वनावर आधारीत जास्तीत जास्त रोजगार
निर्मितीसाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री
गडचिरोली, दि.24 :- जगाच्या
पर्यावरण संतुलनात वनांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. जिल्हयातील वनावरील इंधनाचा
भार कमी करुन जिल्ह्यात वनांवर आधारीत जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी आपण
प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आज दि. 24 कुरखेडा येथे
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील परिसरात गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाची पाहणी
केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे
प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी
रणजितकुमार, आ. कृष्णा गजबे, गडचिरोली वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक टी.एस.के.
रेड्डी, वडसा उपवनसंरक्षक एम.ए. रेड्डी यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस
म्हणाले, अगरबत्ती काडयाची जास्तीत जास्त निर्मिती जिल्ह्यातच झाली पाहिजे यासाठी
येथेच युनिट उभारण्यासाठी आपण प्रयत्नशिल
आहोत. वन संतुलन राखणाऱ्या जिल्हयांना निश्चितच मदत करणार असल्याचे
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी अगरबत्ती प्रकल्पाची पाहणी केली . मागील दोन वर्षापासुन याप्रकल्पात काम करणाऱ्या
गोठणगांव येथील संदीप कमरु याची आस्थेवाईकपणे विचारपुस केली. यावेळी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या विविध
स्टॉलची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.
मोहफुलापासुन तयार करण्यात आलेल्या शरबत, जाम तसेच लाख निर्मितीसाठी कुसूम,
करंजची माहिती त्यांनी जाणुन घेतली. मोहफुलापासुन काढण्यात आलेले तेल, राखेपासुन तयार करण्यात आलेल्या विटा, पळसाच्या
पानापासुन तयार करण्यात आलेल्या पत्रावळींची, बांबुपासून बनविण्यात आलेल्या विविध
वस्तुंची पाहणी मुख्यमंत्र्यानी केली.
संयुक्त वनव्यवस्थापनात
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोंढाळा येथील नितीन राऊत, टेंभणीचे प्रमोद सहारे आणि
उसेगांव येथील राजहंस बोदेले यांनी वनव्यवस्थापनात व रोजगार निर्मितीतील गावाने
केलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
*****
आरोग्यसेवा
लोकाभिमुख करणार : मुख्यमंत्री
देऊळगांव
प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
गडचिरोली,दि.24: राज्याला
प्रगतीपथावर न्यायचे असेल तर अतिदुर्गम आणि मागास असलेल्या गडचिरोली जिल्हयाचा
विकास होणे आवश्यक आहे. आरोग्याच्या
संदर्भात या जिल्हयाकडे शासनाचे विशेष लक्ष असुन येथील आरोग्य सेवा लोकाभिमुख
करण्याला प्राधान्य राहील. असे प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली जिल्हयातील
कुरखेडा तालुक्यातील देऊळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आज दि. 24
नोव्हेंबर रोजी पाहणी केली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत
होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्याच्या इतर भागापेक्षा या
जिल्हयाची आरोग्याची परिस्थिती जेमतेम आहे.
येथील वाढत्या मलेरियाची गंभिर दखल शासनाने घेतली आहे. त्यासाठी डॉक्टरांनी विशेष प्रयत्न करुन
नागरिकांना आरोग्य सेवा पुरवाव्यात. विशेष
म्हणजे डॉक्टरांनी त्यासाठी रुग्णालयात रुग्ण येण्याची वाट न पाहता डॉक्टरांनी
रुग्णाच्या घरी जाऊन उपचार करावे.
त्यासाठी शासन सर्व मदत करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
या जिल्हयाच्या विकासाशिवाय
राज्याचा विकास अपुर्ण आहे. येथे काम
करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच जनतेमध्ये
हे सरकार आपले असल्याची भावना निर्माण करण्यासाठी आज येथे आलेा आहे. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ग्रामीण विकासासंदर्भात केंद्र आणि राज्य
सरकारमध्ये योग्य समन्वय असुन विकासासाठी गावाने स्वयंपुर्ण होणे आवश्यक आहे. शासनाचा निधी ग्रामसहभागाशिवाय शेवटपर्यंत
पोहचणार नाही. त्यासाठी विकासाच्या प्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावे. विकासामुळेच येथील माओवाद संपुष्टात येईल.
असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तत्पुर्वी मुख्यमंत्र्यानी
प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी कक्ष, महिला व पुरुष वार्ड, प्रसुती कक्षाची
पाहणी करुन भरती असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी रणजीत कुमार, जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, आमदार कृष्णा गजबे, आरोग्य
उपसंचालक डॉ. जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी
कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, देऊळगांव
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. आमले, जिल्हा परिषद सदस्या
निरांजनी चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे प्रामुख्याने उपस्थित होते.
------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा