मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाच्या
संकल्पचित्र आराखड्याला शासनाची मान्यता
स्मारकातून राजर्षिंची सामाजिक बांधिलकी प्रतिबिंबीत व्हावी : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 7:  कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मिलच्या 27 एकर जागेवर उभारावयाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या संकल्पचित्र आराखड्याला आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली. हे स्मारक उभारताना छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक समतेचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या स्मारकाचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि दर्जेदार व्हावे, यासाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापनाही लवकरच केली जाणार आहे, असे ते म्हणाले.
          राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जागेत बांधण्यासंदर्भात सह्याद्री अतिथी गृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस स्मारक बांधण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, सदस्य कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कोल्हापूरच्या महापौर श्रीमती सुनिता अजित राऊत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव . के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी.एस. मीना, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने, कोल्हापूर महानगर पालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जागेत छत्रपती शाहू  महाराजांचे स्मारक बनविण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या संकल्पचित्राचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
          हे स्मारक तयार करताना मिलच्या परिसरातील जुन्या वास्तूंचे संरक्षण होणे महत्वाचे आहे. यासाठी पुरातन वास्तू स्थापत्य तज्ज्ञ नेमावा, या ठिकाणी छायाचित्रांचे प्रदर्शन ठेवण्याची व्यवस्था करावी, या स्मारकातील प्रेक्षागृहामध्ये कोल्हापूरचा इतिहास, संस्कृती या विषयांची माहिती देणारे, तसेच शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याची माहिती देणारे माहितीपट  दाखिवण्याची  व्यवस्था करावीछत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करताना स्थानिक कला, संस्कृती यांची माहिती देण्याबरोबरच छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे याकडे संबंधित यंत्रणेने कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.
          सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात येत आहे. याठिकाणी त्या काळातील शस्त्रसामुग्रीची माहिती मिळावी, यासाठी हत्यारे व शस्त्रास्त्र गॅलरी ठेवण्यात येणार आहे. या मिलच्या परिसरातील कोटितीर्थ तलावाचे सुशोभीकरण करुन त्यात महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. स्मारकामध्ये एक बंदिस्त प्रेक्षागृह, एक खुले प्रेक्षागृह, कोल्हापूरच्या कला, संस्कृतीचे प्रदर्शन घडविणारे कायमस्वरुपी प्रदर्शन, स्मारकास भेट देणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देणारे खाद्यकेंद्र, ग्रंथालय आदी सुविधा असतील.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही स्मारकाबाबत अनेक महत्वाच्या सूचना केल्या. श्री. सतेज पाटील म्हणाले की, महाराजांचे स्मारक पहाण्यासाठी दररोज किमान 10 हजार शाहूप्रेमी व पर्यटक भेट देतील, असे गृहीत धरुन वाहनांचे पार्किंग व अन्य सुविधा तयार कराव्यात. शाहू जन्मस्थळ, अंबाबाई मंदिर, रंकाळा चौपाटी, पन्हाळा, जोतिबा याठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. ही बाब लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन झाले पाहिजे.

          डिझाइन कन्सल्टींगचे  संचालक श्रीकांत अनपट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारकाच्या संकल्पचित्र आराखड्याचे सादरीकरण करुन विविध पैलूंची माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा