बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

गुणवत्‍तापूर्ण शिक्षण प्रणाली स्थित्‍यंतरासाठी मोठी शक्‍ती
        - राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी
                      शिक्षा मंडळाचा शताब्‍दी समारोहाचा शुभारंभ
       वर्धा, दिनांक 26 – गुणवत्‍ता अभिमुख शिक्षण प्रणाली ही स्थित्‍यंतर घडवून आणणारी मोठी शक्‍ती असून, त्‍याव्‍दारे जगातील अग्रणी देशामध्‍ये भारताचा समावेश होवू शकेल, असे प्रतिपादन राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केले. 
          वर्धा  शिक्षा मंडळाच्‍या शताब्‍दी  समारोहाचे प्रमुख पाहुणे म्‍हणून राष्‍ट्रपती  बोलत होते. यावेळी  राज्‍यपाल सी.विद्यासागर राव, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केन्‍द्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, शिक्षा मंडळाचे अध्‍यक्ष राहूल बजाज, नारायण जाजू, मधुर बजाज, न्‍यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, संजय भार्गव उपस्थित होते.
          नागरिकांच्‍या सर्वांगीण  विकासाचे आणि समानता आणण्‍याचे साधन म्‍हणून शिक्षणाचा वापर करण्‍याची  गरज असल्‍याचे  मत व्‍यक्‍त  करतांना राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी  म्‍हणाले की, स्‍वच्‍छ भारत आणि स्‍वच्‍छ  विद्यालय ही उद्दिष्‍ट्ये  साध्‍य  करण्‍यासाठी  आणि  स्‍वच्‍छ पर्यावरण  वृध्‍दींगत  करण्‍यासाठी   आपण  महात्‍मा  गांधी यांच्‍यापासून प्रेरणा घेवू शकतो.
          आपल्‍या  देशातील नव्‍या शिक्षण संकल्‍पनेचा  अर्थात  नई तालीमचा उगम  गांधीजींच्‍या  अध्‍यक्षतेखाली  शिक्षा मंडळामध्‍ये  1937 मध्‍ये झालेल्‍या  पहिल्‍या  शिक्षण संमेलनात झाला याकडे राष्‍ट्रपतींनी  आवर्जून लक्ष वेधले.
          शिक्षा मंडळाच्‍या संस्‍थेमध्‍ये  शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांना  शांतता, प्रगती आणि विकासाचा  संदेश सर्वदूर पोहचवावा असे आवाहन करतांना राष्‍ट्रपती  पुढे म्‍हणाले की, शिक्षा मंडळाने अत्‍यल्‍प दरात दर्जेदार शिक्षण दिले आहे. इतर संस्‍थांनी  याचे अनुकरण केले तर देशातील शिक्षण क्षेत्राचा कायापालट होईल.
          जगभरामध्‍ये तंत्रज्ञानाधारित क्रांती होत असतांना  शिकविणे आणि  शिकणे  ही प्रक्रिया बदलत आहे. 21 व्‍या शतकात शिक्षणाची  शंभर  वर्षाची   गौरवपूर्ण  इतिहास असणारी  ही संस्‍था शिक्षणक्षेत्रात अधिक चांगली कामगिरी बजावेल. गांधीजी,जमनालाल बजाज यांच्‍या वास्‍तव्‍याने  पावन झालेला वर्धा हे केवळ एक भौगोलिक स्‍थान नसून कल्‍पना, साधेपणा आणि बांधिलकी  याचा एक प्रेरणास्‍त्रोत म्‍हणून  वर्ध्‍याचे  महत्‍वपूर्ण स्‍थान असल्‍याचेही राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी  सांगितले.
                              नितीन गडकरी
          केन्‍द्रीय रस्‍ते वाहतूक,महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुल्‍याधारीत शिक्षणाच्‍या क्षेत्रात शिक्षा मंडळ  या संस्‍थेने महत्‍त्‍वपूर्ण  कार्य केले असल्‍याचे  सांगतांना ते पुढे म्‍हणाले की, संशोधनातही ही संस्‍था अग्रेसर असून कौशल्‍य विकास       साधणा-या संस्‍थेच्‍या प्रस्‍तावांना  केन्‍द्र शासनातर्फे संपूर्ण सहकार्य देण्‍यात येईल अशी  ग्‍वाही  त्‍यांनी यावेळी दिली.
                                 शैक्षणिक संस्‍थांना स्‍वायत्‍तता – मुख्‍यमंत्री
          अल्‍पदरात गुणवत्‍तापूर्ण  शिक्षण देणा-या संस्‍था महत्‍वपूर्ण  ठरणार आहेत. अशा  संस्‍थांना स्‍वायत्‍तता  देण्‍याच्‍या दृष्‍टीने विद्यापीठांच्‍या नियमामध्‍ये  लवचिकता आणण्‍यासोबतच कायद्यात बदल करण्‍यात येणार असल्‍याचे  प्रतिपादन मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          शिक्षण क्षेत्रात बरीचशी आव्‍हाने  आहेत. या आव्‍हानांचा सामना करण्‍यासाठी शिक्षण पध्‍दतीत आमूलाग्र बदल करुन रोजगारक्षम मनुष्‍यबळ निर्मिती करणारे  शिक्षण देण्‍याचा प्रयत्‍न  असल्‍याचेही  मुख्‍यमंत्र्यांनी  सांगितले. शैक्षणिक संस्‍था केवळ पदवी देणा-याच नसाव्‍या अशी अपेक्षा व्‍यक्‍त  करतांना गुणवत्‍ता व दर्जा यासोबतच कौशल्‍याधिष्‍ठीत अभ्‍यासक्रमावर भर देण्‍याची आवश्‍यकता  त्‍यांनी  व्‍यक्‍त  केली.
          शिक्षा मंडळाच्‍या  प्रस्‍तावित  अभियांत्रिकी  महाविद्यालयाला येत्‍या  पंधरा  दिवसात मान्‍यता  देण्‍यात येईल, अशी घोषणाही  मुख्‍यमंत्री  देवेंद्र  फडणवीस  यांनी यावेळी  केली.
          शिक्षा मंडळ संस्‍थेचे विश्‍वस्‍त ज्‍येष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक नारायण जाजू यांचा राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी  यांनी  सत्‍कार  केला. प्रारंभी  शिक्षा मंडळाचे अध्‍यक्ष राहूल  बजाज यांनी शंभर वर्षातील  शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतांना ग्रामीण व  गरजूंना दर्जेदार शिक्षण उपलब्‍ध  करुन देण्‍याचा प्रयत्‍न असल्‍याचे  सांगितले.
          राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी  यांना महात्‍मा  गांधी  यांची  प्रतिमा  देवून राहूल बजाज यांनी गौरव केला तसेच राज्‍यपाल  सी. विद्यासागर राव, मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केन्‍द्रीय वाहतूक रस्‍ते  मंत्री  नितीन गडकरी यांनाही महात्‍मा  गांधी  यांची  प्रतिमा देवून स्‍वागत  करण्‍यात आले.
          शिक्षा मंडळाचे  सरचिटणीस  संजय भार्गव यांनी  कार्यक्रमाचे  संचलन करुन आभार मानले. यावेळी  खासदार  रामदास तडस, आमदार  डॉ. पंकज भोयर,  समीर  कुणावार, तसेच लोकप्रतिनिधी, ज्‍येष्‍ठ  गांधीवादी, शिक्षा मंडळाचे  सर्व पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी  मोठ्या संख्‍यने  उपस्थित होते.
                                                0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा