शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

तिलारी प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी
एकरकमी पाच लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय
मुंबई, दि. १ ऑगस्ट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्याऐवजी एकरकमी पाच लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेतला. फक्त या प्रकल्पाच्या बाबतीतच खास बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
        यापूर्वी भरपाईची रक्कम तीन लाख निश्चित झाली होती. ती वाढवुन पाच लाख रुपये करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या रकमेपैकी महाराष्ट्र सरकारचा वाटा २६.७० टक्के तर गोवा सरकारचा वाटा ७३.३० टक्के आहे. गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर गोवा सरकारकडुन आपल्या वाट्याची रक्कम प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महाराष्ट्र सरकारही आपल्या वाट्याची रक्कम प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे.
        एकुण १११० प्रकल्पग्रस्तांपैकी आतापर्यंत १६३ जणांना नोकरी देण्यात आली आहे. उर्वरित ९४७ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना आता नोकरीऐवजी एकरकमी पाच लाख रुपये देण्यात येतील. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांची यादी प्रमाणित केल्यानंतर या रकमा प्रदान करण्यात येतील.
०००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा