शनिवार, ७ जून, २०१४

आपत्ती व्यवस्थापनाचेही काटेकोर नियोजन व्हावे : मुख्यमंत्री
 सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उर्वरित कामांची
निविदाप्रक्रिया त्वरेने करावी : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 21 : आगामी पावसाळा आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उर्वरित प्रमुख कामांच्या निविदाप्रक्रिया तात्काळ पूर्ण कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले. कुंभमेळ्यातील भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेउुन कोणतीही अनुचित घटना घडु नये, यासाठी कायमस्वरुपी सीसीटिव्ही यंत्रणा बसवावी व आपत्ती व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करावे, असे आदेशही त्यांनी दिले.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे 2015मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. चव्हाण यांनी आज बैठक बोलावली होती, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्यासह नगरविकास, गृह, परिवहन, उर्जा, वित्त यासह महत्वाच्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात करावयाच्या विविध कामांच्या नियोजनाचे व प्रगतीचे सादरीकरण करण्यात आले. साधुग्राम, रस्ते, पूल, पाणीपुरवठा, विद्युत, वाहतुक व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सीसीटिव्ही यंत्रणा, आरोग्य सुविधा आदी कामांच्या प्रगतीची माहिती यावेळी देण्यात आली.
सिंहस्थासाठी सर्व नियोजन याआधीच पूर्ण झाले असून शिखर समितीने २ हजार ३७८ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला मान्यता दिलेली आहे. त्यानुसार विविध विभागांकडुन आवश्यक निधी प्राप्त होत आहे. यापैकी विविध यंत्रणांकडुन १७६६ कोटी उपलब्ध होणार असून उर्वरित ६२२ कोटी रूपये निधी नगरविकास विभागाने उपलब्ध केला आहे. यासाठीचा निधी कामाचे प्राधान्य पाहुन कॅश फ्लो पद्धतीने उपलब्ध करावा, अशा सुचना श्री. चव्हाण यांनी दिल्या.

००००००
पर्यावरण संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री
मुंबई, दि.7 : राज्याला मागील काही वर्षातमोठ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशा परिस्थितीमध्ये आपद्ग्रस्तांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. नैसर्गिक आपत्ती येऊ नये यासाठी सर्वांनी पर्यावरण संर्वधनासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून पर्यावरण संवर्धनासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले
पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक पर्यावरण सोहळा-2014 आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
जागतिक पातळीवर पर्यावरण विषयक मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,या समस्यांचे योग्यवेळी निराकरण केले नाही तर त्यांचे दुष्‍परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील. पर्यावरणाच्या असमतोलपणामुळे दुष्काळ, गारपीट, ओला दुष्काळ अशा समस्या निर्माण होतात. औद्योगिक क्षेत्रातील दिवसेंदिवस होणारी नेत्रदीपक प्रगती ही समाधानकारक असली तरी पर्यावरणाची तडजोड करुन केलेला विकास अधिक काळ टिकत नाही. पर्यावरणाशी समतोल साधून विकास साधणे गरजेचे आहे. यासाठी समाजामध्ये चित्रपट,लघुपट, जाहिराती, रेडिओ, इंटरनेटअशा विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. तरच पर्यावरण  विषयक भेडसावणाऱ्या समस्यांना आपणास आळा घालता येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 पर्यावरण मंत्री संजय देवतळे म्हणाले, पर्यावरण संवर्धन पूरक बाबीचा स्वीकार समाजाने केला पाहिजे. या अभियानात सर्वंच घटकांनी भाग घेणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनविषयाच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सह्याद्री वाहिनीवरील पर्यावरण संवर्धन विषय लघुपटाचे विमोचन करण्यात आले.
यावेळी पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, आर.. राजीव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राजीव कुमार मित्तल, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचा प्रतिसाद

      मुंबई, दि. 7 : विविध सादरीकरणांच्या माध्यमातून मांडलेले राज्याचे पर्यावरणविषयक प्रश्न त्वरित सोडवावेत या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आवाहनाला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकारात्मक प्रतिसाद दिला.
          श्री. चव्हाण आणि श्री. जावडेकर यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथे झाली. यावेळी श्री. चव्हाण यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाविषयी आवश्यक परवानगी मिळण्याबाबत, मुंबई मेट्रो प्रकल्पाचा पुढचा टप्पा, पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESZ), मुंबईचा किनारी मार्ग असे अनेक प्रश्न मांडले. श्री. जावडेकर यांनी या प्रश्नांबाबत व एकंदरीतच पर्यावरणाच्या समस्यांबाबत आपल्याला सकारात्मक काम करावयाचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्राच्या पर्यावरणविषयक प्रश्नांना प्राधान्य देऊ, असे सांगितले.
          यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवधन पाटील, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर, मुख्य सचिव जे.एस.सहारिया, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आर.राजीव तसेच यासंबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा