सोमवार, ६ मे, २०१३

 अल्पसंख्याकांना आयएएस-आयपीएस प्रशिक्षण योजनेचे यश
युपीएससीतील यशस्वी अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि, 6 : भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढावे यासाठी राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग तसेच केंद्रीय हज समितीमार्फत अल्पसंख्याकांना आयएएस-आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या शहादा (जि.) नंदुरबार येथील शकील मेहमूद अन्सारी आणि सातारा येथील परवेज नायकवडी या दोन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळविले असून आज त्यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, माजी आमदार जनार्दन चांदुरकर, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती थँक्सी थेक्केकरा, यशदातील समता सामाजिक न्याय केंद्राचे संचालक रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अल्पसंख्याक समाजासाठी प्रेरणादायी यश - नसीम खान
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान म्हणाले, शासकीय सेवांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून याबाबत सच्चर समितीच्या अहवालात उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी केलेल्या शिफारशीस अनुसरुन आणि अल्पसंख्याक विकासासाठीच्या पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमास अनुसरुन राज्य शासनाने राज्यातील मुंबई, यशदा (पुणे), औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर येथील आयएएस- आयपीएस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये खास अल्पसंख्याकांसाठी प्रत्येकी 10 जागा वाढवून घेतल्या आहेत. यातून दरवर्षी 50 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आयएएस-आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. यासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत दरवर्षी साधारण 19 लाख रुपये खर्च केले जातात. याशिवाय मुंबईतील केंद्रीय हज समितीमध्येही खास अल्पसंख्याकांसाठी आयएएस-आयपीएस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. या प्रशिक्षणांचे यश आता दृष्टीक्षेपात आले असून त्यातून प्रशिक्षण घेतलेल्या दोन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी नुकत्याच लागलेल्या युपीएससी परीक्षांच्या निकालामध्ये यश मिळविले आहे. हे यश अल्पसंख्याक समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असून अल्पसंख्याक समाजातून यापुढेही आयएएस-आयपीएस अधिकारी तयार केले जातील, असे ते म्हणाले.
यशस्वी विद्यार्थ्यातील शकील मेहमूद अन्सारी (वय 25) यांनी शहादा (जि. नंदुरबार) येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतून आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले असून पुण्यातून एम. एस्सी. (भोतिकशास्त्र) पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी केंद्रीय हज समितीच्या आयएएस- आयपीएस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतले आहे. परवेज नायकवडी (वय 24) यांनी साताऱ्यातील महाराजा सयाजीराजे विद्यालयातून मराठी माध्यमात प्राथमिक शिक्षण घेतले असून पुण्यात बी. टेक. ची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी यशदा (पुणे) येथील आयएएस- आयपीएस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतले आहे. 
0 0 0 0 0 0































शनिवार, ४ मे, २०१३

 औद्योगिकदृष्टया महाराष्ट्र अजूनही अव्वल
-          मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

नवी दिल्ली 4 मे :  अनेक राज्यांकडून सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित केल्याचे दावे जरी होत असले तरी महाराष्ट्र राज्याने थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. देशात सर्वाधिक गुंतवणुकीसाठी पसंत असणारे राज्य केवळ महाराष्ट्र असल्याचे प्रतिपादन, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एशियन डेव्लपमेंट बॅकेच्या वार्षिक बैठकीत नॉलेज पार्क, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे शुक्रवारी रोजी केले.
या बैठकीसाठी इंडियन एक्सप्रेसचे मुख्य संपादक शेखर गुप्ता, मेघालयाचे मुख्यमंत्री मुकुल संगमा, आंध्रप्रदेशचे उद्योग मंत्री डा. जे गीता रेड्डी, मध्य प्रदेशचे वित्त मंत्री राघवजी व उत्तर प्रदेशचे तांत्रिक शिक्षण मंत्री ब्रम्हशंकर त्रिपाठी उपस्थित होते. देश विदेशातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने एकत्र येऊन संगठितरित्या काम  केल्यास, देशाचा आर्थिक  विकास होईल.  महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न केंद्र शासनाच्या तुलनेत 160%  अधिक आहे. देशाचा मानव निर्देशांक पाहता, देशाच्या तुलनेत 0.67%  राज्याचे मानव निर्देशांक  अधिक आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण अधिक असून, शिक्षणासाठी अनुकूल पायाभूत सुविधा तांत्रिक व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची सोय राज्यात आहे. दर वर्षी दोन लाख अभियंते महाराष्ट्रात निर्माण होतात. याशिवाय, तीन राष्ट्रीय विधी महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

            संख्यात्मकदृष्टया आपण प्रगती केली असली तरी गुंणवत्तापूर्ण उच्च शिक्षण  देण्यात अजूनही आपण मागे आहोत, हे नाकारुन चालणार नाही. हे आपल्या समोरील मोठे आव्हान असून, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषीवर आधारित उद्योग सुरु करण्याच्या दृष्टीने वस्त्रोद्योग धोरण व औद्योगिक धोरण महाराष्ट्र राज्याने नुकतेच जाहीर केले आहे.
            राज्यात मोठ्या उद्योग प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. राज्यात अद्यावत सोयी सुविधा व प्रोत्साहनात्मक 250 औद्योगिक  पार्क उभारण्यात आले आहेत. मोनोरेल, मेट्रोरेल, मुंबई-ट्रान्स-हार्बर लिंक, मिहान, संशोधन केंद्र, औषधी-निर्मिती, एलिवेटेड रेल कॉरिडॉर, आयटी व आयटीएस, ऑटोमोबाईल्स, नवी मुंबई विमानतळ, अशी काही मोठी प्रकल्प पूर्णत्वास असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. गृह निर्माण क्षेत्रातही  मोठी संधी असल्याचे  त्यांनी सांगितले. पारंपारिक शेती व्यवसाय करणार्‍यांना फळबागाकडे आकर्षित करण्यात आले असून त्यांना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येत आहे.
            वाढते नागरीकरण ही मोठी समस्या असून याबाबतीत तामीळनाडू नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यात 50 टक्के  नागरीकरण झाले असून प्रादेशिक असमतोल  दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहे. मराठवाडा आणि विदर्भ यासारख्या अविकसीत भागांच्या विकासासाठी विविध उद्योग व सिंचनसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            औद्योगिक व सेवा क्षेत्राच्या माध्यमातून राज्याला 90 टक्के दरडोई उत्पन्न मिळते. भविष्यात कृषीवर आधारित उद्योग सुरु करावे लागणार आहे, असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री श्री चव्हाण पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य आज भीषण दृष्काळाला तोंड देत आहे. गेल्या दोन वर्षापासून म्हणावा तसा पाऊस झाला नाही. राज्याची सिंचनक्षमता केवळ 18 टक्के आहे. याउलट, पंजाब सारख्या राज्याची सिंचनक्षमता 98 टक्के आहे. बिहार, उत्तर प्रदेश सारखे राज्यसुध्दा सिंचनाच्या बाबतीत महाराष्ट्रच्या पुढे आहे. राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे याकडे लक्ष वेधून भविष्यात सिंचनक्षेत्र वाढविणे आवश्यक असून, वीज निर्मितीला पर्याय म्हणून अपारंपरिक उर्जेला देखील चालना द्यावी लागणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.


0000000000000000

बुधवार, १ मे, २०१३

मेहेंदळे यांच्या शिवचरित्राच्या ई-बुक प्रकाशनामुळे
छत्रपतींचे लोकोत्तर कार्य जगासमोर : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 1 मे  : अक्षरश: लक्षावधी मूळ दस्तऐवज अभ्यासुन तीस वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी सिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘शिवाजी : हिज लाईफ अँड टाइम्स’ हे इंग्रजीतील चरित्र म्हणजे भारतीय इतिहास संशोधन क्षेत्रातील अजोड असे कार्य आहे. या ग्रंथराजाची ई-आवृत्ती प्रसिद्ध करुन परममित्र प्रकाशनाने शिवछत्रपतींचे अभूतपूर्व कार्य जगाला खुले केले आहे. आता या शिवचरित्राचा अनुवाद फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज अशा भाषांमध्ये व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केली.
परममित्र प्रकाशनाने तयार केलेल्या या ई बुकचे प्रकाशन आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन श्री. चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या प्रकल्पाचे संपादक माधव जोशी, प्रकाशिका स्वाती जोशी, ई बुक तयार करणाऱ्या एक्सरसिस टेक्नॉलॉजिसचे श्री. राजेंद्र जोग, चंद्रशेखर नेने, प्रकल्प समन्वयक अरुण करमरकर, प्रा. अविनाश कोल्हे, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत आदी मान्यवर उपस्थित होते. वयोमान व प्रकृती अस्वास्थ्यामुळे चरित्रकार श्री. मेहेंदळे उपस्थित नव्हते.
या उपक्रमाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन करुन श्री. चव्हाण म्हणाले की, आपल्याकडे मूळातच इतिहास लिहिण्याची किंवा त्याबद्दल संशोधन करण्याची वृत्ती फार कमी आहे. भारतावर आक्रमण केलेल्या परकीय आक्रमकांनी बाबरनामा, अकबरनामा अशी चरित्रे लिहवून घेतली. आपल्याकडे शिवछत्रपतींचे भारतीय चित्रकाराने रेखाटलेले एक चित्रही सापडत नाही. जी समकालीन चित्रे आहेत, तीही परकीयांनी काढलेली आहेत. ऐतिहासिक चरित्रलेखनासाठी समकालीन दस्तऐवज खूप महत्वाचे असतात. आपल्याकडे यासाठी फक्त पत्रव्यवहारावर आणि काही बखरींवर अवलंबुन रहावे लागते.

मात्र अशा परिस्थितीत श्री. मेहेंदळे यांनी जे प्रचंड कार्य उभे केले आहे, ते अतुलनीय आहे. आता हे चरित्र ई बुक रुपाने व ॲपल आय स्टोअरच्या मार्गाने सर्व जगासमोर जात आहे, ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. छत्रपतींचे कार्य लोकोत्तर होते. अस्सल कागदपत्रांच्या अभ्यासातून तयार झालेले हे चरित्र इंग्रजीतील ई बुकमुळे महाराजांचे सामरिक, प्रशासकीय आणि राष्ट्रप्रेमाचे कार्य जगासमोर ठेवत आहे. पाश्चात्यांना यामुळे त्यांचे अलौकिक कार्य कळु शकेल, असे श्री. चव्हाण म्हणाले.
यावेळी श्री. राजेंद्र जोग, चंद्रशेखर नेने, प्रदीप रावत यांनी या उपक्रमाची माहिती दिली. संपादक माधव जोशी यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.  या कार्यक्रमाला सुनील कर्णिक, मधुरा जोग, केदार दातार, मनोज पटवर्धन, श्रीनिवास कुलकर्णी, प्रशांत भोगले, तुषार देवरस, अंकुश धुमाळे, भासवान जोशी, मुदिता जोशी आदी उपस्थित होते.
                                  000000

आदित्य बिर्ला ग्रुपकडुन दुष्काळ निधीला
एक कोटी रुपयांची मदत
मुंबई, दि. 1 मे : आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांच्यावतीने आज मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ 2013) साठी एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली. या उद्योगसमुहाचे सल्लागार श्री. सुशिल कुमार साबु यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश श्री. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी समुहाचे अधिकारी सुनिल पै उपस्थित होते. या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आदित्य बिर्ला समुहाचे आभार मानले.
                         000000