सोमवार, १७ जून, २०१३


पाणीटंचाई कायमची संपविणा : मुख्यमंत्री
पुणे दि. 17 महाराष्ट्रातील पाणी टंचाई कायमची संपविण्यासाठी राज्य शासनाने महत्वाची पाऊले उचलली असून जलसंधारणाच्या विविध योजनांसाठी एकूण 60 हजार कोटी रूपयाचे नियोजन केले आहे. केंद्राकडूनही यासाठी मोठ्या मदतीची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितली.
इंडियन कौंसिल फॉर  रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकानॉमिक् रिलेशन्स या संस्थेच्या वतीने ‘21 व्या शतकातील नागरीकरणाचे आव्हान’ या विषयावरील भारती विद्यापीठाच्या पर्यावरण आणि संशोधन या संस्थेत आयोजित केलेल्या  दोन दिवसाच्या कार्यशाळेच्या उद्घाट्न प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नियोजन आयोगाचे  उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया, इंडियन कौंसिल फॉर  रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक् रिलेशन्सच्या प्रकल्प प्रमुख आशर आहलुवालिया, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम, भारती विद्यापीठाच्या पर्यावरण आणि संशोधन या संस्थेचे संचालक डॉ. इरिच भरुचा उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नागरीकरणाचा वेग देशातील इतर राज्याच्या तुलनेत अधिक असून 50 टक्क्यापेक्षा अधिक नागरिकरण राज्यात झाले आहे. त्यासाठी महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचे काम सुरु असून जकाती सारखी कालबाह्य कर प्रणाली बदलून मुंबई महानगर वगळता एलबीटी प्रणाली लागू केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात यापुढे सुयोग्य विकास व्हावा यासाठी एकात्मिक शहर विकास योजना राबवित असून पुण्यात आधुनिक पध्दतीचे शिक्षण देणारे आर्किटेक्चर संस्था उभारण्याचा मानस असल्याचे श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
देशातील दुस-या क्रमांकाचा सर्वाधिक लांबिचा पूल मुंबईत नुकताच सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईहून नाशिक आणि पुण्याला जाणारी वाहतूक सुरळीत आणि गतीने सुरु राहील. मुंबईतील वाहतूक अधिक गतिशील करण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वेचे कामपण प्रगती पथावर  आहे,  अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतक-यांना वीज वापरामध्ये सर्वाधिक अनुदान, महानगरातील पाणी वापरावर मर्यादा याव्यात यासाठी मीटर पध्दतीची अमंलबजावणीचा विचार, वीज गळती रोखण्यासाठी सात हजार फ़िडर सेपरेशन बसविले, या सर्व बाबींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अह्लुवालिया यांनी देशातील वाढते नागरिकरणा समोरील चार गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केला. त्यात वीज वापरात आधुनिक साधनांचा उपयोग करुन जास्तीत जास्त वीज बचत करणे, मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करणे, वाहतुक व्यवस्था बहुपर्यायी निर्माण करणे, सर्वात महत्वाचे पाण्याचे योग्य नियोजन. याबाबींवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. देशातील चांगल्या नागरिकरणाच्या सुविधा पुरविणा-या महानगरामध्ये पुण्याचा क्रमांक लागतो असा गौरवही आहलुवालिया यांनी यावेळी आपल्या भाषणात केला.

आशर आहलुवालिया यांनी महाराष्ट्रातील सुजल-निर्मल अभियान हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून मलकापूर, अमरावती, बदलापूर या शहरांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी पर्यावरण जागृती आणि संशोधनात भारती विद्यापीठाच्या पर्यावरण आणि संशोधन या संस्थेच्या योगदान यावेळी विशद केले.

                                        ----------------------






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा