शिक्षणाच्या गुणवत्ता विकासात
खासगी क्षेत्रानेही योगदान द्यावे
राष्ट्रपती मुखर्जी यांचे प्रतिपादन
पुणे, दि. 26 – उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता विकासात खासगी क्षेत्रानेही आपले योगदान देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केले.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा अकरावा पदवीदान समारंभ आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या लवळे येथील परिसरात झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, रजिस्ट्रार एस.सी.नेरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दादा जे.पी. वासवानी, प्रा. हरेश शहा यांना डि.लिट. पदवी देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, बदलत्या जागतिक परिस्थितीचा विचार करता देशातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अतिशय व्यापक आणि गुणात्मक बदल होण्याची आवश्यकता आहे. देशातील बहुतांश कुशल मनुष्यबळास खासगी क्षेत्र सामावून घेत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रानेही आता उच्च आणि तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी योगदान देण्याची गरज आहे.
आपल्या देशात सुमारे 1800 वर्षे शिक्षणाची उच्च परंपरा होती. पण नालंदा, तक्षशीला आणि विक्रमशीला येथील विद्यापीठांच्या पतनानंतर ही परंपरा लयास गेली. उच्च शिक्षणाची ही गुणवत्ता आणि परंपरा पुन्हा एकदा विकसित करण्याची गरज आहे, असे सांगून राष्ट्रपती मुखर्जी यांनी देशातील एकही विद्यापीठ, संस्था जगातील अव्वल अशा दोनशे विद्यापीठांच्या यादीत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
ते म्हणाले, गेल्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत शिक्षणाच्या पायाभूत गरजांचा विस्तार आणि विकास झाला. पण गुणवत्तेच्या बाबतीत आपण अद्याप तितकेसे यश मिळवू शकलेलो नाही. यावर उपाययोजना करायला हवी. यासाठी उच्च शिक्षणाच्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्वच घटकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे.
शिक्षण संस्था आणि औद्योगिक संस्था यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांतील उद्यमशीलता आणि नाविन्यपूर्णता यांचा विकास व्हावा यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धाक्षमता आणि उच्च गुणवत्तेची संस्कृती यांचा विकास होण्याची आवश्यकता आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
डॉ. मुजुमदार यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती येरवडेकर यांनी आभार मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा