मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचा सिंहाचा वाटा
    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा, दि. 25  :  महाराष्ट्राच्या निर्मितीत आणि जडणघडणीत स्व. यशवंतराव चव्हाणांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने सगळे मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांना आज कराड येथे आदरांजली अर्पण केली.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील प्रितीसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळाचे मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले, त्यावेळी ते बोलत होते. सहकार पणनमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शंभुराज देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राजकीय व्यवस्थेत कसे काम करावे आणि राज्याचे  प्रशासन कसे चालवावे हे उत्तमरित्या स्व. चव्हाण साहेबांनी दाखवून दिले आहे. त्यांच्याच मार्गाने महाराष्ट्राला आणखी पुढे न्यायचा संकल्प आम्ही केला आहे.
00000
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडूनही लवकरात लवकर मदत
-           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा, दि. 25 : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचे पंचनामे करण्यात वेळ दवडता केंद्र शासनाचे पथक पाहणी करेल आणि लवकरात लवकर केंद्राकडूनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल. त्याचबरोबर स्थायी आदेशानुसार राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरु करीत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

कराड कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. सहकार पणनमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवाजीराव नाईक, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, आनंदराव पाटील, कृषी पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक संपतराव गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील सुमारे 19 हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळग्रस्त गावातील पंचनाम्यांचे अहवाल केंद्र शासनाला सादर केल्यानंतर केंद्राचे पथक येऊन परिस्थितीची पाहणी करते; परंतु दुष्काळग्रस्त गावांची संख्या मोठी असल्यामुळे पंचनाम्यांना विलंब झाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर दिलासा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे पंचनामे करण्यापूर्वीच राज्यात पथक पाठवावे, अशी विनंती आम्ही केंद्राला केली होती. केंद्राने ती मान्य केल्यामुळे आता लवकरात लवकर केंद्रीय पथक परिस्थितीची हणी करेल आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर केली जाईल. राज्याच्या काही भागांमध्ये नुकताच अवकाळी पाऊस झाल्यामुळे सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या बाबतही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शेतीसमोर सध्या सर्वात मोठे आव्हान हवामान बदलाचे आहे. हवामानातील बदलामुळे अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट यासारखी संकटे वाढली आहेत. त्याचा शेतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यावर मात करण्यासाठी मंडलस्तरावर 2 हजार 65 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. भविष्यात ही केंद्रे ग्रामपंचायतस्तरावर उभारण्याचे नियोजन आहे. त्यातून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच हवामानाचा अचूक अंदाज कळल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेती विकासात अन्य राज्ये आपल्या पुढे गेली आहेत; कारण आपण पुरेशा प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध करु शकलो नाही. सिंचनावर आपण कोट्यावधी रुपये खर्च केले; पण पाणी पोहचवू शकलो नाही. आता मात्र संबंधित ठिकाणची भूगर्भाची स्थिती आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन सिंचन सुविधेचे नियोजन करावे लागेल. उगाचच सर्व ठिकाणी मोठी धरणे बांधण्याचा निर्णय घेऊन ती अर्धवट सोडण्यात अर्थ नाही. साखळी सिमेंट बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर जाळे निर्माण करावे लागेल. त्यातून शाश्वत शेती शक्य होईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म सिंचनावरही भर द्यावा लागेल.  नवीन शेती तंत्रज्ञानालाही अधिकाधिक  चालना दिली जाईल. कोरडवाहू शेतीवरही लक्ष केंद्रित केले जाईल. एकूणच  शेतीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची भूमिका शासन घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
            स्व. यशवंतराव चव्हाणांनी शेतकऱ्यांना ताठ मानेने उभे केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन शेतीत नवनवीन प्रयोगांची मुहूर्तमेढ रोवली होती, असे सांगून श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले की, शहराकडे जाण्यास शेतकरी उत्स नसतो. शेतीवर गुजरान होत नसल्यामुळे नालाजास्तव त्याला शहराचा मार्ग धरावा लागतो; परंतु येथेही त्याच्या पदरी निराशाच पडते. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला पुरेसा भाव मिळावा. शेतमालावर प्रक्रिया करणे शक्य व्हावे आणि त्यातून त्याला समृद्ध करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमावर भर दिला जाईल.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नवनवीन तंत्रज्ञान, किटकनाशके आणि बी-बियाणे शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करुन देण्याचे; तसेच सिंचन वाढीचेही आपल्यासमोर आव्हान आहे. ऊस, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही उचित भाव मिळाला पाहिजे.  दुष्काळग्रस्त शेतऱ्यांनाही पुरेशी मदत जाहीर झाली पाहिजे. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही नेहमीच विरोधी पक्ष म्हणून क्रि सहकार्याची भूमिका घेऊ.

मुख्यमंत्री म्हणाले...
·         पंचनाम्यात वेळ दवडता दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न
·         अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार
·         भूगर्भाची स्थिती आणि पावसाच्या प्रमाणानुसार सिंचनाचे नियोजन करणार
·         साखळी सिमेंट बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर जाळे निर्माण करणार
·         हवामानातील बदलावर मात करण्यासाठी उपाययोजना करणार
·         राज्यात मंडलस्तरावर 2 हजार 65 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणार
·         शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका
·         शेतीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा