गुरुवार, १७ जुलै, २०१४

 हज-हाऊस आणि वंदे मातरम् सभागृह
भारतीय संस्कृतीचे प्रतिक ठरतील - मुख्यमंत्री
       औरंगाबाद, दि. 17 :  औरंगाबाद शहरात शेजारी-शेजारी उभारण्यात  येणाऱ्या हज-हाऊस आणि वंदे मातरम् सभागृह या वास्तू सद् भावना, सामंजस्य आणि बंधुता या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचे प्रतिक म्हणून ओळखल्या जातील, या शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या दोन्ही वास्तूंचे महत्व विशद केले.
            शहरातील किलेअर्क परिसरात राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे हज-हाऊस उभारले जाणार असून उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे वंदे मातरम् सभागृह उभारले जाणार आहे. या दोन्ही वास्तूंचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते झाला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री बाळासाहेब थोरात हे होते. कार्यक्रमाला  अल्पसंख्यांक विभाग मंत्री मोहम्मद आरीफ (नसीम) खान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अब्दूल सत्तार, अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महापौर कला ओझा, आ. सुभाष झांबड, आ. प्रदिप जयस्वाल यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तर अतिरिक्त मुख्य सचिव पी. एस. मिना, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
            आपल्या भाषणात मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद हे वैशिष्ठ्यपूर्ण संस्कृती असलेले शहर आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॅरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पामुळे या शहराची राज्याच्या नव्हे तर देशाच्या नकाशावर आधुनिक औद्योगिक नगरी अशी ओळख होणार आहे.  अशा शहरात हज-हाऊस उभारले जावे, हा निर्णय घेण्यात आला. या वास्तूमुळे भविष्यात हजची यात्रा करणाऱ्या मराठवाडा विभागातील बांधवांची मोठी सोय होणार आहे. त्यांच्या सोयीसाठी हज हाऊसमध्ये विविध सुविधा पुरविल्या जातील.
            या विभागातील स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रतिक म्हणून वंदे मातरम् सभागृह ओळखले जाईल असे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले की, या वास्तूच्या रुपाने या विभागातील स्वातंत्र्य लढ्याचा ज्वलंत इतिहास नागरिकांना प्रेरणा देत राहील.  वंदे मातरम् सभागृहात स्वातंत्र्य चळवळीतील विविध प्रसंग साकारले जातील.
            सद् भाव आणि बंधुता ही आपल्या भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत.  औरंगाबाद सारख्या शहरात शेजारी-शेजारी उभ्या राहणाऱ्या या वास्तू आपल्या संस्कृतीचे प्रतिक म्हणून ओळखल्या जातील.  त्यांचे हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन या दोन्ही वास्तूंचा कोनशिला समारंभ एकाच दिवशी करण्याचे ठरविले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
            मराठवाडा विभागाने दुष्काळाचा सामर्थ्याने सामना केला आहे.  शासनाने दुष्काळाशी मुकाबला करतांना जनतेच्या पाठीशी उभे रहात आवश्यक कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या बाबतीत शासन मागे राहणार नाही, अशा आशयाचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी केले.
            प्रारंभी अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री मोहंम्मद आरिफ (नसीम) खान आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वास्तूंच्या उभारणीला सुरुवात व्हावी म्हणून विशेष प्रयत्न केले आहेत  याचा त्यांनी उल्लेख केला.
            हज-हाऊसच्या उभारणीवर सुमारे 30 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या इमारतीत 350 यात्रेकरुसाठी 24 वस्तीगृहे, 100 यात्रेकरु क्षमतेची 16 कौटुंबिक वस्तीगृहे, 450 आसन क्षमतेचे सभागृह, उर्दू घर आणि प्रार्थना गृहे असणार आहेत. वंदे मातरम् सभागृहासाठी 24 कोटी रुपये खर्च अपेक्षित असुन या इमारतीत 1050 आसन क्षमतेचे सभागृह, 250 आसन क्षमतेचे छोटे थिएटर आदि सुविधा असणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
            कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत मंत्री श्री खान व श्री टोपे यांनी केले. सुत्रसंचलन मोहन निनावे यांनी केले.
                                                                        -*-*-*-*-*-* 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा