मंगळवार, १८ जून, २०१३

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाची     नियमावली तयार करणार-मुख्यमंत्री
                पुणे, दि. 17 : पुणे शहराच्या समतोल पर्यावरण पूरक नागरी विकासासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
            पुण्याच्या भवानी पेठेतील गुरुनानक नगर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उद्यानाचे सुशोभीकरण आणि कै. वसंतराव चव्हाण बॅडमिंटन हॉलचे उदघाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाले, तेंव्हा ते बोलत होते. खासदार सुरेश कलमाडी, आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष विलास तांबे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, महापालिका आयुक्त महेश पाठक यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री म्हणाले, "हिरव्या वनराईने वृक्षांनी नटलेल्या हरित टेक्ड्या ही पुणे शहराची खरी ओळख आहे. ही ओळख कायम ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील नागरिकरणाचा वेग वाढला आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल टिकून पर्यावरणपूरक नागरिकरणासाठी झोपडपट्यांचा विकास होण्यासाठी तसेच चांगल्या नागरी सुविधा मिळण्यासाठी लवकरच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाची नियमावली तयार केली जाईल. पर्यावरणाच्या असमतोला मुळे ग्लोबल वॉर्मिगची समस्या भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरणाच्या समतोलासाठी  समाजात व्यापक जागृती करणे आवश्यक आहे.

            पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सुलभ व्हावा यासाठी पुणे मेट्रोचा प्रस्ताव मंत्री मंडळा पुढे मांडण्यात येणार असल्याचे  सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी उपयुक्त असलेल्या चाकण येथील विमानतळाच्या कामास चालना देण्यात येईल.
            आद्य क्रांतीकारक वीर वस्ताद लहुजी साळवे यांचे पुणे शहरात भव्य सर्व संमत स्मारक होण्याबाबत सामाजिक न्याय विभागास तसा प्रस्ताव तयार करण्याबाबत सूचना दिली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, चांगले दर्जेदार  खेळाडू तयार होण्यासाठी चांगल्या सुविधांची गरज असते. नव्याने बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलमधून तशा प्रकारच्या सुविधा आहेत ही चांगली बाब आहे. पुणे शहरातील पहिल्या पर्यावरण पुरक जागृती उद्यानामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागृती होण्यास मदत होईल.
            खासदार सुरेश कलमाडी, आमदार रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, अभय छाजेड यांची समयोचित भाषणे झाली.   विशाल तांबे यांनी प्रास्ताविक केले.
 0 00 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा