मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
वंचितांच्या आयुष्यात प्रकाशाची पहाट
उगविण्याचा निर्धार करुया : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 2: दिवाळी हा सण प्रकाशाचे महत्व
सांगणारा आहे. यासाठी ज्यांच्या आयुष्यात अद्याप अंधार आहे, अशा वंचितांच्या
जीवनात प्रकाश आणण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी
करुया, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. राज्यातील
प्रत्येक नागरिकाची सुरक्षा, समृद्धी आणि राज्याच्या समतोल विकासासाठी आपण कटीबद्ध
राहणार असल्याची ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी राज्यातील जनतेला दिवाळीचा संदेश
देताना दिली आहे.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiB5ERHm4iQkVJc1QvDVZqmBHoCtzsPyrproEpZfP8_mdoxaqnpZ5dgsYXfgEVhMW0wkl-MyaHOe2y6GtOAWS-Uh3GzBY5NcdVtUHGP_2Y2Et157i0y9kdfSecATUkqz62oV5SgIQ6REFo/s1600/shubh-dipawali+2.jpg)
राज्याने उद्योगात चांगली
आघाडी घेतली असून भविष्यात देखील ती टिकून राहील. अनेक रोजगार यातून
निर्माण होतील. शेतीला भरभराटीचे दिवस आणण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांमुळे
बळीराजाचे भविष्य देखील उज्वल होणार आहे. प्रकाशाचे प्रतिक
असणाऱ्या ऊर्जेच्या उत्पादनातील अडथळे दूर सारुन लवकरच आपले राज्य पूर्णपणे
प्रकाशमान होण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. अमंगलाचा मुकाबला करीत मंगलमय पर्वाची
सुरुवात करणारी ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो, असेही मुख्यमंत्री आपल्या
संदेशात म्हणतात.
------०------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा