मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

जयंतराव साळगांवकर यांच्या निधनाने
बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 20 : कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांच्या निधनाने एक मराठी ज्योतिषतज्ज्ञ, राजकारण, कला, साहित्य, पत्रकारिता, लेखक आणि उद्योजक असे बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
अध्यात्म आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक असलेल्या साळगावकरांनी सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख लिहिले. प्रत्येकाच्या घरात पोहचलेल्या कालनिर्णयदिनदर्शिका त्यांनी नऊ भाषांमधून प्रसिद्ध केली. कालनिर्णयच्या माध्यमातून त्यांनी दिनदर्शिकेला एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून दिले. उद्योगासह ते सार्वजनिक जीवनातही सहजपणे वावरत. महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष, इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर संस्थेचे विश्वस्त अशा विविध नामांकित संस्थांमधून त्यांनी सामाजिक कार्य केले. तसेच समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी सुंदरमठ, श्रीगणेश दैवताचा इतिहास देवा तूचि गणेशु आदी ग्रंथाचे लिखाण करणाऱ्या साळगावकरांनी पंचांगामध्ये सुलभता आणि शास्‍त्रशुद्धता आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले. त्यांनी पंचांगाचा परंपरागत साचा बदलून नवीन स्वरूपात पंचांगाचे संपादन केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झाले. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि लेखनविश्वातील ज्योतिर्भास्कर गमाविला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा