गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

भटकळ च्या अटकेमुळे अनेक दहशतवादी कृत्यांचा
उलगडा होण्यास मदत - मुख्यमंत्री
मुंबई दि. २९ ऑगस्ट, 2013
इंडियन मुजाहिदीनचा कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला झालेल्या अटकेमुळे देशात यापूर्वी झालेल्या काही दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश तर होईलच शिवाय भविष्यातील त्यांच्या अशा कटांचा उलगडा होण्यास मोठी मदत होणार आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले.
यासीन भटकळचा शोध युद्धपातळीवर घेतला जात होता. महाराष्ट्र एटीएसने देखील त्याची आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांची माहिती देण्यासाठी गेल्या वर्षीच १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पुणे येथील जर्मन बेकरी आणि मुंबईतील झवेरी बाजार, दादर येथील बॉम्बस्फोटामागे भटकळचा हात असल्यामुळे आज त्याला झालेली अटक फार महत्वाची आहे. राज्यातील अशाच स्वरूपाच्या ८ गुन्ह्यांसाठी यासीन पोलिसांना हवा होता.  
सुरक्षा दलांमधील समन्वयामुळे मिळालेले हे यश असून लष्कर-ए- तोयबाचा प्रमुख दहशतवादी अब्दुल टुंडा याच्या आणि आता भटकळच्या अटकेने देशातील दहशतवाद्यांचे जाळे कमजोर होण्यास मदत होईल असे आपल्याला वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

    
भटकळ च्या अटकेमुळे अनेक दहशतवादी कृत्यांचा
उलगडा होण्यास मदत - मुख्यमंत्री
मुंबई दि. २९ ऑगस्ट, 2013
इंडियन मुजाहिदीनचा कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला झालेल्या अटकेमुळे देशात यापूर्वी झालेल्या काही दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश तर होईलच शिवाय भविष्यातील त्यांच्या अशा कटांचा उलगडा होण्यास मोठी मदत होणार आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले.
यासीन भटकळचा शोध युद्धपातळीवर घेतला जात होता. महाराष्ट्र एटीएसने देखील त्याची आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांची माहिती देण्यासाठी गेल्या वर्षीच १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पुणे येथील जर्मन बेकरी आणि मुंबईतील झवेरी बाजार, दादर येथील बॉम्बस्फोटामागे भटकळचा हात असल्यामुळे आज त्याला झालेली अटक फार महत्वाची आहे. राज्यातील अशाच स्वरूपाच्या ८ गुन्ह्यांसाठी यासीन पोलिसांना हवा होता.  
सुरक्षा दलांमधील समन्वयामुळे मिळालेले हे यश असून लष्कर-ए- तोयबाचा प्रमुख दहशतवादी अब्दुल टुंडा याच्या आणि आता भटकळच्या अटकेने देशातील दहशतवाद्यांचे जाळे कमजोर होण्यास मदत होईल असे आपल्याला वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

    

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

महाराष्ट्रात ‘अन्न सुरक्षा’ यशस्वीपणे राबविणार
अन्न सुरक्षा कायदा हा भुकेशी लढा देणारा
जगातील एक सर्वात आगळा वेगळा कार्यक्रम
                             -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, दि. 26 : देशातील 82 कोटी जनतेला स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून देणारा अन्न सुरक्षा कायदा हा राजकीय व सामाजिक पातळीवर आमूलाग्र परिवर्तन घडवणारा असून कोणीही उपाशी रहाणार नाही याची खात्री देणारा आगळावेगळा असा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात हा कायदा यशस्वीपणे राबविण्याचा आमचा निर्धार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
युपीए-2 सरकारने मांडलेले अत्यंत महत्वांकाक्षी असे अन्न्‍ा सुरक्षा विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, अन्न सुरक्षा कायदा अनेकांचे आयुष्य बदलवून टाकणारा आहे. देशातील दोन तृतीयांश जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देणाऱ्या ऐतिहासिक अन्न सुरक्षा विधेयकाची संयुक्त राष्ट्रानेही प्रशंसा केली आहे. त्यामुळे या कायद्याला जागतिक महत्त्व आहे.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षेचे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसची गरीबी हटाओ घोषणा आता खऱ्या अर्थाने परीपूर्ण होणार आहे. युपीएच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, उपाध्यक्ष श्री राहुल गांधी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वंकष विचार विनिमय करुन गरिबांचे कल्याण करणारा हा निर्णय घेतला आहे. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल श्री. चव्हाण यांनी श्रीमती गांधी व पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे.
000000



शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोकनाट्य लळित’ आणि ‘मालवणी लोकगीते’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते झाले, त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितेश राणे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, इंजि. शैलेंद्र लळीत उपस्थित होते. 
प्रा. डॉ. लळीत यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन
लोककला आणि बोलीभाषा टिकण्यासाठी
अभ्यास, संशोधन आणि संवर्धन आवश्यक
                                         -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, दि. २३ : लोककला आणि बोलीभाषा यांचे नाते अतूट असुन आजच्या आधुनिक जगात व मनोरंजनाच्या धबडग्यातही यांचे अस्तित्व कायम आहे. मात्र भविष्यकाळात लोककला आणि बोलीभाषा टिकण्यासाठी त्यांचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन आवश्यक आहे. यादृष्टीने प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी लिहिलेली पुस्तके महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व सद्या शिरुर (जि. पुणे) येथील सी. टी. बोरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोकनाट्य लळित’ आणि ‘मालवणी लोकगीते’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री चव्हाण यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या छोटेखानी समारंभाला लळीत बंधुंचे स्नेही व सामाजिक कार्यकर्ते नितेश राणे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, इंजि. शैलेंद्र लळीत उपस्थित होते.
          श्री. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या विविध बोलीभाषा हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. या बोलीभाषांनी मराठीचे दालन समृद्ध केले आहे. बोली या प्रमाणभाषेला समृद्ध करीत असतात. त्यामुळे त्यांचे संशोधन झाले पाहिजे. बोलींप्रमाणेच महाराष्ट्रातील लोककलांचे दालनही अतिशय समृद्ध आहे. मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या पारंपरिक लोककलांनी स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन अशा राष्ट्रीय कार्यामध्येही मोठै योगदान दिले आहे. आता मनोरंजनाचे जग बदलले आहे. मात्र या बदलत्या काळातही लोककलांचा हा वारसा पुढील पिढ्यांसाठी जपणे आवश्यक आहे. डॉ. लळीत यांची तिन्ही पुस्तके यामध्ये महत्वाचे योगदान देतील, असे कौतुकोद्गार श्री. चव्हाण यांनी काढले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी दशावतार व कोकणातील अन्य लोककलांबद्दल आस्थेने चौकशी केली. विशेषत: दशावतार लोककलेतील उत्स्फुर्तता, पुरुषांकडुन केल्या जाणाऱ्या स्त्री भूमिका यामुळे ते प्रभावित झाले. कोकणातील देवस्थाने, जत्रा, परंपरा, मालवणी बोली याबद्दल त्यांनी उत्सुकतेने जाणून घेतले.
सामाजिक कार्यकर्ते नितेश राणे यांनीही या पुस्तकांबद्दल डॉ. लळीत यांचे अभिनंदन केले. सतीश लळीत यांनी आभार मानले.
0000000 

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१३

पोलीस दलाने सदैव सतर्क राहणे आवश्यक - मुख्यमंत्री

          मुंबई, दि. 22 : वैचारिक पुरोगामी परंपरेबरोबरच समाज सुधारकांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. राज्यात एखादी अप्रिय घटना घडल्यास या परंपरेवर आघात होतो. अशावेळी राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकविणे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. यासाठी पोलीस दलाने सदैव सतर्क असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अर्ध-वार्षिक गुन्हे परिषद-2013 च्या समारोप प्रसंगी केले.
            राज्याच्या विकासात पोलीस दलाचे मोठे महत्त्व आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत असेल तर विकास साध्य होण्यास अडचणी येत नाहीत. राज्यामध्ये गुन्हा घडला की लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करुन न्याय व्यवस्थेसमोर हजर करुन त्यांना योग्य ती शिक्षा होण्यासाठी पोलीस दलाने अहोरात्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे समाजात पोलीसांविषयी विश्वासाची भावना टिकण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलीसांवर कामाचा मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत होतकरु अधिकारी/कर्मचारी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडतात. पोलीस दलातील आत्महत्येचे सत्र बंद करण्यासाठी शासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत आहे. यामध्ये समुपदेशकाची गरज भासल्यास ती सुद्धा शासन पूर्ण करेल. आत्महत्ये मागील कारणे शोधून त्यावर उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे.
            गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविताना सांगितले की, देशामध्ये महाराष्ट्र पोलीसांचे काम उत्कृष्ट आहे त्यांनी हा दबदबा देशामध्ये टिकवून ठेवण्यासाठी सतत कार्यरत असणे आवश्यक आहे. पोलीसांवरील ताण कमी करण्यासाठी राज्यात दरवर्षी पोलीस भरती आयोजित करण्यात येईल. राज्यातील बहुतांश जिल्हे नक्षलमुक्त झाले आहेत. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र नक्षलमुक्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, देशामध्ये पोलीस पदके मिळविण्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. भविष्यात सर्वाधिक पदके महाराष्ट्र पोलीसांना मिळण्यासाठी पोलीस दलाने सतत कार्यतत्पर असणे आवश्यक आहे.
            यावेळी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, अपर मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, एटीएस प्रमुख राकेश मारिया, मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह तसेच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0 0 0 0 0
विधानसभेतील आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी केली पूर्तता
भाडे तत्वावरील घरे योजनेखालील ५० टक्क्यांपर्यंत
घरे संक्रमण निवासस्थाने म्हणुन वापरणार
मुंबई, दि. 21 : भाडे तत्वावरील घरे योजनेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध होणा-या सदनिकांपैकी 50 टक्केपर्यंत सदनिका प्राधान्याने संक्रमण निवासस्थान म्हणून वापरण्याचा तत्वत: निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. यासंदर्भात कार्यपध्दती विहित करण्यासंबंधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या  महानगर आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत.  
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात दि. २६ जुलै रोजी याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. भाडे तत्वावरील घरे योजनेअंतर्गत काही घरे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे  उपलब्ध होतात. त्यापैकी काही घरे मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका क्षेत्रात धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती निष्कासित करतांना विस्थापित होत असलेल्या रहिवाशांना तूर्तास सक्रंमण निवास म्हणून उपलब्ध करुन देण्यात येतील.  
मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका हददीतील अशा सदनिका या उपलब्धतेनुसार अतिधोकादायक, धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनासाठी संबंधित महानगरपालिकेला संक्रमण निवासासाठी  देण्यात येतील.
जर महानगरपालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींच्या निष्कासनाच्या कार्यवाहीअंतर्गत निष्कासनानंतर संक्रमण निवासस्थाने महानगरपालिकेकडे उपलब्ध नसतील तर महानगरपालिका आयुक्तांच्या विनंतीवरून त्या महानगरपालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील भाडेतत्वावरील प्राप्त होणा-या सदनिका उपलब्धतेनुसार संक्रमण निवास  म्हणून वापरण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या ताब्यात देण्यात येतील. 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या सदनिका रु.1/- प्रति चौ.मी. एवढया नाममात्र भाडयाने 30 वर्षांकरीता संबंधित आयुक्त, महानगरपालिका यांना भाडेतत्वावर देण्यात येतील. संबंधित आयुक्त, महानगरपालिका यांना या सदनिका अतिधोकादायक/ धोकादायक  व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सदनिकाधारकांच्या तात्पुरत्या निवा-यासाठी  संक्रमण निवास  म्हणून भाडे तत्वावर देण्याकरीता वापरता येतील. या सदनिकांचे भाडे संबंधित आयुक्त,  महानगरपालिका निश्चित करतील. हे भाडे आयुक्त, महानगरपालिका यांनी वसुल  करुन त्यातून  प्राप्त होणा-या  रक्कमेतून सदर इमारतींची देखभाल व दुरुस्ती  करावयाची आहे.

                                                *******

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी
हत्येबाबत माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपये - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दि. 20: डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रध्देच्या विरोधात दिलेला लढा कदापिही विसरता येण्यासारखा नाही. अंधश्रध्दा आणि अनिष्ट चालीरितींना आपल्या जीवनातून कायमचे हद्दपार करण्यासाठी लढत राहणे, हीच डॉ. दाभोळकर यांना खरी श्रध्दांजली ठरेल, अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर शोक व्यक्त केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची झालेली हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन त्यांच्या हत्येबाबत माहिती देणाऱ्यास राज्य शासनाच्या वतीने 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.  
          मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात की, एक विचार संपविण्याचा झालेला हा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा असून तो सहन केला जाणार नाही.  समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवुन अनिष्ट चालीरिती बंद करणे, हा एक मोठा सामाजिक लढा आहे आणि या लढाईत आपण तेव्हाच जिंकू, जेव्हा या मोहिमेला कायद्याचे अधिष्ठान लाभेल, असे डॉ. दाभोळकरांनी अतिशय कणखरपणे वारंवार मांडले. जादूटोणा आणि अनिष्ट चालीरितीविरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यात त्यांनी जे परिश्रम घेतले, त्याबद्दल निश्चितच त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना आहे आणि पुढेही राहील.
          हा कायदा प्रत्यक्षात अंमलात यावा म्हणून डॉ. दाभोळकर यांच्याशी माझी, त्याचप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांशी अनेकदा चर्चा झाली. या कायद्याची आवश्यकता आणि परिणामकारकता यावर ते अतिशय मुद्देसुद आणि अभ्यासपूर्वक विवेचन करीत. प्रत्येक चर्चेच्या वेळी या मसुद्यामध्ये वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा होत होत्या. या कायद्याच्या अनुषंगाने समाजातील विविध पक्ष, संघटना, लोक यांच्याशी शासनाची सातत्याने चर्चा सुरु होती. ही सगळी प्रक्रिया सुरु असतांनाच डॉ. दाभोळकर यांच्यासारखा या कायद्याचा प्रणेता अचानक आमच्यातून निघून गेला हे अतिशय दु:खदायक आहे. डॉ. दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येच्या मागे कोण आहेत त्यांचा पुरेपुर छडा लावण्याचे आदेश पोलि‍सांना देण्यात आहेत, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
                   

000000
जयंतराव साळगांवकर यांच्या निधनाने
बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 20 : कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांच्या निधनाने एक मराठी ज्योतिषतज्ज्ञ, राजकारण, कला, साहित्य, पत्रकारिता, लेखक आणि उद्योजक असे बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
अध्यात्म आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक असलेल्या साळगावकरांनी सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख लिहिले. प्रत्येकाच्या घरात पोहचलेल्या कालनिर्णयदिनदर्शिका त्यांनी नऊ भाषांमधून प्रसिद्ध केली. कालनिर्णयच्या माध्यमातून त्यांनी दिनदर्शिकेला एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून दिले. उद्योगासह ते सार्वजनिक जीवनातही सहजपणे वावरत. महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष, इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर संस्थेचे विश्वस्त अशा विविध नामांकित संस्थांमधून त्यांनी सामाजिक कार्य केले. तसेच समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी सुंदरमठ, श्रीगणेश दैवताचा इतिहास देवा तूचि गणेशु आदी ग्रंथाचे लिखाण करणाऱ्या साळगावकरांनी पंचांगामध्ये सुलभता आणि शास्‍त्रशुद्धता आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले. त्यांनी पंचांगाचा परंपरागत साचा बदलून नवीन स्वरूपात पंचांगाचे संपादन केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झाले. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि लेखनविश्वातील ज्योतिर्भास्कर गमाविला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

00000

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

एकसंघ भावना हेच राज्याचे बलस्थान
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी  जाहीर केली
राज्याच्या विकासाची पंचसूत्री
मुंबई, दि. 15 : राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. पुढील काळात राज्याचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणीटंचाई मुक्त करणे, राज्याचा संतुलित औद्योगिक विकास करणे, सुनियोजित नागरीकरण करणे आणि शिक्षणाचा दर्जा वाढविणे या पंचसूत्रीवर भर दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
          मंत्रालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजारोहण केल्यावर राज्यातील जनतेला संबोधित करताना श्री. चव्हाण यांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मे आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण आपण कृतज्ञतापूर्वक करुया कष्टाने मिळविलेले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची शपथ आज आपण घेऊया, असे आवाहन केले.
ते म्हणाले की, यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनावर दु:खाचे सावट पडले आहे ते कालच मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये घडलेल्या दुर्घटनेचे. देशाचे संरक्षणमंत्री श्री. अँटनी यांच्यासमवेत मी कालच या अपघातस्थळी भेट दिली. या दुर्घटनेबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आवश्यकता लागल्यास नौदलाच्या मदतीकरिता आम्ही राज्याची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
कायद्याने आणि नियमांनी आखून दिलेल्या चाकोरीतून देशाचा किंवा एखाद्या राज्याचा गाडा चालतो. मात्र याहीपेक्षा सर्वात महत्वाची उर्जा असते ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना. आपण सर्व एकसंघ आहोत, राज्य आणि प्रदेश वेगवेगळे असले तरी देशाच्या प्रती आपले कर्तव्य आहे ही भावना महत्वाची आहे, असे ते म्हणाले.
          मुख्यमंत्र्यांच्‌या भाषणातील काही ठळक भाग :
महाराष्ट्राने संपूर्ण देशासमोर ही एकसंघपणाची भावना जोपासण्याचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे तो कुठल्याही प्रादेशिक वादाला, संकुचितपणाला थारा न दिल्याने. दुष्काळ, अतिवृष्टी असो किंवा आर्थिक मंदीचे आव्हान, राज्याने प्रत्येक आपत्तीचा मुकाबला करताना हे संकट सर्वच राज्यावर आले आहे, हे मानून त्याचा सामना केला.
गेल्या वर्षी याच प्रसंगी बोलत असतांना राज्यासमोर प्रखर दुष्काळाचे आव्हान होते. मात्र यंदा राज्याच्या सर्व ३५ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने दुष्काळाचे संकट दूर झाले आहे. पावसाच्या अनियमिततेचा कायमस्वरुपी मुकाबला कसा करायचा, याचा आराखडा आपण तयार केला आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पावसाची अनियमितता ही जरी निसर्गावर अवलंबून असली तरी पाणीटंचाईवर नियोजनपूर्वक मात करता येते. विकेंद्रीत पाणीसाठा करुन पाणीटंचाई कायमस्वरुपी संपविण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
दुष्काळातून सावरत असतानांच अतिवृष्टीचे संकट राज्यावर आले. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात आणि राज्याच्या इतर काही जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले. या कठीण प्रसंगी लोकांना तात्कालिक मदत आणि त्याचबरोबर कायमस्वरुपी पूरप्रतिबंधक योजनांसाठी सुमारे २००० कोटी रुपयांची तरतूद आम्ही पूरग्रस्त भागासाठी केली. गोसीखुर्द, लोअर वर्धा आणि बेंबळा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. यामुळे विदर्भातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
एकीकडे अशा आपत्तींचा मुकाबला सुरु असला तरी राज्याच्या विकास योजना आणि कार्यक्रम आपण थांबु दिले नाहीत. राज्याचा विकास करतांना त्याला मानवी चेहरा असला पाहिजे, हे सूत्र आम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे आहे. तसेच तात्पुरती मलमपट्टी करणारे निर्णय घेण्यापेक्षा कायमस्वरूपी विकासाच्या विषयांवर शासनाने भर दिला आहे.
मुंबईच्या गिरणी कामगारांना घरे देताना अव्यवहार्य अटी रद्द करणे असो, झोपडीवासीयांनासुद्धा घरे देणे असो किंवा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन करणे असो, आम्ही घेतलेले निर्णय केवळ आणि केवळ सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवूनच घेतले आहेत. दारिद्र्यरेषेखालील रुग्णांकरिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना वरदानच ठरली आहे. ही योजना यावर्षी आम्ही संपूर्ण राज्यात राबविणार आहोत.
मुंबईत गेल्या चार वर्षात पायाभूत विकासाची जी कामे झाली आहेत तशी यापूर्वी कधीही झालेली नाहीत. यावर्षी तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. राज्यात मुंबई ,पुणे, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. नागरी सुविधा आणि परवडणारी घरे यांची मागणी वाढते आहे. वाहतूक, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन अशा सर्व पायाभूत सोयीसुविधा पुरविण्याचे आणि सुनियोजित नागरीकरणाचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणाकरिता विशेष योजना प्रभावीपणे राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
 सर्वांत महत्वाचे आव्हान आहे ते आर्थिक क्षेत्रातील मंदीचे. या सावटातून वर येण्यासाठी उद्योगधंद्यांचा विकास आणि कायमस्वरुपी रोजगारनिर्मिती करण्याला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. नव्या औद्योगिक धोरणाची आणि वस्त्रोद्योग धोरणाची जोमाने अंमलबजावणी करुन आम्ही हे साध्य करणार आहोत. उद्योगांसमोरील समस्या सोडवून तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करुन देणे ही तातडीची गरज आहे. याचबरोबर शेती किफायतशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि उपलब्ध पाण्याचा सुनियोजित वापर करणे, हेही तितकेच महत्वाचे आहे. उद्योगांसाठी आणि शेतीसाठी आवश्यक असलेली वीज पुरेशी आणि अखंडितपणे देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
97 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याच्या सहकार कायद्यात काही महत्वाच्या सुधारणा आम्ही केल्या. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्ती दूर करुन या क्षेत्राला पुन्हा मजबुत पायावर उभे करण्याचा आमचा निर्धार आहे.
आपले राज्य हे सत्तेचे विकेंद्रीकरण करणाऱ्या आणि ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावणाऱ्या पंचायत राज्य व्यवस्थेचे जनक आहे. या संस्थांच्या माध्यमातून केलेल्या ग्रामीण विकासाच्या कार्याबद्दल पंतप्रधानांच्याहस्ते महाराष्ट्राला अडीच कोटी रुपयाचे पारितोषिक नुकतेच देण्यात आले. राजमाता जिजाऊ माता-बालक आरोग्य व पोषण अभियानाच्या माध्यमातून राज्यात कुपोषणाच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. कुपोषणाच्या कमी झालेल्या प्रमाणाची दखल युनिसेफने जागतिक पातळीवर घेतली आहे.
सतत लोकाभिमुख निर्णय घेऊन महाराष्ट्राचे देशातील मानाचे आणि गौरवाचे स्थान आपण कायम टिकविले आहे. समोरच्या आव्हानांना सामोरे जात आपणाला प्रगती करायची आहे. राज्य शासनाचे नियोजनबद्ध प्रयत्न आणि आपले सहकार्य यांच्या समन्वयातून आपण सर्व समस्यांवर मात करण्यात यशस्वी ठरू आणि देशाच्या लौकिकात भर पाडू, याचा मला आत्मविश्वास आहे.
महाराष्ट्राला उत्तम प्रशासन, आर्थिक शिस्त, प्रगल्भ राजकीय नेतृत्वाची एक महान परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेण्याची आणि ती अधिक संपन्न करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनी सर्वांच्या सहकार्याने आव्हानांचा सामना करीत महाराष्ट्राला स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख, गतिमान आणि उत्तरदायी सरकार देण्याच्या माझ्या वचनाचा मी पुनरुच्चार करतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा.


000000‍

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

मंत्रिमंडळ निर्णय
दुष्काळी भागातील जनावरांच्या छावण्यांना
३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
टँकर्स देखील गरजेप्रमाणे सुरु ठेवणार
राज्यात बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस होत असला तरी काही भागांमध्ये अद्यापही कमी वृष्टीमुळे चाऱ्याची समस्या कायम आहे.  अशा दुष्काळग्रस्त भागांमध्ये जनावरांच्या छावण्या 31 ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  तसेच ज्या योजनांमधून तलावांमध्ये पिण्यासाठी पाणी सोडले जाते अशा योजना वीज बिले न भरल्यामुळे बंद असतील तर त्या 30 सप्टेंबरपर्यंत पुढे चालू ठेवण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे  टँकर्स स्थानिक परिस्थिती पाहून सुरु ठेवण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर यापूर्वीच देण्यात आले आहेत.
राज्यात उस्मानाबादचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 313 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक तर 36 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के, 6 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला.  एकंदर राज्यात 1043.60 मि. मी. म्हणजेच सरासरीच्या 143.4 टक्के पाऊस झाला आहे.
धरणातील पाणी साठा 73 टक्के
राज्यातील विविध जलाशयात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून सध्या 73 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 47 टक्के पाणी साठा होता. आजची  स्थिती पुढीलप्रमाणे:- कोकण 86 टक्के (गतवर्षी 75 टक्के), मराठवाडा 37 टक्के (गतवर्षी 8 टक्के), नागपूर 87 टक्के (गतवर्षी 52 टक्के), अमरावती 80 टक्के (गतवर्षी 49 टक्के), नाशिक 52 टक्के (गतवर्षी 32 टक्के), पुणे 84 टक्के (गतवर्षी 54 टक्के) इतर धरणांमध्ये 91 टक्के (गतवर्षी 71 टक्के). मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणी साठा होण्यास सुरुवात झाली असून जायकवाडीमध्ये 16 टक्के साठा झाला आहे.
पेरणीची कामे वेगात
राज्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 134.69 लाख हेक्टर असून, 137.17 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  कोकण, कोल्हापूर व पुणे विभागात भात पुर्नलागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.  खरीपासाठी बियाणांची गरज निश्चित करण्यात आली असून 95 टक्के बियाणे पुरवठा झाला आहे.  खतांच्या बाबतीतही 107 टक्के पुरवठा करण्यात आला आहे.
टँकर्सच्या संख्येत घट
एकंदर 822 गावे आणि 4496 वाड्यांना 1078 टँकर्स पाणी पुरवठा करीत आहेत. गेल्या वर्षी याच सुमारास 1832 टँकर्स होते.
केवळ चार जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या
सध्या राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा 4 जिल्ह्यांमध्ये मिळून जनावरांच्या 243 छावण्या आहेत.  त्यामध्ये 1 लाख 74 हजार 380 मोठी आणि 21 हजार 924 लहान अशी 1 लाख 96 हजार 304 जनावरे आहेत. टंचाई परिस्थितीत लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली एकूण 11 हजार 245 कामे सुरु असून या कामावर 87 हजार मजूर काम करीत आहेत.
----0----
अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात 324 मृत्युमुखी
वारसांना मदतीचे वाटप सुरु
नागपूर  आणि अमरावती विभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे 3 लाख 91 हजार 69 हेक्टर शेतीपिकांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून 9 हजार 345 हेक्टर जमीन खरडून तर 753 हेक्टर जमीन वाहून गेली आहे.  कोकण, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद विभागातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरु आहे.
50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या धान पिकांसाठी 7 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तर इतर पिकांसाठी 5 हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात येत आहे.  खरडून गेलेल्या जमिनीसाठी 20 हजार रुपये तर वाहून गेलेल्या जमिनीसाठी 25 हजार रुपये रोख देण्यात येत आहेत.   
324 मृत्युमुखी
            अतिवृष्टीच्या काळात त्याचप्रमाणे वीज पडून आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील मृतांची संख्या 324 एवढी झाली आहे.  तर 1 हजार 852 जनावरे मरण पावली आहेत.  आतापर्यंत 196 मृत व्यक्तींच्या वारसांना तर 699 जनावरांच्या मालकांना मदत करण्यात आली आहे.  मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 2 लाख 50 हजार रुपये तर मृत जनावरांच्या मालकांना मोठ्या जनावरांसाठी 25 हजार तर लहान जनावरांसाठी 5 हजार रुपये देण्यात येत आहेत. वादळी वारे आणि पावसामुळे 5 हजार 334 घरांची पूर्ण पडझड तर 72 हजार 718 घरांची अंशत: पडझड झाली आहे.  त्यापैकी 4 हजार 336 घरांच्या मालकांना मदत करण्यात आली आहे. 
-----0-----