मराठा आरक्षण समाजाच्या सर्वांगिण विकासात
महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दि. 3 : राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील विषमता ओळखून तत्कालीन परिस्थितीत समाजातील मागासांसाठी आरक्षण जाहीर केले होते. राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा आनंद सोहळा होत आहे. शासनाने मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या हेतूने लागू केलेले हे आरक्षण मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठा संघाच्या शाहू मार्केटयार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदीर येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनास उद्योगमंत्री श्री. नारायण राणे, गृह राज्यमंत्री श्री. सतेज पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या मराठा आरक्षण संदर्भात मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्री श्री. नारायण राणे यांनी अत्यंत कार्यक्षमपणे तसेच राज्यभर दौरे करुन सुयोग्य माहिती व निवेदने स्विकारुन या निर्णयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच अन्य समाजाच्या संघटनांनीही याला पाठिंबा दिला याबद्दल प्रारंभी आभार व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले की, हे अधिवेशन ऐतिहासिक तर आहेच पण सामाजिक प्रगतीमधील मैलाचा दगड ठरणारे आहे. आज राज्याच्या किंवा देशाच्या प्रगतीमध्ये समाजाचा वाटा कितपत आहे? याचे आत्मपरिक्षण मराठा समाजाने करावे आणि या आरक्षण निर्णयाचा लाभ घेवून शैक्षणिक प्रगती करुन आपले आर्थिक स्थैर्य साधण्याबरोबरच राज्याच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन यावेळी केले.
मराठा भवनासाठी जागेचा प्रस्ताव द्यावा
कोल्हापूरातील मराठा भवनाच्या मागणीचा उल्लेख करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठा भवनासाठी समाजातील दानशूर समाज श्रेष्ठींकडून आर्थिक मदत निश्चितच होईल. याबाबत महासंघाने जागेबाबत शासनाकडे प्रस्ताव दिल्यास याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. माणगाव येथे राजर्षींचे यथोचित स्मारक करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शाहू राजांचे यथोचित स्मारक उभारण्याबाबत प्रस्ताव केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
सर्वच बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर
उद्योग, उत्पादन, परकीय गुंतवणूक, रोजगार निर्मिती या सर्वच बाबतीत आज देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील 82 टक्के कोरडवाहू जमिन सिंचनाखाली आणण्याचे आवाहन शासनासमोर आहे. नैसर्गिक आपत्तीसमोर समोर सक्षमपणे मुकाबला राज्य शासनाने केला आहे. 10 लक्ष जनावरांना एक वर्षभर चारा छावणीद्वारे आसरा दिला. 12 हजार कोटी रुपये दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी खर्च झाले. यामधून राज्य शासनाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच आस्मानी संकटाशी यशस्वीपणे तोंड दिले आहे. पुढील काळात मराठा आरक्षणाचा लाभ घेवून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी समाज संघटनांनी पुढाकार घेवून ग्रामिण भागापर्यंत हा निर्णय पोहचवून आर्थिक व सामाजिक उन्नती साधावी असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.
समाजाने आत्मपरिक्षण करण्याची गरज
राज्याच्या लोकसंख्येच्या एक टक्का असणारा मारवाडी समाज राज्याच्या आर्थिक उलाढालीत 24 टक्के स्थान मिळवतो, मात्र 32 टक्के असणाऱ्या मराठा समाजाने किती स्थान मिळवले आहे असा प्रश्न करुन उद्योगमंत्री नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले की, ही माझ्या मनाला वाटणारी खंत आहे. मराठा समाज लढवय्या म्हणून ख्याती पावलेला आहे. देशाच्या संरक्षण दलातील तीनही दलात आज सर्वोच्च पदावर मराठी माणूस का नाही? या सर्वांचाच विचार करुन आता मराठा समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, समाजाच्या उत्कर्षासाठी झालेल्या मराठा आरक्षण निर्णय प्रक्रियेत मला सहभागी होता आले, ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. समाजाच्या उपयुक्त होणाऱ्या संधीची सुवर्णसंधी करण्याचा योग माझ्या आयुष्यात आला याचे मला समाधान आहे.
याप्रसंगी गृह राज्यमंत्री श्री.सतेज पाटील, खासदार श्री.धनंजय महाडिक, आमदार श्री.भाई जगताप, दैनिक पुढारीचे प्रमुख संपादक श्री. प्रतापसिंह जाधव, संभाजीराजे छत्रपती, ऍ़ड. शशीकांत पवार यांचीही समोचित भाषणे झाली.
अधिवेशनानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणपत्रिकेचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. याचबरोबर समाजातील गुणवंत श्री. जयसिंगराव पवार, श्री. डि. बी. पाटील, तेजस्विनी सावंत, डॉ. बुधाजी मुळीक, डॉ. सुरेश पवार, बापूसाहेब जाधव, इंद्रजित सावंत आदींचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
प्रारंभी स्वागताध्यक्ष समीर काळे यांनी स्वागत केले. निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविकात विविध मागण्या मांडल्या. विनायकराव पवार यांनी आभार मानले. समारंभास आमदार नरेंद्र पाटील, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार आनंदराव पाटील, श्रीमती वत्सलाताई पाटील, माजी आमदार पी.एन.पाटील, महासंघाचे पदाधिकारी तसेच मराठा समाजातील बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा