सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

राज्याच्या जडणघडणीत
माथाडी कामगारांचे महत्वाचे योगदान
-         शिवाजीराव देशमुख
मुंबई, दि. ४ : राज्याच्या जडणघडणीत माथाडी कामगारांचे महत्वाचे योगदान राहिले असून राज्य सरकार माथाडी कामगारांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.
आखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने चिंचबंदर येथील मोनजी सभागृहात आज माथाडी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संघटनेचे संस्थापक पोपटराव पाटील, स्थानिक आमदार अमीन पटेल, राज पुरोहीत, सत्यजित देशमुख, सीताराम मोरे, डी. एस. शिंदे, भाऊसाहेब शिंगाडे, चंद्रकांत रामिष्टे यांच्यासह मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते.
सभापती श्री. देशमुख म्हणाले की, आपल्या राज्यातील माथाडी कामगार कष्टाळू आहेत. राज्याच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शासनानेही त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविले आहेत. यापुढील काळात माथाडी कामगारांसाठी मुंबईत राहण्याची व्यवस्था करणे, माथाडी मंडळात पुरेश्या कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कामगार आयुक्त तसेच कामगार सचिवांना सूचना देण्यात याव्यात, असे ते म्हणाले.
मुंबईच्या उभारणीत माथाडी कामगारांचा सिंहाचा वाटा - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मुंबईचा विकास, समृद्धी आणि आर्थिक राजधानी म्हणून झालेल्या जडणघडणीत माथाडी कामगारांनी मोठे योगदान दिले आहे. मुंबईच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्य शासनानेही राज्यात सर्वप्रथम माथाडी कामगारांसाठी कायदा केला, त्यांच्यासाठी मंडळांची स्थापना करण्यात आली, तसेच माथाडी कामगारांनी किती वजन उचलावे याबाबतीतही कायदे करुन राज्य शासनाने माथाडींच्या हितासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत. माथाडी कामगारांना घरे उपलब्ध करुन देणे, त्यांच्या मुलांचे शिक्षण यासह माथाडी कामगार मंडळांचे काही प्रश्न प्रलंबीत असल्यास  त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
मुंबई-बेंगलोर औद्योगिक कॉरिडॉर
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. देशात महाराष्ट्राचे उत्पन्न सर्वाधिक असून औद्योगिक उत्पादन, रोजगार निर्मिती, परदेशी गुंतवणूक, निर्यात आदी विविध क्षेत्रात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. राज्याचा समतोल विकास करण्याचे शासनाचे उद्दीष्ट असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अविकसीत तालुक्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरबरोबरच आता ब्रिटन देशाच्या सहकार्यातून मुंबई-बेंगलोर औद्योगिक कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सातारा-कराड-सांगली-कोल्हापूर-कागल या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक तसेच रोजगार निर्मिती होऊ शकेल. मुंबई-बेंगलोर औद्योगिक कॉरिडॉरच्या या संकल्पनेस भारत सरकारनेही  मान्यता दिली असल्याचे ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडण्याच्या उद्देशाने कराड-चिपळून बोगद्याने जोडण्याचाही प्रस्ताव आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कोकणाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकेल. या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यात टंचाई निर्मुलन तसेच सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. साखळी बंधाऱ्यांची योजना यशस्वी झाली असून यामुळे अनेक गावे दुष्काळमुक्त होत आहेत. बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्याने त्यांचे जीवनमान फुलत आहे. शासनाने टंचाई, पूर, गारपीट अशा विविध आपत्कालात नागरीकांना दिलासा देण्यासाठी मोठे काम केले असून मदतीचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका, पायाभूत सुविधांसाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आलेले मोनो, मेट्रो रेल, पूर्व द्रुतगती मार्गसारखे विविध प्रकल्प अशा नानाविध योजनांमुळे राज्याने विकासात मोठी आघाडी घेतली आहे. यापुढील काळातही राज्याची वेगाने आर्थिक प्रगती करण्याचे आपले स्वप्न असल्याचे ते म्हणाले.
०००००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा