कुंभमेळ्यासाठी 2,380 कोटी रूपये खर्चाच्या आराखड्याला मान्यता
पायाभूत सुविधांची कामे 31 मार्च
2015 पूर्वी पूर्ण करावीत
-
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई,
दि. 17 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जुलै-ऑगस्ट 2015 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेली पायाभूत सुविधांची सर्व कामे
अत्याधुनिक तंत्राचा वापर करून 31 मार्च 2015 पूर्वी पूर्ण करावीत, असे आदेश
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले. या कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित
केलेल्या दोन हजार 380 कोटी रूपयांच्या खर्चाच्या आराखड्याला मान्यताही देण्यात
आली. ज्येष्ठ मंत्र्यांच्या समावेश असलेले एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान डॉ.
मनमोहन सिंग यांची भेट घेणार असून केंद्र सरकारने यासाठी भरीव निधी उपलब्ध करून
द्यावा, अशी मागणी करणार आहे.
कुंभमेळा
आयोजनासाठी नेमलेल्या शिखर समितीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
मुंबईत झाली. या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन
भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री आर. आर. पाटील, आरोग्य मंत्री
सुरेश शेट्टी, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, खासदार
समीर भुजबळ, खासदार प्रतापराव सोनवणे, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, पोलिस
महासंचालक संजीव दयाळ, महंत भक्तचरणदासजी, महंत संविधानंद सरस्वती, महंत शंकरानंद
सरस्वती, महंत केशवपूरीजी, महंत पिनाकेश्वर गिरीजी, महंत उदयगिरीजी, महंत
नारायणदासजी, नाशिक पुरोहित संघाचे प्रमुख सतीश शुक्ल, त्र्यंबकेश्वर पुरोहित
संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे तसेच विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
नाशिकचे
जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सादरीकरण करून 2015-16 वर्षात होणाऱ्या सिंहस्थ
कुंभमेळ्याच्या नियोजनाची तपशीलवार माहिती दिली. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन व
नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे यापूर्वीचा मेळा 2003-04 मध्ये झाला होता. नाशिक येथे
वैष्णव पंथाचे तीन आखाडे असून त्र्यंबकेश्वर येथे शैव पंताचे दहा आखाडे आहेत. 2003
साली झालेल्या कुंभमेळ्यात एक ते दीड लाख साधू आणि 50 ते 60 लाख भाविकांनी हजेरी
लावली होती. यावर्षी साधू व भाविक मिळून एक कोटी लोक कुंभमेळ्यासाठी येतील, असा
अंदाज आहे. या दृष्टीने शाही स्नान परिसरातील कामे, पाणीपुरवठा योजना, रस्ते व
पूल, मलनिस्सारण, कायमस्वरूपी शौचालये, विद्युत व्यवस्था आदी सोयी सुविधांची
मोठ्या प्रमाणात उभारणी करावी लागणार आहे. साधूग्रामची उभारणी करण्याबाबत तसेच
सर्व धार्मिक कार्यक्रमांबाबत शैव आणि वैष्णव आखाडे आणि प्रशासन यांचा समन्वय
ठेवण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
कुंभमेळ्याचा कार्यक्रम जाहिर
अखिल
भारतीय आखाडा परिषद आणि पुरोहित संघाने 2015-16 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे
होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा पुढीलप्रमाणे जाहिर केल्या आहेत. ध्वजपर्व
प्रारंभ-14 जुलै 2015, आखाडा ध्वजारोहण 19 ऑगस्ट 2015, ध्वजपर्व शेवट – 11 ऑगस्ट
2016. तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पहिले शाही स्नान 29 ऑगस्ट 2015 रोजी,
दुसरे शाही स्नान 13 सप्टेंबर 2015 रोजी तर तिसरे शाही स्नान 25 सप्टेंबर 2015
रोजी होणार आहे.
बैठकीमध्ये
मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कुंभमेळ्याचे आयोजन आणि
व्यवस्थापन ही राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. अत्यंत कमी जागेमध्ये
दाटीवाटीच्या शहरात हे आयोजन करावयाचे आहे. मेळ्याला येणाऱ्या भाविकांची आणि
साधूमहंतांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. या सर्वांसाठी पुरेशा आवश्यक
तात्पुरत्या व कायम स्वरूपी सुविधा उभारणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी साधूग्रामसाठी
जागा आरक्षण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांच्या हरकती व सुचना
मागविण्यात आल्या आहेत. शाही मार्गांचे रूंदीकरण करण्यासंदर्भात विशेष बैठक बोलाविली
जाईल. या मार्गातील अतिक्रमणे काढणे अत्यंत अवघड विषय असून राजकीय मतैक्य आवश्यक
आहे. यासंदर्भात मी स्वत: महिनाभरात नाशिकचे पालकमंत्री श्री. छगन भुजबळ आणि
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या समवेत नाशिक येथे भेट देऊन सर्व ठिकाणांची पाहणी
करणार आहे, असेही श्री. चव्हाण यांनी जाहिर केले.
पंतप्रधानांना भेटणार
आपण
येत्या शनिवारी नवी दिल्ली येथे जात असून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची वेळ
मागितली आहे. ही भेट झाली तर या संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचे पत्र त्यांना देऊन
केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी देण्याची विनंती करणार आहे. त्यानंतर विस्तृत
प्रकल्प अहवालासह अंतिम प्रस्ताव तयार करून तो घेऊन ज्येष्ठ मंत्र्यांसमवेत पुन्हा
पंतप्रधानांना भेटणार आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले. तात्पुरत्या कामावर निधी
खर्च करण्यापेक्षा कायमस्वरूपी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आदेशही
त्यांनी यावेळी दिले. नाशिक महानगर पालिकेने पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी
पाठविलेला कर्जप्रस्ताव मंजूर करण्यास कोणतीही अडचण नाही, असे त्यांनी स्पष्ट
केले.
प्राधान्यक्रम ठरवा – भुजबळ
सार्वजनिक
बांधकाम मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मी आतापर्यंत यासंदर्भात तीन-चार बैठका
घेतल्या असून कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने करून त्यासाठीचा निधी अर्थसंकल्पीय करून
घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. दोन वर्षे आधीच काम सुरू केल्याने सर्व कामे वेळेत
पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या विविध रस्त्यांची 181 कोटी
खर्चाची कामे सुरू असून 380 कोटींची कामे निविदास्तरावर आहेत. विविध खात्यांच्या
मंत्री महोदयांना पत्र लिहून आपण त्यांना संबंधीत खात्यांच्या कामासाठी निधी
उपलब्ध करून द्यावा, अशीही विनंती केली आहे, असे ते म्हणाले.
शाही
स्नानाची कुंडे आणि गोदावरी नदी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे,
यासाठी पाणी शुद्धीकरणाचाही प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आराखड्यातील सर्व कामे
वेळेत पूर्ण होण्यासाठी महानगरपालिका-जिल्हा व मंत्रालय अशा तीन पातळ्यांवर कामे
झाली पाहिजेत, असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी लोकप्रतिनिधी,
प्रशासकीय अधिकारी, साधू महंत या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. काटेकोर नियोजन
आणि कालबद्ध अंमलबजावणी करून आम्ही कुंभमेळ्याचे शिस्तबंध नियोजन करण्यात यशस्वी
होऊ, असा निर्धार श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला.
कार्यक्षम अधिकारी नेमावेत - आर. आर.
पाटील
गृहमंत्री
आर. आर. पाटील म्हणाले की, यावेळच्या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी
वाढणार आहे. यासाठी नीट अंदाज घेऊन नियोजन केले पाहिजे. सर्व विभागामध्ये
कार्यक्षम अधिकारी नेमण्याचा व कुंभमेळा संपेपर्यंत त्यांची बदली न करण्याचा
निर्णय घ्यावा लागेल. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी, शनीशिंगणापूर आणि
तिर्थस्थळांना भेटी देतात. त्यामुळे अन्य तिर्थस्थळांचा वाहतूक आराखडा बनवावा.
भीमाशंकर, घृष्णेश्वर याठिकाणीही पायाभूत सुविधांची उभारणी करावी. नाशिक येथील
दाटीवाटीची व कमी जागा, होणारी गर्दी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन चोख बंदोबस्त
ठेवण्यात येईल, असे ते म्हणाले.
यावेळी
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कामांचे वेळापत्रकानुसार पूर्ण करावीत,
अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार समीर भुजबळ, खासदार प्रतापराव सोनवणे, आमदार
सर्वश्री हेमंत टकले, जयप्रकाश छाजेड, प्रशांत हिरे, वसंत गिते, उत्तमराव ढिकले,
बबनराव घोलप, माणिकराव कोकाटे, नितीन भोसले, श्रीमती निर्मला गावित यांनी अत्यंत
मौलिक सूचना केल्या.
नाशिकचे
महापौर यतीन वाघ, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष योगेश तुंगार, नाशिकच्या पुरोहित
संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिकरे,
बैरागी संघटनेचे डॉ. प्रमोद बैरागी यांनीही चर्चेत भाग घेतला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा