देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अणुवीज निर्मितीकडे
वळण्याशिवाय कोणताही पर्याय नाही : मुख्यमंत्री
मुंबई, दि. २७ : अणुऊर्जा हा
ऊर्जेचा सुरक्षित, पर्यावरणानुकुल आणि शाश्वत स्त्रोत असून देशाच्या ऊर्जा
सुरक्षेच्या दृष्टीने अणुवीज निर्मितीकडे वळण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर
नाही, असे स्पष्ट व परखड प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
‘ग्रंथाली’ने प्रकाशित
केलेल्या श्री. राजा पटवर्धन लिखित ‘जैतापूरचे अणुमंथन’ या पुस्तकाचे प्रकाशन
शनिवारी श्री. चव्हाण यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे एका समारंभात झाले,
त्यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत
झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार व ‘दिव्य मराठी’चे संपादक कुमार केतकर,
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रकल्प संचालक संदीप सिंघाराम, लेखक राजा पटवर्धन,
‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते.
श्री. चव्हाण यांनी या पुस्तक
प्रकाशनाच्या निमित्ताने जागतिक इंधन समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि एकंदरच
अणुऊर्जा प्रकल्पांच्या अपरिहार्यतेबद्दल स्पष्टोक्ती केली. मुख्यमंत्री म्हणाले
की, माझी वैयक्तिक पार्श्वभूमी अभियांत्रिकीची आहे. माझ्याकडे २००४ साली पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान
कार्यालयाच्या राज्यमंत्री पदाबरोबरच
अंतरिक्ष विज्ञान आणि अणुऊर्जा खात्याचा स्वतंत्र कार्यभार दिला,
तेव्हापासून माझा या विषयाशी संपर्क आला. त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
असलेले डॉ. अनिल काकोडकर आणि अनेक ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञांकडुन आपल्याला याबाबतचे
एक प्रकारचे प्रशिक्षणच मिळाले. मीसुद्धा वैयक्तिक आवड आणि खात्याची जबाबदारी
म्हणुन या विषयात खोलपणे शिरलो. देशातील
सर्व अणुऊर्जा प्रकल्पांना मी भेट दिली. कदाचित अणुऊर्जेची एवढी सखोल माहिती
घेतलेला आणि जास्तीत जास्त अणुऊर्जा प्रकल्पांना भेट देणारा मी देशातील एकमेव
राजकीय नेता असेन.
या पार्श्वभूमीनंतर
मुख्यमंत्र्यांनी जैविक इंधनाच्या साठ्यांबद्दल जागतिक आणि राष्ट्रीय
वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अभावी आपण
सद्या एकुण गरजेच्या ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात अतिशय अमूल्य असे परकीय चलन
खर्चुन करतो. ही गरज सतत वाढत असुन येत्या ४ वर्षात ती ९० टक्क्यांपर्यंत जाईल. विजेच्या
बाबतीतही अशीच अवस्था आहे. सद्या आपल्या
देशात एकुण विजनिर्मितीपैकी ६८ टक्के विज कोळशापासुन बनते. जलविद्युतचे प्रमाण १७
टक्के आहे. सौर, पवन अशा अन्य मार्गांद्वारे १२ टक्के विज उपलब्ध होते. अणुऊर्जेचे
प्रमाण फक्त २.१२ टक्के आहे. कोळशाचे साठे झपाट्याने संपत आहेत. देशांतर्गत
कोळशाचा दर्जा फारसा चांगला नाही. त्यामुळे आयातीवर अवलंबुन रहावे लागते.
अशा स्थितीत देशाची ऊर्जेची
गरज भागवून विकास साधायचा असेल, तर अणुऊर्जेसारख्या शाश्वत उर्जास्त्रोताला
कोणताही पर्याय नाही. यामुळेच केंद्र सरकारने याकडे वळण्याचे ठरवले. जैतापूर
प्रकल्पाची सुरुवात आजकालची नाही. केंद्राने यासाठी नेमलेल्या साईट सिलेक्शन
कमिटीने जैतापूरची जागा प्रकल्पासाठी अतिशय योग्य असल्याचा अहवाल दिला होता. सर्व
प्रकारची काळजी घेऊनच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला झालेला विरोध
हा कोणतीही शास्त्रीय माहिती न घेता राजकीय स्तरावर झालेला विरोध होता. मात्र
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आंदोलकांबरोबर प्रदीर्घ चर्चा करुन त्यांच्याशी
समन्वय साधला. त्यांचे हे योगदान अतिशय महत्वाचे आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.
प्रकल्पग्रस्तांशी महत्वाच्या वाटाघाटी करुन या प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्यात महत्वाचा वाटा उचललेले उद्योगमंत्री नारायण राणे यांचेही तडाखेबंद भाषण झाले. ते म्हणाले की, देशाच्याआणि राज्याच्या प्रगतीसाठी विज अत्यावश्यक आहे. मात्र हे माहित असुनही केवळ राजकीय स्वार्थासाठी या प्रकल्पाला विरोध झाला. अणुऊर्जेबद्दल कोणतीही शास्त्रीय माहिती न घेता हा विरोध केवळ राजकीय कारणांसाठी झाला. या प्रकल्पाबद्दल जाणुनबुजुन अपसमज निर्माण करण्यात आले. अशा परिस्थितीत श्री. राजा पटवर्धन यांनी अतिशय शास्त्रीय दृष्टीकोनातून लिहिलेले हे पुस्तक विरोधकांचे पितळ उघडे पाडणारे आहे.
अशा प्रकारचे विकासाचे
प्रकल्प आले की त्यांना विरोध करण्यासाठी ठराविक माणसेच पुढे येतात. काही परकीय
देशांचे धोरण राबविण्यासाठी हे लोक
विकासाच्या मुळावर येतात. यामुळेच श्री. पटवर्धन यांचे कार्य हे
राष्ट्रहिताचे असुन त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असे श्री. राणे म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर
म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचे
वैज्ञानिक आत्मचरित्रच आहे. कारण लेखक श्री. पटवर्धन हे जैतापूरचे भूमिपूत्र असून
स्वत: प्रकल्पग्रस्त आहेत. या प्रकल्पाला काही विशिष्ट लोकांकडुन झालेला विरोध हा
राजकीय स्वरुपाचा आणि श्री. राणे यांच्या वैयक्तिक विरोधातील होता. त्याला
कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाची किंवा तात्विक जोड नव्हती. मात्र श्री. पटवर्धन
यांनी अतिशय कठीण विषय सोप्या शब्दात मांडुन हे पुस्तक लिहुन राष्ट्रीय विकासात
मोठे योगदान दिले आहे.
पुस्तकाचे लेखक राजा पटवर्धन यांनीही
यावेळी आपले मनोगत सविस्तरपणे मांडले व पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
श्री. सिंघाराम यांचेही भाषण झाले. श्री. भिडे यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा