समाजमन घडविण्याच्या दृष्टीने
प्रसारमाध्यमांनी विधायक भूमिका घेणे महत्वाचे :
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 9 : समाजमन घडविण्याच्यादृष्टीने प्रसारमाध्यमांनी विधायक भूमिका
घेणे आवश्यक आहे. विशेषत: दृकश्राव्य माध्यमांचा जनमानसावर असलेला प्रभाव पाहता
प्रत्येक बातमी वास्तवदर्शी देणे, हे माध्यमातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे
प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
टिव्ही जर्नालिस्टस असोसिएशन (टिव्हीजेए) या दृकश्राव्य प्रसारमाध्यमांच्या
संघटनेला कार्यालयीन वापरासाठी आझाद मैदान येथील एन्सा हटमेंटमधील रिक्त जागा
भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याबद्दल त्यांचे आभार
व्यक्त करण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष विलास आठवले यांच्या
नेतृत्वाखाली आज श्री. चव्हाण यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,
गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह,
मुख्यमंत्र्याचे सचिव विकास खारगे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रसारमाध्यमामध्ये काम
करणाऱ्यांचे आयुष्य फार दगदगीचे असते. विशेषत: दृकश्राव्य प्रसारमाध्यमामध्ये काम
करणारे पत्रकार आणि कॅमेरामन यांची दिवसाचे चोवीस तास धावपळ सुरू असते. यांच्या
कल्याणासाठी कार्य करणाऱ्या टीव्हीजेए या संघटनेला शासनाची जागा भाड्याने
देण्यामागचा उद्देश त्यांचे कष्ट सुसह्य करणे हाच आहे. पत्रकारांसाठी आरोग्य
शिबिरे, समुपदेशन, प्रशिक्षण यासाठी या जागेचा उपयोग होऊ शकतो. शासनाने
पत्रकारांसाठी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची स्थापना केली असून त्यामध्ये
पाच कोटी रुपये कायम निधी ठेवण्यात आला आहे. या निधीतून अधिस्विकृतीधारक
पत्रकारांना गंभीर आजारावर उपचारासाठी मदत दिली जाते. पत्रकारांच्या हिताचे अनेक
धोरणात्मक निर्णय शासनाच्या विचाराधीन
आहेत.
शासनाने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.आठवले आणि श्री.निलेश खरे यांनी
मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी टीवीजेएचे सदस्य सर्वश्री विमल सिंग, प्रकाश
तिवारी , दिपक भातुसे, वसिम हैदर, अहसान अब्बास, विनोद जगदाळे, निलेश खरे, भारत
भिसे, संदीप चौधरी, मिलिंद साळवे, पंकज दळवी,अशोक शुक्ला व अन्य सदस्य उपस्थित होते.
------
पर्यावरण
संरक्षण आणि संवर्धनासाठी
डावखरे
यांचे पुस्तक मार्गदर्शक - मुख्यमंत्री
मुंबई - दि. 9 : पर्यावरण रक्षण ही केवळ सरकारची
जबाबदारी नाही, तर ती सामुहीक जबाबदारी असून प्रत्येकाने उचलली
पाहिजे तरच पर्यावरणाचे ख-या अर्थाने संवर्धन होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
विधानपरिषदेचे उपसभापती
वसंत डावखरे यांच्या ‘एक पाऊल पर्यावरण संर्वधनाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. डावखरे,
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महिला व बालविकास मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड,
गृह आणि ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ.
कल्याण काळे, आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले की,
आपल्यासमोर असलेल्या प्रदुषणाच्या भयंकर समस्यांवर मात करण्याची गरज असुन
पर्यावरणाविषयी समाजात जागृती
निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी
युवकांना आणि तरुणांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या चळवळीत सहभागी करुन
घेतले पाहीजे. जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम सर्व जगात पहायला मिळत आहे.
एकंदरीतच हवामान आणि पर्जन्यमानाचे चक्र बिघडले आहे. याचा परिणाम विकासावर आणि
विशेषत: विकसनशील देशांवर अधिक होत आहे. यासाठी प्रत्येकाने स्वत:पासुन सुरुवात
केली पाहिजे.
श्री. डावखरे यांनी या
पुस्तक लेखनामागील आपली भूमिका मनोगतात स्पष्ट केली. ते म्हणाले की, हा विषय
सर्वांपर्यंत पोचावा, यासाठी त्यात पर्यावरण दिनाची संकल्पना, भारतासमोरील
पर्यावरणाच्या गंभीर समस्या, आपल्या संस्कृतीने पर्यावरणाला पूर्वापार दिलेले
महत्व, तसेच या क्षेत्रात अथक परिश्रम करुन सकारात्मक बदल घडविणाऱ्या काही
प्रातिनिधी व्यक्तींचा परिचय करुन देण्यात आला आहे. श्री. निरंजन डावखरे यांनी
आभार मानले.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा