अल्पसंख्याकांना आयएएस-आयपीएस
प्रशिक्षण योजनेचे यश
युपीएससीतील यशस्वी अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांचा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि, 6 : भारतीय
प्रशासकीय सेवांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढावे यासाठी राज्य शासनाचा
अल्पसंख्याक विकास विभाग तसेच केंद्रीय हज समितीमार्फत अल्पसंख्याकांना
आयएएस-आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. या
योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या शहादा (जि.) नंदुरबार येथील शकील मेहमूद अन्सारी आणि
सातारा येथील परवेज नायकवडी या दोन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळविले असून आज त्यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विधानभवनातील
मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्याक विकास
मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, माजी आमदार जनार्दन चांदुरकर, अल्पसंख्याक विकास
विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती थँक्सी थेक्केकरा, यशदातील समता सामाजिक न्याय
केंद्राचे संचालक रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.
चव्हाण यांनी यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अल्पसंख्याक
समाजासाठी प्रेरणादायी यश - नसीम खान
यानंतर झालेल्या
पत्रकार परिषदेत बोलताना अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान
म्हणाले, शासकीय सेवांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून याबाबत
सच्चर समितीच्या अहवालात उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी केलेल्या शिफारशीस
अनुसरुन आणि अल्पसंख्याक विकासासाठीच्या पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमास
अनुसरुन राज्य शासनाने राज्यातील मुंबई, यशदा (पुणे), औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर
येथील आयएएस- आयपीएस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये खास अल्पसंख्याकांसाठी
प्रत्येकी 10 जागा वाढवून घेतल्या आहेत. यातून दरवर्षी 50 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना
आयएएस-आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. यासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत
दरवर्षी साधारण 19 लाख रुपये खर्च केले जातात. याशिवाय मुंबईतील केंद्रीय हज
समितीमध्येही खास अल्पसंख्याकांसाठी आयएएस-आयपीएस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र
चालविले जाते. या प्रशिक्षणांचे यश आता दृष्टीक्षेपात आले असून त्यातून प्रशिक्षण
घेतलेल्या दोन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी नुकत्याच लागलेल्या युपीएससी परीक्षांच्या निकालामध्ये यश मिळविले आहे. हे यश अल्पसंख्याक समाजासाठी
निश्चितच प्रेरणादायी असून अल्पसंख्याक समाजातून यापुढेही आयएएस-आयपीएस अधिकारी तयार केले जातील, असे ते म्हणाले.
यशस्वी
विद्यार्थ्यातील शकील मेहमूद अन्सारी (वय 25) यांनी शहादा (जि. नंदुरबार) येथील
जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतून आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले
असून पुण्यातून एम. एस्सी. (भोतिकशास्त्र) पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी
केंद्रीय हज समितीच्या आयएएस- आयपीएस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण
घेतले आहे. परवेज नायकवडी (वय 24) यांनी साताऱ्यातील महाराजा सयाजीराजे
विद्यालयातून मराठी माध्यमात प्राथमिक शिक्षण घेतले असून पुण्यात बी. टेक. ची पदवी
प्राप्त केली आहे. त्यांनी यशदा (पुणे) येथील आयएएस- आयपीएस भरतीपूर्व प्रशिक्षण
केंद्रातून प्रशिक्षण घेतले आहे.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा