सायन पनवेल महामार्गावरील टोलबाबत
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
एक महिन्यात समितीचा अहवाल: मुख्यमंत्री
मुंबई दि: 12: सायन पनवेल महामार्गावरील प्रस्तावित टोल
सुरु करण्याबाबत लोकभावना लक्षात घेऊन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
नेमण्यात येत असून एक महिन्याच्या आत समितीला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. हा
अहवाल प्राप्त झाल्यानंतर टोलबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी आज जाहीर केले.
सायन-पनवेल या नव्या महामार्गावर कामोठे येथील प्रस्तावित
टोल नाक्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आज
यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री
अतिथिगृह येथे करण्यात आले होते. या बैठकीस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या
नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उपस्थित होते. या बैठकीस माजी
खासदार श्री. रामशेठ ठाकूर देखील उपस्थित होते.
या टोलनाक्यामुळे महाराष्ट्रातून मुंबईकडे येणाऱ्या
वाहनांना 15 कि.मी.च्या अंतरामध्ये दोन वेळा टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हा
टोल नाका शासनाने बायबॅक करावा, अशी मागणी करण्यात आली. पनवेल, कळंबोली,
कामोठे, खारघर येथील
रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी सदरचा टोल हा अत्यंत त्रासाचा होणार आहे.
तसेच ज्या परिसरात टोल नाका उभारला जात आहे, त्या ठिकाणाहून स्थानिक रहिवाशांची हजारो वाहने ये-जा करतात म्हणून स्थानिकांना या टोलनाक्यावर सूट द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
या टोलसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सकारात्मक
भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते. आजच्या बैठकीत
मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे एकूण घेतले व मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली
एक समिती तातडीने नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला.
--------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा