औद्योगिकीकरणातून
मागासभागाच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 24:
औद्योगिकीकरणातून
राज्याच्या मागासभागाचा समतोल विकास करण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील
आहे, अशी ग्वाही देऊन सेवा आणि उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मीतीसाठी उद्योजकांनी
पुढाकार घ्यावा त्यास शासन सहकार्य करेल, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी आज येथे केले.
येथील हॉटेल ताज मध्ये दै. लोकसत्ता आणि सारस्वत बॅंकेच्या
वतीने आयोजित करण्यात आलेल्या बदलता महाराष्ट्र या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी
मुख्यमंत्री बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक अरूण फिरोदीया यावेळी उपस्थित होते.यावेळी
`बदलता महाराष्ट्र शेती आणि प्रगती` या
विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, औद्योगिकरण महानगरांपुरतेच
मर्यादीत न राहता मागासभागात देखील उद्याोगांचा विस्तार व्हावा यासाठी राज्य
शासनाने नविन औद्योगिक धोरण तयार केले आहे. त्यामाध्यमातून राज्याच्या
मागासभागांचा समतोल विकास साधण्यावर आम्ही भर दिला आहे. जीवनमानाचा दर्जा
उंचावलेला राहावा यासाठी `वॉक टू वर्क`
किंवा `सायकल टू वर्क` ही
संकल्पना उद्योग क्षेत्रात राबविण्यास सुरूवात केली आहे असे सांगून मुख्यमंत्री
पुढे म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय
घेतले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कायापालट मेट्रो, मोनो रेल,
उड्डाणपुल, पूर्व द्रुतगतीमार्ग याद्वारे झाला आहे. त्याचबरोबर दिल्ली मुंबई
इंडस्ट्रिअल कॉरीडॉरमुळे राज्यात आद्यौगिक वसाहत निर्माण होणार आहे. मिहान प्रकल्प,
अॅडव्हान्टेज् विदर्भ परिषद यामुळे विदर्भाच्या औद्योगिकीकरणाला गती मिळाली आहे. समुद्र
किनारपट्टी लगत औद्योगिकरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी केंद्रीय पर्यावरण
मंत्र्याशी चर्चा केली आहे.
उद्योग क्षेत्रात तसेच थेट परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्र नंबर
वन आहे आणि तो कायम रहावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. उद्योगांना वीज
पुरवठा अखंडीत राहील यासाठी उपायोयजना हाती घेतल्या आहेत. राज्याची अर्थव्यवस्था
बळकट करण्यासाठी समतोल औद्योगिक विकास, कोरडवाहू शेतीला शाश्वत करणे, टंचाईवर मात
करण्यासाठी कायमस्वरूपी उपायोजना, वाढत्या नागरीकरणाचे आव्हान, शिक्षणाची गुणवत्ता
वाढविणे या मुद्यांवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा