करुन महाराष्ट्राला
करमणूक क्षेत्रातील एक प्राईम डेस्टिनेशन बनविले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत
बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई ॲकॅडमी ऑफ मुव्हींग इमेजेस (मामी) यांच्यावतीने आणि
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहयोगाने आयोजित 15 व्या मुंबई
चित्रपट महोत्सवाचा काल सायंकाळी येथील लिबर्टी सिनेमागृहात श्री. चव्हाण यांच्या
प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला,
त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मामीचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम
बेनेगल, उद्योगपती अनिल अंबानी, टिना अंबानी, महोत्सवाचे संचालक श्रीनिवासन
नारायणन, चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, कोंकणा सेन-शर्मा यांच्यासह
देश-विदेशातील चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी
मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रपट अभिनेते दिग्दर्शक कमल
हासन यांना भारतीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय
ख्यातीचे फ्रेंच चित्रपट निर्माते कोस्टा गावराज यांना श्री. बेनेगल यांच्या हस्ते
आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील
चित्रपट उद्योगाचे प्रमुख केंद्रस्थान आहे. हे लक्षात घेऊन चित्रपट उद्योगाला
प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत व्यापक प्रयत्न केले जातात. करमणूक कर,
मुद्रांक शुल्क आदींबाबत चित्रपट उद्योगाच्या शासनाकडे काही मागण्या आहेत.
याबाबतीत लवकरच मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्रेंच
चित्रपट निर्माते कोस्टा गावराज यांनी राजकारणावर आधारीत अनेक चित्रपटांची
निर्मिती केली. महाविद्यालयीन जीवनात आपण त्यांच्या चित्रपटांचे चाहते होतो, असे
ते म्हणाले. कमल हासन यांनी भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अनमोल योगदान दिले आहे, असे
गौरवोद्गारही श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी श्री. बेनेगल, श्री. गावराज, श्री. हासन यांनीही
आपल्या भावना व्यक्त केल्या. 'द बटलर' या इंग्रजी चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ
करण्यात आला.
* * * *
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा