बुधवार, १९ मार्च, २०१४


आत्महत्त्यांचे पाऊल न उचलण्याचे आवाहन
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी
राज्य सरकार  खंबीरपणे उभे : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 18 : महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अलिकडेच झालेल्या गारपीटीमुळे अगदी हातातोंडाशी आलेले पिक मातीमोल झाल्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र मी राज्यातील सर्व शेतकरी बंधुंना आश्वासित करु इच्छितो की, या संकटाच्या आणि कसोटीच्या प्रसंगी राज्य सरकार खंबीरपणे आपल्या पाठीशी राहील. मी सर्वांना विनंती करु इच्छितो, की भावनेच्या किंवा निराशेच्या भरात कोणीही आपल्या जीवाला धोका देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
        राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेल्या आवाहनात श्री. चव्हाण म्हणतात की, आपणा सर्वांना माहिती आहे की, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि आचार संहिता लागु आहे. मात्र तरीही या नैसर्गिक आपत्तीचे स्वरुप, व्याप्ती आणि तिच्यामुळे झाले प्रचंड नुकसान पाहता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत.
ही आपत्ती ओढवताच लगेचच राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी काही भागांचा दौरा केला. मी स्वत: आणि उप मुख्यमंत्र्यांनीही अनेक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या वेदना जाणुन घेतल्या. मंत्रिमंडळाची औपचारिक बैठक तातडीने घेऊन आम्ही उपाययोजनांबाबत गांभीर्याने विचार केला.
        मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मी नुकतीच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि पाच हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती केली. केंद्रीय निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही राज्यातील नुकसानीची पूर्ण कल्पना दिली. यानंतर पंतप्रधानांनी यासंदर्भात एका उच्चस्तरीय गटाची स्थापना केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील या गटात सर्वश्री सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम, जयराम रमेश, माँटेकसिंग अहलुवालिया यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या पाहणी पथकाने राज्याचा पाहणी दौराही नुकताच पूर्ण केला आहे.
        ही आपत्ती आणि त्यामुळे झालेले नुकसान कल्पनेपलिकडचे आहे. आमची शेतकऱ्यांना पूर्ण सहानुभूती आहे. मात्र ती कोरडी नाही. या संकटातून बळीराजाला पुन्हा एकदा उभा करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. या निमित्त शेतकरी जगला तर राज्य उभे राहील, अशी आमची ठाम धारणा आहे.
        नैसर्गिक आपत्तीच्यावेळी शेतकऱ्यांना मदत देण्याचे जे स्थायी आदेश आहेत, त्यानुसार तात्काळ मदत देण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. आम्ही तुमच्यासोबत राहू, याची मी आपणाला पुन्हा एकदा ग्वाही देतो. नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. लवकरात लवकर मदत पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभे आहोत, सर्वांनी या आपत्तीच्या प्रसंगी धीराने वागावे, ही विनंती  मी आपणा सर्वांना करतो.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा