गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१३


देशाने गोल्डन व्हॉईस गमावला :मुख्यमंत्री
मुंबई, दि. 24: अनेक भारतीय भाषांमधील गाणी गाऊन भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या मन्ना डे यांच्या निधनाने देशाने गोल्डन व्हाईस गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
‘तमन्ना’ या चित्रपटाच्या माध्यमातून 1942 साली पार्श्वसंगीत क्षेत्रात पदार्पण केलेल्या मन्ना डे यांनी 400हुन अधिक गाणी म्हटली. केवळ हिंदीच नव्हे तर मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम तसेच कन्नड, गुजराथी, कोकणी अशा अनेक भाषांमधून गाणी गाऊन संगीताला कुठलीही सीमारेषा नसते हे त्यांनी सिध्द केले. त्यांची अनेक गाणी इतकी लोकप्रिय झाली आहेत की, ती आजही सहजपणे आठवतात.
 कमी वयात गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करून अनेक वर्षे सिनेरसिकांच्या मनावर राज्य केलेल्या मन्ना डे यांनी पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके असे अनेक सर्वोच्च पुरस्कार मिळविले होते, यातच त्यांची महानता लक्षात येते.  त्यांच्या निधनाने एक चतुरस्त्र गायक आपण गमावला असला तरी त्यांच्या सुमधुर गाण्यांमधून ते कायम आपल्यातच राहतील, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

0000000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा