रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

आदिवासी गोवारी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री
नागपूर, दि. 23 : बरोबर 20 वर्षापूर्वी गोवारी आदिवासी समाजातील 114 जणांना शहीद व्हावे लागले, त्यांचे प्रश्न व सामाजिक स्थितीबाबत आपणास पूर्ण कल्पना असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले.
नागपूर शहरातील झिरो माईल या चौकातील शहिद आदिवासी गोवारी स्मृतीस्थळास आज मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धाजंली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.  या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
23 नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गोवारी समाज शहिद दिवस म्हणून पाळतो. आजच्या दिवसाचे औचित्य साधून  जिल्हयातून आदिवासी गोवारी समाजाच्या विविध संघटना याठिकाणी आल्या होत्या. तसेच आबालवृद्ध व महिलांचा देखील मोठा सहभाग होता.
या दिवसाचे औचित्य साधून शहिद स्मारकाच्या बाजूलाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात आदिवासी बांधवासमोर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, देशातील सर्व स्तरातील समाजाचा विकास झाला पाहिजे. आदिवासी गोवारी समाज
आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. याची आपणास कल्पना आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कशोसीने प्रयत्न केला जाईल. तथापि समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या समाजाला शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणे काही गैर नाही. गोवारी बांधवाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही ते  यावेळी म्हणाले.  
   केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदिवासी गोवारी समाजबांधवांनी आपला विकास करण्यासाठी दोन पावले पुढे येणे गरजेचे आहे. हा समाज शैक्षाणिक, सामाजिक, आर्थिकदृष्टया मागास आहे. या समाजाचा विकास करण्यासाठी आपल्या पाल्याला शिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 यावेळी आ. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे,  आ. प्रा. अनिल सोले, आ. डॉ. मिलिंद माने, आशिष देशमुख , मनपा उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी शहीद आदिवासी गोवारी बांधवांना श्रध्दांजली वाहीली. तसेच माजी मंत्री अनिल देशमुख, अजय पाटील यांच्यासह नगरसेवकांनी आदरांजली वाहीली. 

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा