जैविक किंवा आण्विक हल्ल्यांची शक्यता गृहीत
धरुन पोलीस दल सक्षम बनविणार -
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 19 : भविष्यात
अतिरेकी हल्ल्यांचे स्वरुप बदलण्याची शक्यता आहे. जैविक, आण्विक अस्त्रे किंवा किरणोत्सर्गी
उपकरणे वापरुन हल्ले होण्याची शक्यता गृहीत धरुन त्यांचा प्रतिकार करण्याचे
तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वेळ आली आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पोलीस दल
अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी आज केले.
महाराष्ट्र
पोलीस आणि ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट यांनी आयोजित केलेल्या तिसऱ्या
'नॅशनल सेमिनार ऑन काऊण्टर
टेररीझम' या दिवसभराच्या
कार्यशाळेचे उद्घाटन श्री. चव्हाण यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री
आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर. के.
सिन्हा, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च ॲण्ड डेव्हलमेंटचे
महासंचालक राजन गुप्ता, मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह तसेच वरिष्ठ पोलीस
अधिकारी उपस्थित होते.
पोलीस
दलाच्या सतर्कतेमुळे अतिरेकी कारवाया वेळेआधीच रोखण्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात
यश आलेले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवायांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलीस
दल सक्षम आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले. जीपीएस व जीआयएस तंत्रामुळे नकाशे व फोटो
तात्काळ उपलब्ध होण्याची सोय झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन अशा
कारवायांना वेळीच रोखण्यासाठी पोलीस दलामध्ये आवश्यक तांत्रिक क्षमता असणे आवश्यक
आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, उच्च प्रतीची अत्याधुनिक हत्यारे तसेच ती
हाताळण्याचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येत आहे. अतिरेकी कारवायांदरम्यान बंधक
म्हणून ठेवण्यात आलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी विशेष प्रशिक्षण
देण्यात येत आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर
अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी विशेष दल फोर्स वनचे गठन केले आहे. हे दल
यशस्वीरित्या आपले कार्य करीत आहे. `अर्बन काऊण्टर टेररीझम ट्रेंनिग सेंटर` गोरेगाव येथे लवकरच चालू
करण्यात येणार आहे. या सेंटरसाठी 98 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सेंटरमध्ये फोर्स वन, क्यूआरटी, अेटीएस
स्टाफ यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अतिरेकी
हल्ल्यांची ही समस्या फक्त भारतासाठी मर्यादित नाही तर जागतिक स्तरावर विकसित व
विकसनशील देश या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अलिकडेच केनिया येथे
अतिरेकी हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांना व लहान मुलांना अतिरेक्यांनी आपले लक्ष
बनविले होते. या हल्ल्याचा बोध घेऊन पोलीस दलाने सतर्क रहाणे अत्यावश्यक आहे, असेही
ते म्हणाले.
गृहमंत्री
गृहमंत्री आर.आर. पाटील पोलीस दलाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना म्हणाले,
अनेक अतिरेकी कारवाया या पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे वेळीच थांबविण्यात आल्या.
पोलीस दलाची कार्यपध्दती ही जागतिक दर्जाची असून कोणत्याही संकटांशी सामना करण्यास
सक्षम आहे.
दिवसभर
चाललेल्या या कार्यशाळेत अतिरेकी हल्ले व ते रोखण्यासंदर्भात विचारमंथन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा