केंद्रीय अर्थसंकल्पामुळे
भ्रमनिरास - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 10 : केंद्रातील
नवीन सरकारने सादर केलेल्या या पहिल्या अर्थसंकल्पापासून बऱ्याच अपेक्षा
होत्या. किंबहुना सत्तेवर आल्यानंतर आपण
क्रांतीकारी निर्णय घेऊन अर्थसंकल्प व्यवस्थेला शिस्त आणू, असा दावा करण्यात आला
होता. मात्र, या अर्थसंकल्पामुळे मोठा
भ्रमनिरास झाला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली
प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणतात की,
वित्तीय तूट कमी कशी होईल यासंदर्भात कुठलीही ठोस तरतूद या अर्थसंकल्पात दिसत
नाही. केवळ स्मार्ट शहरे, स्वच्छता आणि
चांगले रस्ते यांच्या घोषणा आहेत, परंतु
यासाठी पुरेशी तरतूद नाही. यूपीए सरकारने
जेएनएनयुआरएम या क्रांतीकारी योजनेतून देशातील शहराचा
चेहरा-मोहरा बदलण्यास सुरुवात केली होती.
या अर्थसंकल्पात या संदर्भातील काही ठोस नियोजन दिसत नाही. कुपोषण सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, मात्र यासाठी देखील तरतूद दिसत नाही. देशात अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वे उभारण्याचा
उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला. मात्र, केवळ
100 कोटी रुपये देऊन हे स्वप्न कसे साकारणार हा प्रश्नच आहे. ऊर्जा निर्मिती आणि देशाची विजेची गरज लक्षात
घेता वाढणारी मागणी कशी पूर्ण करणार
याविषयी अर्थसंकल्पात काही प्रकाश टाकलेला नाही.
भाजपने
कायम काँग्रेस आघाडी सरकारवर अर्थसंकल्पातील काही विशिष्ट तरतुदींवर वारंवार टिका
केली आहे. मात्र, अनेक तरतुदी करतांना
त्यांनी अर्थसंकल्पात पुर्वीच्या सरकारचीच उद्दिष्टे थोडीफार नावात बदल करून केली
आहेत. 19 टक्के उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट
यूपीए सरकारने ठेवले होते तेच नव्या अर्थमंत्र्यांनी कायम ठेवले आहे. 80 सी च्या बचत मर्यादेमध्ये केलेली वाढ किरकोळ
अशी आहे. आयकराच्या उत्पन्नाच्या
मर्यादेतही आणखी वाढ होईल असे वाटले होते. थेट कराचे दर कायम ठेवल्याने
करदात्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रापुरते
बोलायचे झाल्यास यूपीएच्या विविध योजनांमधून राज्याला भरीव अशी तरतूद होत होती. या
अर्थसंकल्पात मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासाला गती देऊ एवढाच उल्लेख आहे. आगामी
काळातही आम्ही राज्याला प्रगतीपथावर ठेवण्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा
करीत राहू असेही मुख्यमंत्री म्हणतात.
कालच्या आर्थिक स्थिती अहवालात महाराष्ट्राचे चित्र आशादायी आहे आणि
राज्याने विकासाला चालना देणारी कामगिरी केल्याचे प्रतीक आहे असे मुख्यमंत्री
म्हणतात.
-----०-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा