गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

बँकिंग क्षेत्रातील मराठी आधारवड हरपला: मुख्यमंत्री
मुंबई, दि. 7 : सारस्वत बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार एकनाथ ठाकुर यांच्या निधनाने बँकिंग क्षेत्रातील मराठी आधारवड हरपलाआहे. त्यांच्यासोबत राज्यसभेत आणि विविध समित्यांवर काम करताना त्यांच्यातील सहृदयतेचे दर्शन होत असे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, श्री. ठाकुर यांच्यासोबत मी राज्यसभेत एकत्र काम केले. अर्थविषयक अनेक समित्यांवरही आम्ही एकत्र होतो. यावेळी मला त्यांच्यामधील संवेदनशील अर्थतज्ञाचे आणि त्यांच्या सामाजिक सामिलकीचे अनेकवेळा दर्शन घडले. त्यांच्याबरोबर देशभरात अनेक दौरे करताना त्यांच्या मनात सर्वसामान्य माणसाप्रती असलेली बांधिलकी त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत असताना मला पहायला मिळाली.
आपल्या सोबत समूहाचाही विकास घडवून आणणाऱ्या श्री. ठाकूर यांच्या जीवनात संघर्ष आणि रचनात्मक कार्य याचा अचूक समन्वय होता. त्यामुळेच त्यांनी उद्योग व बँकींग क्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बँकेने देशातील सर्वात मोठा नागरी सहकारी बँकेचा दर्जा मिळविला. मराठी तरूणांना बँकींग क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यात त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगचे मोठे योगदान आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व्यावसायिक प्रगतीचे शिखर गाठणाऱ्या श्री. ठाकूर यांनी जोपासलेली सामाजिक बांधिलकीही उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा