रविवार, ८ जून, २०१४

मेट्रो मुंबईकरांसाठी खुली
          मुंबई, दि. 8 : मुंबईकरांच्या सेवेसाठी मेट्रो आज खुली करण्यात आली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सकाळी हिरवा झेंडा दाखवून मेट्रोचे उद्‌घाटन करण्यात आले. मेट्रोचे लोकार्पण करतांना अत्यंत आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
          वर्सोवा ते घाटकोपर असा मेट्रोतून प्रवास करुन घाटकोपर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नसीम खान, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, भाजपचे खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, आमदार कृष्णौ हेगडे, अशोक जाधव, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस.मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, रिलायन्स एनर्जीचे अनिल अंबानी, टीना अंबानी उपस्थित होते.
          उन्नत मेट्रोमार्ग करणे अशक्यप्राय असे काम होते. तरी ते आव्हान स्वीकारुन मुंबईकरांचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये कुठलीही तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच तिकीट दराबाबत काही मतभेद असतील तर ते मतभेद दर निश्चित करणाऱ्या समितीमार्फत मिटवले जातील, असेही ते यावेळी म्हणाले. एमएमआरडीए, रिलायन्स एनर्जी व मुंबई मेट्रो-1 प्रा.लिमिटेड यांनी यशस्वीरित्या काम पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा