मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

सिडकोने लीज दिलेल्या जमिनीवरील
गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्वेयन्सचा लाभ
          मुंबई, दि. 12 : मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance) चा फायदा आता सिडकोच्या लीज जमिनवरील हजारो गृहनिर्माण संस्थांना होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिडकोला तसे निर्देश दिले आहेत.
मानीव अभिहस्तांतरणाची कार्यवाही सिडकोच्या लीजवरील भूखंडांवरील इमारतीच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू करण्याबाबत विचार सुरू होता. सिडकोतील ज्या भूखंडावर खासगी विकासकांनी इमारती बांधलेल्या आहेत, मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना केलेली नाही अथवा संस्थांच्या नावे जमिनीचे अभिहस्तांतरण केलेले नाही अशा प्रकरणांमध्ये आता या योजनेचा फायदा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
सिडकोतील इमारतींना मानीव अभिहस्तांतरणाची योजना लागू केल्यामुळे ज्या ठिकाणी अद्यापी विकासकांनी सहकारी संस्थांची स्थापना केलेली नाही, त्या ठिकाणी सहकारी संस्थांची स्थापना करण्यासाठी सह जिल्‍हा निबंधक, सहकारी संस्था (सिडको) यांच्याकडे इमारतीमधील सदनिकाधारकांन अर्ज करावा लागेल. ज्यामुळे त्यांच्या सहकारी संस्थेच्या स्थापनेतील अडचण दूर केली जाईल. ज्या ठिकाणी विकासकांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केलेली आहे, मात्र अद्यापी इमारत व त्याखालील जमिनीचे अभिहस्तांतरण संस्थेच्या नावे केलेले नाही, अशा प्रकरणी संबंधित सहकारी संस्थेने मानीव अभिहस्तांतरणाचा अर्ज सह जिल्‍हा निबंधक, सहकारी संस्था (सिडको) यांच्याकडे सादर करावा. नियमानुसार या अर्जावर कार्यवाही होऊन संस्थेच्या नावे मानीव अभिहस्तांतरणाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या प्रमाणपत्रासह अभिहस्तांतरणाचा दस्त उपनिबंधकाकडून नोंदणीकृत झाल्यानंतर सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे.
सिडकोकडून नियमाप्रमाणे हस्तांतर शुल्काचा भरणा करून घेऊन जमिनीची मालकी लिजद्वारे संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा