राज्यात 3 हजार हवामान केंद्र उभारणार
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
यवतमाळ, दि. 25 : पारंपारिक पध्दतीने दरवर्षी ठराविक
वेळी शेतकरी पेरणी करतात. निसर्गाने साथ न दिल्यास दुबार, तिबार पेरणी करावी
लागते. यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. हवामानाचा अचूक अंदाज असल्यास हे
नुकसान टाळता येवू शकते. त्यामुळेच हवामानाच्या अचूक अंदाजासाठी राज्यात 3 हजार
छोटी हवामान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
स्वातंत्र्य सेनानी तथा राज्याच्या मंत्रिमंडळात विविध विभागाचे मंत्री पद
भूषविलेले स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित स्मृती समारोह
प्रसंगी ‘व्हिजन महाराष्ट्र’ या विषयावर विचार व्यक्त करतांना मुख्यमंत्री
श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी खा.विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा
उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण
करुन त्यांना आदरांजली वाहिली. सुरुवातीस जवाहरलालजी दर्डा यांच्याशी फडणवीस
कुटुंबियांच्या असलेल्या कौटुंबिक संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. बाबुजींच्या
आठवणी आणि त्यांचे कार्य आम्हासाठी प्रेरणादायी आहे़, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्यास परिवर्तनासाठी फार मोठी संधी आहे. चांगले धोरण आणि
जनतेच्या विश्वासाने राज्याला पुढे न्यायचे आहे. तरुणांचा देश म्हणून आपली ओळख आहे.
या तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देवून रोजगारक्षम मानव संसाधन बनविणे
आवश्यक आहे. राज्यातील मानव संसाधन विकसित केल्यास राज्य विकासाच्या गाथेत देशात अव्वलस्थानी
राहिल. व्यवसाय, कला तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवित असतांना
युवाशक्ती श्रमशक्ती तसेच राष्ट्रशक्तीत कशी परिवर्तीत होईल, यावर आपला भर राहणार
असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग विकसित झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने
विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण होवू शकणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना
सिंचनाच्या सोई तसेच सुरक्षा दिली पाहिजे. सिंचनाच्या सोई उपलब्ध झाल्यानंतर विज
पुरवठा मुबलक नसल्यास शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होईल. भविष्यात विज वितरणाचे
चांगले नियोजन करून राज्याला विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहणार
आहे. राज्यातील ऊर्जाप्रकल्प त्यांच्या पूर्ण क्षमतेने सुरु राहिल्यास टंचाई
भासणार नाही. त्यामुळे अशा प्रकल्पांना गती दिली जात आहे. पुर्वी राज्यातील विज
प्रकल्पांना लांबून कोळश्याचा पुरवठा व्हायचा. केंद्र शासनाशी झालेल्या सकारात्मक
चर्चेनंतर राज्याला आजूबाजूंच्या खाणींमधून कोळसा उपलब्ध होणार असल्याने विज
उत्पादन वाढीसह विजेचे दर कमी करण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांच्या एका विजपंपासाठी दिड लाखापर्यंत खर्च येतो. हा खर्च
परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर असे सौरपंप दिल्यास शाश्वत
विजेसोबतच हे पंप त्यांना उत्पादन वाढीसाठी मोलाचे ठरेल. त्यामुळे असे पंप
शेतकऱ्यांना द्यावयाचे नियोजन आहे. कापसाच्या भावाबाबत दरवर्षी अडचण होते. राज्यात
सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरु केले आहे. पणन महासंघही सीसीआयच्यावतीने कापूस
खरेदी करत आहे. मुळात जोपर्यंत कापसावर प्रक्रीया करणारे उद्योग येथे सुरु होणार
नाही, तोपर्यंत चांगला भाव मिळणार नाही. त्यामुळे प्रक्रीया उद्योग सुरु करण्यावर
भर राहिल, असे ते म्हणाले.
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. नजर आणेवारी नुकतीच आली. आणेवारीनंतर
वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. अशा पंचनाम्यातून सुट मिळावी म्हणून आम्ही केंद्र
शासनास विनंती केली. केंद्राने पहिल्यांदाच वैयक्तिक पंचनाम्याच्या सुटची मागणी
मान्य केली. केंद्राचे पथक राज्यात येवून दुष्काळाची पाहणी करतील. त्यानंतर या
दुष्काळी स्थितीवर निर्णय होणार आहे. काही गावे वारंवार दुष्काळात जातात. या
गावांना दुष्काळातून कायमस्वरूपी काढण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने काम हाती
घेण्यात येणार आहे. दुबार, तिबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्यासाठीच 3
हजार छोटी हवामान केंद्र सुरु करण्यात येत असून पुढे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या
ठिकाणी अशी केंद्रे उभी करण्यात येतील.
राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग यावे यासाठी उद्योगांना लागणाऱ्या
परवान्यांची संख्या कमी करण्यासोबतच त्यांना कमीतकमी वेळात परवानग्या देण्यासाठी
नवीन विंडो सिस्टम लवकरच अंमलात येईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकतो.
त्यासाठी चांगले धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीची तसेच जनतेच्या सहकार्याची
आवश्यकता आहे. राज्याला विकासाच्याबाबतीत अग्रेसर करण्यासाठी आम्ही काम सुरु केले
आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सुरुवातीस खा. विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी विदर्भाच्या
विकासाच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वे मार्गाला
गती देण्यासोबतच यवतमाळसारख्या ठिकाणी ऑटोहब सारखे प्रकल्प कसे येतील यासाठी प्रयत्न
करावे असे सांगितले. स्व. जवाहरलालजी दर्डा यांनी विविध खात्याचे मंत्री असतांना
विदर्भावर विशेष लक्ष दिले होते, असे सांगुन बाबुजींच्या आठवणींवर प्रकाश टाकला. यावेळी
माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांचेही भाषण झाले.
जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती समारोहानिमित्त आयोजित संगीतमय श्रध्दांजली
सभेस उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाधीस्थळ परिसरात वृक्षरोपणही केले.
परिसरात असलेल्या जवाहरलाल दर्डा तसेच विणादेवी दर्डा यांच्या पुतळ्यांना
पुष्पमाला अर्पण करत श्रध्दांजली अर्पण केली. तत्पुर्वी ज्योत्सना दर्डा यांच्या
समाधीचे दर्शन घेवून तेथेही मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा