रविवार, १२ जानेवारी, २०१४

 ‘कृषि वसंत’  प्रदर्शनामुळे देशातील
 कृषि क्षेत्राला वेगळी दिशा : शरद पवार
            
मुंबई, दि. 12: नागपूर येथे होणाऱ्या ‘कृषि वसंत’ या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या कृषि प्रदर्शनामुळे देशातील कृषि क्षेत्राला वेगळी दिशा मिळणार आहे. कृषि क्षेत्रातील प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकांसह माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार असल्याने नागपूर येथे आयोजित कृषि वसंत या कृषि प्रदर्शनास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांनी आज येथे केले.    
महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्रीय कृषि मंत्रालय (भारत सरकार) आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्यावतीने 9 ते 13 फेब्रुवारी 2014 या काळात नागपूर येथेकृषि वसंत 2014 राष्ट्रीय कृषि महोत्सव / प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मुख्य सचिव जे. एस. सहारिया, केंद्रीय कृषि सचिव आशिष बहुगुणा, सहसचिव संजीव गुप्ता, कॉन्फेडशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (CII) पश्चिम विभागाचे अध्यक्ष व्यवस्थापकिय संचालक आर. मुकुंदन राज्याचे अध्यक्ष निनाद करपे इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री पवार पुढे म्हणाले, देशाने कृषि उत्पादनात आघाडी घेतली आहे. याप्रगती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. कृषि क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्‍या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच बरोबर या प्रदर्शनांचे वैशिष्टे म्हणजे धान्यपिके, डाळी, चारापिके , तेलबिया, भाजीपाला आणि तंतुपिके यांचे 300 हून अधिक प्रात्यक्षिक प्लॉट्स (डेमोप्लॉट्स) याठिकाणी असतील. या माध्यमातून शेतकरी तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना कृषिक्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी उच्च दर्जाचे लागवड साहित्य याठिकाणी उपलब्घ करून देण्यातयेणारआहे. ज्या शेतक-यांना इथे प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशांना वेबकास्टींगद्वारे या प्रदर्शनास भेट देता येणार आहे. कारगिल ते कन्याकुमारी आणि डेहराडून ते राजस्थान पर्यंत सर्व शेतक-यांसाठी उपयुक्त असे हे प्रदर्शन असणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यपश्चात देशाच्या इतिहासात कृषि प्रदर्शनातील महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूरला आयोजित करण्यात येत आहे, असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे प्रदर्शन आयोजि करण्याची संधी  राज्याला दिली, याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या कृषि क्षेत्राच्या प्रगतीसाठी शेतेक-यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्याचे काम या कृषि प्रदर्शनातून होणार आहे. कृषि वसंत2014 प्रदर्शन हे शेतकरी बांधवांना नवनव्या संधी मिळवून देण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.  ज्यामुळे कृषिक्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळून शेतकरी बांधवांना जागतिक कृषि तंत्रज्ञानाची आणि बाजाराची माहिती मिळू शकेल, असेही ते यावेळी म्हणाले.
       यावेळी बोलतांना कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले, कृषि वसंत 2014 प्रदर्शन हा संपूर्ण देशातील आजवरचा सर्वांत मोठा कृषि महोत्सव असणारआहे. या प्रदर्शनात राज्यातील 5 लाख शेतकरी, धोरणकर्ते, कृषिशिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कृषिउद्योजक, गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय कृषि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यासगळ्यांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक असून या प्रदर्शनाच्या सफलतेसाठी कृषि विभागातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
अत्यंत मोठ्या प्रमाणात आयोजित या प्रदर्शनासाठी राज्यातील यंत्रणा कामाला लागली असून शेतकऱ्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षेची, आरोग्याची, स्वच्छतेची सर्व व्यवस्था चोख राहणार आहे तरी या प्रदर्शनात लोकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे मुख्य सचिव जे. एस सहारिया यांनी सांगितले.
प्रत्यक्ष प्रदर्शनात कोणत्या बाबींचा समावेश असेल याबद्दलची माहिती केंद्रीय कृषि विभागाचे सहसचिव संजीव गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे यावेळी दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना निनाद करपे यांनी केली तर आभार प्रदर्शन डॉ. सुधिर कुमार गोयल यांनी केले.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (CII)  या उपक्रमासाठी धोरणात्मक सहकार्य लाभणार आहे. नागपूर येथील केंद्रीय मध्यवर्ती कापूस संशोधन संस्थेच्या (सीआयसीआर) परिसरात हे प्रदर्शन होईल. स्व. वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेतेही मानले जाते. त्यांच्या स्मृतीला हा कृषि महोत्सव समर्पितअसणार आहे.
        कृषिवसंत 2014 ची ठळक वैशिष्ट्ये...
-       पीक प्रात्यक्षिके
-       भव्य कृषिप्रदर्शन
-       किसानसभा आणि शेतकऱ्यांसोबत परस्परसंवादात्मक कार्यक्रम
-       कृषि पुरस्कार
-       निरनिराळी कृषिपुरक संमेलने
-       आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीमंडळांचा सहभाग
या कृषि प्रदर्शनात खालील चार महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र-परिसंवाद होणार आहेत.
ते विषयअसे...
1) यांत्रिकीकरण आणि उच्चतंत्रज्ञानावरआधारित फलोत्पादन (हॉर्टिकल्चर),
2) डाळी आणि तेलबिया उत्पादनातील स्वयंपूर्णता,
3) काढणीपश्चात व्यवस्थापन आणि मार्केटिंग,
4) दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनातून शाश्व जीवन.
0 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा