बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

   राज्यातील विविध पायाभूत प्रकल्प लवकरच मार्गी लागणार: मुख्यमंत्री
    मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्ठमंडळाने पंतप्रधानांसह विविध मंत्र्याच्या घेतल्या भेटी
नवी दिल्ली,13 नोव्हेंबर : राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय शिष्ठमंडळाने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी 7 रेसकोर्सला भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती प्राप्त होणार असल्याचा विश्वास दर्शवला.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय वित्तमंत्री पी.चिदंबरम आणि योजना आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मॉन्टेकसिंह अहलूवालिया उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिष्ठमंडळाने सकाळी 11.30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दीड तास चाललेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजीत पवार, मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांचा शिष्ठमंडळामध्ये समावेश होता. या भेटीत नवीन मुंबई विमानतळ, पुणे जिल्हयातील चाकण येथील विमानतळाबाबत पायाभूत सुविधा, मुंबईतील चर्चगेट ते विरार या उपनगरीय एलीवेटेड रेल्वे कॉरिडॉर, मुंबई ट्रांस हार्बर लींक (एमटीएचएल),डॉपलर रडार यंत्रणा, मेट्रो कॉरिडॉरच्या तीसर्‍या टप्यास चालना देण्याबाबत तसेच नवी मुबंई भागातील मीठागरांबाबत अध्यादेशातील सुधारणा शिथील करण्यासंदर्भात चर्चा झाली.  
         प्रकल्पग्रस्तांसाठी नवी मुंबई विमानतळाच्या एकूण 22.5 टक्के जमिनीवर सरासरी 2 चटई क्षेत्र निर्देशांक देण्यासह अन्य महत्वाचे निर्णय नुकतेच राज्यसरकारने घेतले आहेत. ही सर्व जमीन अत्याधुनिक सुविधायुक्त बनविणे व ती प्रस्तावित विमानतळानज आणि व्यावहारिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी पुष्पकनगर या नावाने वसविण्यात येत आहे. हा प्रस्ताव मान्य नसणार्‍या प्रकल्पबाधितांना केंद्राच्या जमीन अधिग्रहणाच्या नवीन कायद्यानुसार मोबदला घेण्याची मुभा राहणार आहे. या सर्व कामांना गती देण्याबाबत आवश्यक त्या विविध मंत्रालयांची मंजूरी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत पंतप्रधानांना विनंती केली.  
प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न गेल्या 8-10 वर्षांपासून प्रलंबित होता. आता हा प्रश्न मार्गी लागल्याने हे विमानतळ तयार झाल्यावर दरवर्षी सुमारे 10 कोटी हवाई प्रवाशांची सोय होणार असून देशातील महानगर शहरांमधील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ ठरणार आहे.
राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने सुरु आहेत. मुंबईतील चर्चगेट ते विरार या उपनगरीय एलीवेटेड रेल्वे कॉरिडॉरसाठी आखून देण्यात आलेल्या जानेवारी 2014  या काल मर्यादेत काम पूर्ण होण्याबाबत आवश्यक मंजूरी व निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्याबातची विनंती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट आदींना जोडणारा मुंबई ते नाव्हा शेवा दरम्यान 9 हजार 630 कोटी रुपये खर्चातून 22 कि.मि अंतराचा तयार होत असलेल्या मुंबई ट्रांस हार्बर लींक (एमटीएचएल)च्या प्रगतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. या प्रकल्पासाठी केंद्राकडून 90 टक्के आर्थिक मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री के.एस.राव, केंद्रीय जहाज बांधणी व वाहतूक मंत्री जी.के.वासन यांच्या भेटी घेतल्या. तसेच येथील वूमेन प्रेस क्लब तर्फे आयोजीत मीट द प्रेसकार्यक्रमात त्यांनी महिला पत्रकारांशी संवाद साधला.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा