पोलीस दलाने सदैव सतर्क राहणे आवश्यक - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 22 : वैचारिक पुरोगामी परंपरेबरोबरच समाज
सुधारकांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. राज्यात एखादी अप्रिय घटना घडल्यास या
परंपरेवर आघात होतो. अशावेळी राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकविणे अत्यंत
महत्त्वाचे काम आहे. यासाठी पोलीस दलाने सदैव सतर्क असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या
अर्ध-वार्षिक गुन्हे परिषद-2013 च्या समारोप प्रसंगी केले.
राज्याच्या विकासात पोलीस दलाचे मोठे
महत्त्व आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत असेल तर विकास साध्य होण्यास अडचणी येत
नाहीत. राज्यामध्ये गुन्हा घडला की लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करुन न्याय
व्यवस्थेसमोर हजर करुन त्यांना योग्य ती शिक्षा होण्यासाठी पोलीस दलाने अहोरात्र
प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे समाजात पोलीसांविषयी विश्वासाची भावना टिकण्यास
मदत होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलीसांवर
कामाचा मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत होतकरु अधिकारी/कर्मचारी
आत्महत्या करण्याचा मार्ग निवडतात. पोलीस दलातील आत्महत्येचे सत्र बंद करण्यासाठी
शासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत आहे. यामध्ये समुपदेशकाची गरज भासल्यास ती सुद्धा
शासन पूर्ण करेल. आत्महत्ये मागील कारणे शोधून त्यावर उपाययोजना होणे अत्यंत
आवश्यक आहे.
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पोलीस दलाचे
मनोधैर्य वाढविताना सांगितले की, देशामध्ये महाराष्ट्र पोलीसांचे काम उत्कृष्ट आहे
त्यांनी हा दबदबा देशामध्ये टिकवून ठेवण्यासाठी सतत कार्यरत असणे आवश्यक आहे. पोलीसांवरील
ताण कमी करण्यासाठी राज्यात दरवर्षी पोलीस भरती आयोजित करण्यात येईल. राज्यातील
बहुतांश जिल्हे नक्षलमुक्त झाले आहेत. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र नक्षलमुक्त होईल असा
विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, देशामध्ये
पोलीस पदके मिळविण्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. भविष्यात सर्वाधिक पदके
महाराष्ट्र पोलीसांना मिळण्यासाठी पोलीस दलाने सतत कार्यतत्पर असणे आवश्यक आहे.
यावेळी मुख्य सचिव जयंत कुमार
बाँठिया, अपर मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, एटीएस
प्रमुख राकेश मारिया, मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह तसेच राज्यातील वरिष्ठ
पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा