ढसाळ यांच्या
निधनाने साहित्यातून दलितांना
आत्मभान देणारा
आक्रमक नेता हरपला : मुख्यमंत्री
मुंबई, दि. १५ : प्रस्थापित पांढरपेशे लेखक आणि रसिक यांना
आपल्या अनोख्या शैलीने हादरा देणारे ज्येष्ठ दलित साहित्यिक आणि ‘दलित पँथर’चे संस्थापक
अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या निधनाने साहित्याच्या व चळवळीच्या माध्यमातून
दलितांना आत्मभान देणारा आक्रमक नेता हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे
की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ढसाळांची नितांत श्रद्धा होती. यामुळे
ते तरुण वयातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. जात्याच प्रतिभावंत असलेल्या ढसाळांनी गद्य,
काव्य, वृत्तपत्रीय स्तंभलेखन अशा विविध माध्यमांमधुन बाबासाहेबांचे क्रांतिकारक विचार
अतिशय ज्वलंत भाषेत लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले. दलितांच्या व्यथा मांडण्यासाठी
साहित्य हेच प्रभावी साधन आहे, हे अचूक ओळखलेल्या ढसाळ यांनी आपल्या साहित्यकृतींमधुन
दलितांच्या वेदनांना वाचा फोडली. गोलपीठा, तुही यत्ता कंची, खेळ, मूर्ख म्हाताऱ्याने
डोंगर हलवले, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे यासारख्या
त्यांच्या आगळ्या शैलीतील काव्यसंग्रहांनी मराठी साहित्यात एकच खळबळ उडवली आणि ते दलित
साहित्यातील बिनीचे शिलेदार बनले.
अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ चळवळीने प्रभावित
होऊन त्यांनी १९७२मध्ये स्थापन केलेल्या ‘दलित पँथर’ संघटनेने महाराष्ट्राचे राजकारण
ढवळून काढले. दलित चळवळीला आक्रमक चेहरा देणाऱ्या या चळवळीने दलितांच्या अनेक प्रश्नांवर
उग्र आंदोलने केली. सर्वसामान्यांसारखे साधेसुधे जीवन जगणारे ढसाळ अखेरपर्यंत ‘दलित
पँथर’शी एकनिष्ठ राहिले. पद्मश्री, राज्य शासनाचे साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमीचा
जीवनगौरव पुरस्कार यांनी गौरवित झालेले ढसाळ यांच्या निधनाने केवळ दलितांचेच नव्हे
तर सामाजिक न्यायाच्या चळवळीचेही नुकसान झाले आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा