बुधवार, ११ जून, २०१४

झोपडपट्टी पुनर्विकासातील झोपडीधारकांना
आता जास्त मोठी सदनिका मिळणार
-----------
मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई दि.11- झोपडपट्टीधारकांना पुनर्वसनामध्ये आता जास्त मोठी सदनिका मिळणे शक्य होणार आहे.  11 जून 2008 पूर्वी मंजूर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील झोपडपट्टीधारकाला देखील 25 चौरस मीटर सदनिका देण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली असून तसा बदल नियमात करण्यात आला आहे. पूर्वी या सदनिकांचे क्षेत्र 20.90 चौ.मी. (225 चौ.फूट) व अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक 2.5 एवढे होते. आता ते 25 चौ.मी. (270 चौ.फूट) व अनुज्ञेय चटई निर्देशांक 3.0 झाले आहे.
बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीत 11 जून 2008 पूर्वी मंजूर झालेल्या योजनेमध्ये पुनर्वसनाच्या इमारतीचे काम जोत्यापर्यंत (प्लिंथ लेव्हल) पूर्ण झाले नसेल तरच अशी योजना नवीन नियमानुसार रूपांतरित करता येईल अशी तरतूद केली होती.  मात्र, 11 जून 2008 पूर्वी मंजुरी मिळालेल्या व भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या सर्वच इमारतींना हा प्रस्ताव लागू करावा अशी विनंती नागरिकांतर्फे करण्यात आली होती.  परंतु, या तारखेपूर्वीची बांधलेली इमारत पाडून टाकणे शक्य नसल्याने शासनाने आता मंजूर योजनेमध्ये पुनर्वसनाच्या सदनिकेमधील फ्लॉवर बेड, बाल्कनी इत्यादीचा समावेश करून एकूण 25 चौ.मी. जागा देण्याचा देखील निर्णय घेतला.  
-----०----


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा