मेहेंदळे यांच्या शिवचरित्राच्या ई-बुक प्रकाशनामुळे
छत्रपतींचे लोकोत्तर कार्य जगासमोर : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 1 मे : अक्षरश: लक्षावधी मूळ दस्तऐवज अभ्यासुन तीस वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर श्री. गजानन
भास्कर मेहेंदळे यांनी सिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘शिवाजी : हिज लाईफ
अँड टाइम्स’ हे इंग्रजीतील चरित्र म्हणजे भारतीय इतिहास संशोधन क्षेत्रातील अजोड असे
कार्य आहे. या ग्रंथराजाची ई-आवृत्ती प्रसिद्ध करुन परममित्र प्रकाशनाने शिवछत्रपतींचे
अभूतपूर्व कार्य जगाला खुले केले आहे. आता या शिवचरित्राचा अनुवाद फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज
अशा भाषांमध्ये व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त
केली.
परममित्र प्रकाशनाने
तयार केलेल्या या ई बुकचे प्रकाशन आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन श्री. चव्हाण
यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या प्रकल्पाचे संपादक माधव
जोशी, प्रकाशिका स्वाती जोशी, ई बुक तयार करणाऱ्या एक्सरसिस टेक्नॉलॉजिसचे श्री. राजेंद्र
जोग, चंद्रशेखर नेने, प्रकल्प समन्वयक अरुण करमरकर, प्रा. अविनाश कोल्हे, पुण्याचे
माजी खासदार प्रदीप रावत आदी मान्यवर उपस्थित होते. वयोमान व प्रकृती अस्वास्थ्यामुळे
चरित्रकार श्री. मेहेंदळे उपस्थित नव्हते.
या उपक्रमाबद्दल सर्व
संबंधितांचे अभिनंदन करुन श्री. चव्हाण म्हणाले की, आपल्याकडे मूळातच इतिहास लिहिण्याची
किंवा त्याबद्दल संशोधन करण्याची वृत्ती फार कमी आहे. भारतावर आक्रमण केलेल्या परकीय
आक्रमकांनी बाबरनामा, अकबरनामा अशी चरित्रे लिहवून घेतली. आपल्याकडे शिवछत्रपतींचे
भारतीय चित्रकाराने रेखाटलेले एक चित्रही सापडत नाही. जी समकालीन चित्रे आहेत, तीही
परकीयांनी काढलेली आहेत. ऐतिहासिक चरित्रलेखनासाठी समकालीन दस्तऐवज खूप महत्वाचे असतात.
आपल्याकडे यासाठी फक्त पत्रव्यवहारावर आणि काही बखरींवर अवलंबुन रहावे लागते.
मात्र अशा परिस्थितीत
श्री. मेहेंदळे यांनी जे प्रचंड कार्य उभे केले आहे, ते अतुलनीय आहे. आता हे चरित्र
ई बुक रुपाने व ॲपल आय स्टोअरच्या मार्गाने सर्व जगासमोर जात आहे, ही अतिशय आनंदाची
व अभिमानाची बाब आहे. छत्रपतींचे कार्य लोकोत्तर होते. अस्सल कागदपत्रांच्या अभ्यासातून
तयार झालेले हे चरित्र इंग्रजीतील ई बुकमुळे महाराजांचे सामरिक, प्रशासकीय आणि राष्ट्रप्रेमाचे
कार्य जगासमोर ठेवत आहे. पाश्चात्यांना यामुळे त्यांचे अलौकिक कार्य कळु शकेल, असे
श्री. चव्हाण म्हणाले.
यावेळी श्री. राजेंद्र
जोग, चंद्रशेखर नेने, प्रदीप रावत यांनी या उपक्रमाची माहिती दिली. संपादक माधव जोशी
यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले. या कार्यक्रमाला
सुनील कर्णिक, मधुरा जोग, केदार दातार, मनोज पटवर्धन, श्रीनिवास कुलकर्णी, प्रशांत
भोगले, तुषार देवरस, अंकुश धुमाळे, भासवान जोशी, मुदिता जोशी आदी उपस्थित होते.
000000
आदित्य बिर्ला ग्रुपकडुन दुष्काळ निधीला
एक कोटी रुपयांची मदत
मुंबई, दि. 1 मे
: आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांच्यावतीने आज मुख्यमंत्री सहायता
निधी (दुष्काळ 2013) साठी एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली. या उद्योगसमुहाचे सल्लागार
श्री. सुशिल कुमार साबु यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश श्री. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द
केला. यावेळी समुहाचे अधिकारी सुनिल पै उपस्थित होते. या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी
आदित्य बिर्ला समुहाचे आभार मानले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा