शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

डिजीटल महाराष्ट्र बनविण्याचा मुख्यमंत्र्याचा निर्धार
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : 2015 या वर्षात महाराष्ट्राला डिजीटल महाराष्ट्र बनवू असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शविवारी येथे व्यक्त केला.  
          येथील ताज पॅलेस हॉटेल मधे हिंदुस्थान टाईम्स वृत्त समुहातर्फे आयोजित देश बांधणीत नेतृत्व या विषयावर आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 2015 हे वर्ष डिजीटल सेवा वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या वर्षात महाराष्ट्राला डिजीटल महाराष्ट्र बनविण्याचा निर्धार आम्ही केला आहे. राज्य शासनाचे प्रत्येक कार्यालय हे ई-सेवेद्वारे जोडण्यात येणार आहे. डिजीटल इंडियाच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांना प्रशासनाद्वारे उत्तम सेवा मिळावी यासाठी सेवा अधिकार कायदा अंमलात आणला जाईल, ज्याद्वारे सर्व शासकीय विभागांच्या अधिकार्‍यांचे उत्तरदायित्व निश्चित केले जाईल असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , उत्तम सेवा देणे हे प्रत्येक विभागाचे कार्य असेल आणि उत्तम सेवा मिळणे हा नागरिकांचा अधिकार असेल.
         
महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबदृल मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक वाढीसाठी परवाण्यांच्या सुलभीकरणास सुरुवात झाली आहे. कोणत्याही उद्योग परवाण्यांसाठी 1 ते 3 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात जर एखादा उद्योजक 100 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार असेल तर मैत्री या योजनेनुसार सर्व सुविधा स्वत: शासन पुरविणार आहे. राज्य शासनातील संबंधित विभागांच्या सचिवांना उद्योग परवाने प्रदान करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत असे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा आढावा दर महिण्याला आपण स्वत: घेणार आहे. 
           औद्योगिक वाढ, वीज व पाणी व्यवस्थापन, कृषी विकास त्याच बरोबर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण व २० लाख  घरांच्या निर्मितीचा प्रश्न या विषयांकडे राज्य शासन गांभिर्याने पाहत असून त्यासंबधीचे नियोजन व धोरण आखण्याची प्रक्रिया सुरु आहे असे नमूद करून ते म्हणाले मेक ईन इंडिया या संकल्पनेचा आदर्श समोर ठेऊन आम्ही मेक ईन महाराष्ट्र संकल्पना राबविण्याचा निश्चय केला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        भाषणानंतर एनडीटीव्हीच्या संपादक बरखा दत्त यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली.मुख्यमंत्र्यांनी यावेळी बरखा दत्त आणि नंतर उपस्थित मान्यवरांच्या विविध प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. एनडीटिव्हीचे एडीटर इन चिफ संजन नारायणन यांनी यावेळी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा