मंगळवार, १८ जून, २०१३

उत्तराखंड येथील पुरात अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना
राज्य शासनामार्फत मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
प्रवाशांच्या सर्वतोपरी मदतीसाठी पथक रवाना
          मुंबई, दि. 18 :  उत्तर भारतामध्ये, विशेषत: उत्तराखंड राज्यात महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सुटकेसाठी राज्य शासनामार्फत सर्व ती मदत युध्दपातळीवर देण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.  दिलली येथील महाराष्ट्र सदनातील अतिरिक्त निवासी आयुक्त प्रदीप कुमार यांच्या अधिपत्याखाली पथक घटनास्थळी पाठविण्यात आले असून हे पथक डेहराडून येथे पोचले आहे. 
डेहराडून येथे राज्य शासनामार्फत शिबीर कार्यालय सुरु करण्यात येणार असून या कार्यालयामार्फत महाराष्ट्रातील प्रवाशांना आवश्यक ती सामुग्री तसेच वाहन व्यवस्थाही केली जाणार आहे. या पथकांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
उत्तराखंड येथे महाराष्ट्रातून जे यात्रेकरु प्रवासी गेले आहेत त्यांची अद्ययावत माहिती गोळा करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, तसेच परिवहन आयुक्त यांना आदेश देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ही माहिती आता उपलब्ध होत आहे. या संदर्भात उत्तराखंडाचे मुख्य सचिव यांच्याशी सविस्तर बोलणे झाले असून त्यांच्याकडूनही मदत दिली जात आहे.  महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालक श्रीमती आय.ए.कुंदन मदतकार्याबाबत संनियंत्रण करीत आहेत.
        प्रवाशांनी मदत व माहितीसाठी प्रदीप कुमार, अतिरिक्त निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन : 09868140663, जगदीश चंद्र उपाध्याय – 09818187793 यांच्याशी संपर्क साधावा.  हे पथक प्रवाशांच्या सुरक्षित परतीसाठी उत्तराखंड राज्यास देखील सहाय्य करणार आहे.
        इतर राज्यात सहलीसाठी अथवा फिरावयास जाण्यापूर्वी संबंधित राज्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधूनच पुढील प्रवासाची दिशा ठरवावी, असे आवाहन जनतेस तसेच ट्रॅव्हल एजन्सीकरिता करण्यात येत आहे. या अनुषंगाने मंत्रालयात राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र, मुंबई – 022 – 22027990, 22816625, 22854168 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
-----०-----


झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाची     नियमावली तयार करणार-मुख्यमंत्री
                पुणे, दि. 17 : पुणे शहराच्या समतोल पर्यावरण पूरक नागरी विकासासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
            पुण्याच्या भवानी पेठेतील गुरुनानक नगर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उद्यानाचे सुशोभीकरण आणि कै. वसंतराव चव्हाण बॅडमिंटन हॉलचे उदघाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाले, तेंव्हा ते बोलत होते. खासदार सुरेश कलमाडी, आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष विलास तांबे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, महापालिका आयुक्त महेश पाठक यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री म्हणाले, "हिरव्या वनराईने वृक्षांनी नटलेल्या हरित टेक्ड्या ही पुणे शहराची खरी ओळख आहे. ही ओळख कायम ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील नागरिकरणाचा वेग वाढला आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल टिकून पर्यावरणपूरक नागरिकरणासाठी झोपडपट्यांचा विकास होण्यासाठी तसेच चांगल्या नागरी सुविधा मिळण्यासाठी लवकरच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाची नियमावली तयार केली जाईल. पर्यावरणाच्या असमतोला मुळे ग्लोबल वॉर्मिगची समस्या भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरणाच्या समतोलासाठी  समाजात व्यापक जागृती करणे आवश्यक आहे.

            पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सुलभ व्हावा यासाठी पुणे मेट्रोचा प्रस्ताव मंत्री मंडळा पुढे मांडण्यात येणार असल्याचे  सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी उपयुक्त असलेल्या चाकण येथील विमानतळाच्या कामास चालना देण्यात येईल.
            आद्य क्रांतीकारक वीर वस्ताद लहुजी साळवे यांचे पुणे शहरात भव्य सर्व संमत स्मारक होण्याबाबत सामाजिक न्याय विभागास तसा प्रस्ताव तयार करण्याबाबत सूचना दिली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, चांगले दर्जेदार  खेळाडू तयार होण्यासाठी चांगल्या सुविधांची गरज असते. नव्याने बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलमधून तशा प्रकारच्या सुविधा आहेत ही चांगली बाब आहे. पुणे शहरातील पहिल्या पर्यावरण पुरक जागृती उद्यानामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागृती होण्यास मदत होईल.
            खासदार सुरेश कलमाडी, आमदार रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, अभय छाजेड यांची समयोचित भाषणे झाली.   विशाल तांबे यांनी प्रास्ताविक केले.
 0 00 0 0 0


सोमवार, १७ जून, २०१३


पाणीटंचाई कायमची संपविणा : मुख्यमंत्री
पुणे दि. 17 महाराष्ट्रातील पाणी टंचाई कायमची संपविण्यासाठी राज्य शासनाने महत्वाची पाऊले उचलली असून जलसंधारणाच्या विविध योजनांसाठी एकूण 60 हजार कोटी रूपयाचे नियोजन केले आहे. केंद्राकडूनही यासाठी मोठ्या मदतीची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितली.
इंडियन कौंसिल फॉर  रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकानॉमिक् रिलेशन्स या संस्थेच्या वतीने ‘21 व्या शतकातील नागरीकरणाचे आव्हान’ या विषयावरील भारती विद्यापीठाच्या पर्यावरण आणि संशोधन या संस्थेत आयोजित केलेल्या  दोन दिवसाच्या कार्यशाळेच्या उद्घाट्न प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नियोजन आयोगाचे  उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया, इंडियन कौंसिल फॉर  रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक् रिलेशन्सच्या प्रकल्प प्रमुख आशर आहलुवालिया, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम, भारती विद्यापीठाच्या पर्यावरण आणि संशोधन या संस्थेचे संचालक डॉ. इरिच भरुचा उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नागरीकरणाचा वेग देशातील इतर राज्याच्या तुलनेत अधिक असून 50 टक्क्यापेक्षा अधिक नागरिकरण राज्यात झाले आहे. त्यासाठी महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचे काम सुरु असून जकाती सारखी कालबाह्य कर प्रणाली बदलून मुंबई महानगर वगळता एलबीटी प्रणाली लागू केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात यापुढे सुयोग्य विकास व्हावा यासाठी एकात्मिक शहर विकास योजना राबवित असून पुण्यात आधुनिक पध्दतीचे शिक्षण देणारे आर्किटेक्चर संस्था उभारण्याचा मानस असल्याचे श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
देशातील दुस-या क्रमांकाचा सर्वाधिक लांबिचा पूल मुंबईत नुकताच सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईहून नाशिक आणि पुण्याला जाणारी वाहतूक सुरळीत आणि गतीने सुरु राहील. मुंबईतील वाहतूक अधिक गतिशील करण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वेचे कामपण प्रगती पथावर  आहे,  अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतक-यांना वीज वापरामध्ये सर्वाधिक अनुदान, महानगरातील पाणी वापरावर मर्यादा याव्यात यासाठी मीटर पध्दतीची अमंलबजावणीचा विचार, वीज गळती रोखण्यासाठी सात हजार फ़िडर सेपरेशन बसविले, या सर्व बाबींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अह्लुवालिया यांनी देशातील वाढते नागरिकरणा समोरील चार गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केला. त्यात वीज वापरात आधुनिक साधनांचा उपयोग करुन जास्तीत जास्त वीज बचत करणे, मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करणे, वाहतुक व्यवस्था बहुपर्यायी निर्माण करणे, सर्वात महत्वाचे पाण्याचे योग्य नियोजन. याबाबींवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. देशातील चांगल्या नागरिकरणाच्या सुविधा पुरविणा-या महानगरामध्ये पुण्याचा क्रमांक लागतो असा गौरवही आहलुवालिया यांनी यावेळी आपल्या भाषणात केला.

आशर आहलुवालिया यांनी महाराष्ट्रातील सुजल-निर्मल अभियान हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून मलकापूर, अमरावती, बदलापूर या शहरांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी पर्यावरण जागृती आणि संशोधनात भारती विद्यापीठाच्या पर्यावरण आणि संशोधन या संस्थेच्या योगदान यावेळी विशद केले.

                                        ----------------------