निरामय जीवनाची दृष्टी देणारा ‘योगाचार्य’ हरपला: मुख्यमंत्री
मुंबई, दि. 2 : योगगुरू पद्मविभुषण बीकेएस अय्यंगार यांच्या निधनाने जागतिक
स्तरावर योगविद्येचा प्रसार करताना माणसाला निरामय जीवनाची दृष्टी देणारा ‘योगाचार्य’
हरपला आहे. योगसाधना सहजसोप्या पद्धतीने सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे मोठे
कार्य त्यांनी केले, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी म्हटले आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, श्री. अय्यंगार यांनी योगासनाशी
संबंधीत विविध पैलू आत्मसात करून त्यांचे सूक्ष्म अध्ययन केले. अत्यंत कमी वयात
योगप्रसाराच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतांना त्यांनी योगप्रसाराचे कार्य पुणे
येथून सुरू केले. योगशास्त्राशी संबंधीत संशोधन, लेखन आणि प्रशिक्षण अशा तीन
स्तरावर त्यांनी बहुमोल कार्य केले. भारतीय संस्कृतीचा हा बहुमोल ठेवा त्यांनी
जागतिक स्तरावरील जनतेपर्यंत पोहोचविला. अनेक मानसन्मान मिळाल्यानंतरही
त्यांच्यातील अभ्यासकाचे आणि कुशल
मार्गदर्शकाचे दर्शन त्यांच्या कार्यातून अखेरपर्यंत घडले. देश-परदेशातील नागरिकांना योगाचे धडे
देण्यासाठी त्यांनी योग प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या निधनाने
योगशास्त्र प्रसार कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून केवळ देशच नव्हे तर
संपुर्ण जग आदर्श योगाचार्याला मुकले असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा