मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३


भारतीय महिला बँकेच्या स्थापनेने केंद्र सरकारच्या
महिला सक्षमीकरण ध्येयाची पूर्तता - पंतप्रधान
          मुंबई, दि. 19 : भारतीय महिला बँकेची स्थापना ही केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरणाबाबतच्या ध्येयाची पूर्तता असल्याची भावना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज मुंबईत देशातील पहिल्या महिला राष्ट्रीय बँकेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.
            संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी,राज्यपाल के.शंकरनारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, वित्तमंत्री पी. चिदंबरम्, नवीन व नवीनिकरण ऊर्जा मंत्री डॉ.फारुख अब्दुला,अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, वित्त राज्यमंत्री जे.डी. शिलम यावेळी उपस्थित होते.
            महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असताना केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महिलांना रोजगाराची हमी, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी जननी सुरक्षा योजना तसेच महिला सबलीकरणाची ' सबला ' योजना अंमलात आणण्याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत असे सांगून पंतप्रधान म्हणाले, महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी व सक्षम करण्याच्या दृष्टीने संपूर्ण महिलांसाठीच्या बँकेची स्थापना करुन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने एक गौरवास्पद पाऊल उचलले आहे.
            देशातील महिलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबध्द असून महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात कडक कायदे अंमलात आणणे, तसेच स्त्री-पुरुष समानतेबाबत जनप्रबोधन करणे यांसारख्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, यासोबतच महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची जबाबदारी महिला बँकेसारख्या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
            केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्पीय भाषणात महिला बँक स्थापन करण्याबाबत केलेल्या घोषणेची पूर्तता अवघ्या 6 महिन्यात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महिलांनी, महिलांसाठी व महिलांद्वारा चालविण्यात येणाऱ्या या बँकेच्या संचालक मंडळावर सर्वच्या सर्व 8 महिला संचालकांची नेमणूक आज करण्यात आल्याची माहिती देऊन, ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच देशात तसेच परदेशातही बँकेच्या शाखांचा विस्तार होणार असून इतर कोणत्याही बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व ग्राहक सेवा-सुविधा या बँकेकडूनही पुरविण्यात येतील, असेही श्री.चिदंबरम म्हणाले.
            पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी या बँकेची स्थापना देशाच्या आर्थिक राजधानीत होणे, ही अत्यंत गौरवाची बाब आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, स्व. इंदिरा गांधी यांच्यापासून ते आजच्या नेतृत्वापर्यंत सर्वच नेतृत्वांनी महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33 % आरक्षण लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्राने तर हे आरक्षण 50 टक्क्यांपर्यंत वाढवून प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.  
                                                                                   
            मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अन्न सुरक्षा कायदा, बालस्वास्थ्य कार्यक्रम, शिक्षणाचा  हक्क कायदा, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, आदिवासींसाठीच्या योजना, सुकन्या व अलीकडेच घोषित करण्यात आलेली मनोधैर्य योजना व प्रस्तावित बाल धोरण या साऱ्यांमधून महिलांच्या सबलीकरणासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्य शासन करीत आहे. महिलांच्या सर्वसमावेशक, सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी महिला बँक निश्चितच सहाय्यभूत ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
         स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनी पहिल्या महिला बँकेची झालेली स्थापना,  हे त्यांना उचित अभिवादन असून त्यांच्या धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी ध्येय- धोरणांशी सुसंगत पाऊल असल्याची भावना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. देशातील नागरिकांना देण्यात आलेल्या आधार ओळखपत्रामुळे सरकारी योजनेचा लाभ लाभार्थाच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार असून त्यामुळे प्रशासनात अधिक पारदर्शकता व भ्रष्टाचार रोखण्यास मदत होणार आहे. महिला बँक याकामी निश्चितच सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास श्रीमती गांधी यांनी व्यक्त केला. ही बँक महिलांसाठी असल्याची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
            बँकेच्या पहिल्या पाच महिला ग्राहकांना बँकेचे पासबुक व अन्य सुविधांचे कागदपत्र पंतप्रधानाच्या हस्ते तर पाच पहिल्या महिलांना कर्जमंजुरी पत्र श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बँकेच्या पहिल्या संचालक श्रीमती उषा अनंतसुब्रमण्यम् यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर वित्त समितीचे राजीव टप्पू यांनी आभार मानले. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन, स्टेट बँकेच्या संचालक श्रीमती अंरुधती भट्टाचार्य, वरिष्ठ अधिकारी तसेच  बँकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

·        सर्व स्तरातील तसेच सर्व वर्गातील महिलांसाठी बँकेची सेवा.
·        नोकरदार, गृहिणी, महिला बचत गट यांना विविध प्रकारची कर्जे.
·        मुंबई, कलकत्ता, गोहाटी, चेन्नई, बंगलोर, जयपूर, लखनऊ, म्हैसूर या नऊ शाखा आजपासून कार्यरत तर 31 मार्च 2014 पर्यंत 25  शाखांची स्थापना.
·        सार्वजनिक उपक्रमांतर्गत बँकांमधून 225 महिला या बँकेत नियुक्त केल्या जातील.
·        पहिल्या वर्षाच्या अखेरीस बँकेच्या 39 शाखांची स्थापना, 127 एटीएम कार्यरत.
·        पहिल्या वर्षाच्या अखेरीस 33,299 ग्राहकांची नोंद अपेक्षित. सातव्या वर्षाच्या अखेरीस बँकेचे सुमारे 55 लाख ग्राहक नोंदविले जाण्याची अपेक्षा.

0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा