सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

राज्याला आव्हानात्मक परिस्थितीत भक्कम नेतृत्व
देणाऱ्या विलासरावांचे स्मारक नव्या पिढीला सतत प्रेरणा देईल
                                         --- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
लातूर, दि. 11 :-  राज्याच्या इतिहासातील राजकीय वित्तीय दृष्टीने कसोटीच्या कालखंडात विलासराव देशमुख यांनी राज्याला भक्कम नेतृत्व दिले. त्यांचे स्मारक नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले .
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून त्यांच्या आठवणी जागविणारे एक स्मृती संग्रहालयही उभारण्यात आले आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती संग्रहालयाचे उदघाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर हे होते. यावेळी व्यासपीठावर लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील, राज्याचे परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री अमित देशमुख, ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, .माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, लातूरच्या महापौर स्मिता खानापूरे, . दिलीपराव देशमुख, . सतीश चव्हाण, . विक्रम काळे, . वैजनाथ शिंदे, .बाबासाहेब पाटील, . बसवराज पाटील . ओमप्रकाश पोकर्णा, श्री. उल्हास पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, डॉ. अर्चना पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी पदाधिकारी तसेच श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्यासह देशमुख परिवारातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती संग्रहालयाचे उदघाटन हा भावपूर्ण आठवणी जागवणारा कार्यक्रम आहे. विलासरावांच्या निधनानंतर दोन वर्षे उलटली आहेत, यावर विश्वास बसत नाही. त्यांनी मराठवाडा विभागाला विकास प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कामाचा डोंगर उभा केला. लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था शिस्तीने चालविल्या. मराठवाड्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी विविध प्रकल्पांना आकार दिला. हे सर्व करताना राज्याच्या अन्य भागातील विकास प्रकल्पांना गती दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे यासाठी ध्यास घेत विविध विकास कामांना चालना दिली .
मराठवाड्यातील ग्रामीण भागात उदयाला आलेले विलासरावांचे व्यक्तिमत्व त्यातील नेतृत्व गुणामुळे सुरुवातीपासूनच एक विश्वास निर्माण करणारे ठरले , असे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले की, एकेकाळी राज्य मंत्रीमंडळातील अतिशय महत्वाची अशी एकापेक्षा अधिक खाती विलासरावांनी एकहाती लिलया सांभाळली . त्यांनी राज्याचे नेतृत्व केले तेंव्हा तो कालखंड राजकीय वित्तीय दृष्टीने आव्हानात्मक होता. अशा कालखंडात आघाडीचे सरकार चालवून दाखविण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली . किंबहुना त्यांनी त्यावेळी राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यपध्दतीचा पाया घातला आणि त्यानुसारच गेली पंधरा वर्षे सरकारची वाटचाल सुरु आहे.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, मुंबईत प्रलय झाला तेंव्हा केंद्राकडून हव्या असलेल्या मदतीबाबत आपली आणि त्यांची चर्चा झाली होती . त्यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार तत्कालीन पंतप्रधानांनी मुंबईतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या योजनेला निधी उपलब्ध करुन दिला . त्यांनी राज्याचे नेतृत्व आत्मविश्वासपूर्वक करताना हे राज्य सतत प्रगत पुढारलेले राहील या दृष्टीने पावले टाकली .
विलासरावांना केंद्रात काम करण्याची संधी मिळाली याचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, तेथेही त्यांनी त्यांचा ठसा उमटविला. त्यांना अवधी मिळाला असता तर देशपातळीवरचे निर्णय घेणाऱ्या महत्वाच्या मोजक्या मंत्र्यांमध्ये त्यांची निश्चितच गणना झाली असती . तशी क्षमता त्यांच्या व्यक्तीमत्वात होती .
विलासरांवाच्या वक्तृत्वशैलीचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा नेता या शब्दात त्यांचे वर्णन केले या उमद्या नेतृत्वाची परंपरा कार्यपध्दती यांचे सर्वांनीच अनुकरण करावे, असे उदगार काढले. विलासरावांची कोणी बरोबरी करु शकेल असे वाटत नाही , असे उदगार काढून मुख्यमंत्र्यांनी लातूरला महत्वाचे औद्योगिक शहर म्हणून स्थान मिळावे याकरिता प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले .
राज्यपाल शिवराज पाटील यांनी धाडसी कर्मयोगी या शब्दात विलासरावांचा गौरव केला. सामान्य जनतेशी त्यांचा सततचा संपर्क होता. त्यामुळे या जनतेची सुख-दु:खे त्यांना ठाऊक होती . कोणत्याही पदावर काम करताना सामान्य जनतेच्या सुख-दु:खांचे भान त्यांनी ठेवले . नियतीने त्यांना अधिक आयुष्य दिले असते तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचे आणि नेतृत्वाचे राज्याप्रमाणे देशाच्या सर्व भागात कौतुक झाले असते. त्यांचा सर्वसमावेशक वृत्तीने काम करण्याचा विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही राज्यपाल म्हणाले.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी विकासाच्या कामांबाबत विलासराव सदैव आग्रही राहिले, असे सांगितले. तर माणिकराव ठाकरे यांनी राज्य विधीमंडळात त्यांचे नेतृत्वगुण अगदी प्रारंभापासून दिसत आले. त्यामुळे तरुणांमध्ये ते विशेष प्रिय होते . युवा शक्तीला दिशा देण्याची त्यांची क्षमता होती , असे सांगितले . . दिलीपराव देशमुख यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एकातरी विकास प्रकल्पाची पायाभरणी विलासरावांच्या हाताने झालेली आहे आणि या विकास कामांच्या निमित्तानेच त्यांचे सदैव स्मरण होत राहील , असे सांगितले . नव्याचा ध्यास हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट्य होते, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि एकदा जबाबदारी सोपविल्यानंतर ते संपूर्णपणे विश्वास टाकत असत. त्यामुळे नव्या पिढीत नेतृत्व घडले, असे यावेळी सांगितले . राज्यमंत्री अमित देशमुख यांनी आठवणींचा साक्षात्कार घडविणारे स्मारक या शब्दात पुतळा आणि स्मृती संग्रहालयाचे वर्णन केले. .दिलीपराव देशमुख यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या स्मारकासाठी रेणा सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.
प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष यशवंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी तसेच आबासाहेब पाटील सेलूकर त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्मारकासाठी विविध जबाबदारी पूर्ण करणाऱ्या सयाजीराव जाधव, बंटी जाधव, अजय बोराडे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रा. विद्याधर कांदे पाटील यांनी लिहिलेल्या महाराष्ट्राचा कोहिनूर या पुस्तकाचे यावेळी विमोचन झाले. श्री. कांदे पाटील यांनीही यावेळी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. श्री. रामानुज रांदड यांनी सूत्रसंचालन केले . हा कारखाना उभारण्यासाठी घेण्यात आलेल्या कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आणि कर्जाच्या अंतिम हप्त्याचा धनादेश बँकेला सोपविण्यात आला.

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा