मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

 पाण्याच्या समन्यायी वाटपाबाबत ठोस निर्णय घेणार - मुख्यमंत्री
            औरंगाबाद,दि. 17 --- राज्यात यंदा समाधानकारक पावसामुळे विविध प्रकल्पातील पाणीसाठयात वाढ झाली आहे. या पार्श्वभुमीवर पाण्याच्या समन्यायी  वाटपाबाबत आणि योग्य वापराबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी आज औरंगाबाद येथे सांगितले.
            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त येथील महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ  मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री चव्हाण तसेच अन्य मान्यवरांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले.  यावेळी दोन मिनीटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आलीपोलीस दलाच्या वतीने तीन वेळा हवेत बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आलीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधीअधिकारी -पदाधिकारी  आदिंची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
             यावेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात,शालेय  शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार एम.एम.शेख, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाठ,आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयताई चिकटगावकर, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार,  पोलीस आयुक्त संजयकुमार, पोलिस अधिक्षक ईशु सिंधु, जिल्हाधिकारी विक्रमकुमार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे,   यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाडा मुक्तीलढा हा महत्त्वपूर्ण आणि अधिक खडतर होता. मराठवाडयातील  साहसी जनता या लढयामध्ये जात -पात,धर्मभेद विसरुन सहभागी झाली. स्वामी रामानंद तीर्थ  यांच्या नेतृत्वाखाली  या लढयाला जनआंदोलनाचे रुप मिळाले.
            ते पुढे म्हणाले, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात मराठवाडयाने आपले वेगळेपण सिध्द केले आहे. सर्वच क्षेत्रात मराठवाडयाने मोठी झेप घेतली आहे. विकासाची मोठी क्षमता मराठवाडा विभागात आहे. आपले हक्क व कर्तव्याबाबत येथील जनता जागरुक आहे. औद्योगिक मागसलेपणाचे मोठे आव्हान आहे.  यासंदर्भात विजय केळकर समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.
            दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, (डिएमआयसी) तसेच नवे औद्योगिक व वस्त्रोद्योग धोरण यामुळे मराठवाडयाचे चित्र बदलणार आहे. डिएमआयसी अंतर्गत कौशल्य विकास संस्थेची उभारणी करण्यात येत असून या माध्यमांतून स्थानिकांमधुनच उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात येणार आहे. मराठवाडयात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोठया प्रमाणावर असून याद्वारेही कुशल मनुष्यबळाची निर्मिती शक्य आहे.  राज्यातही उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. 
  राज्यात धरणातील पाणीसाठयाबाबत मागील वर्षापेक्षा समाधानकारक स्थिती आहे. कोरडवाहू शेती शाश्वत करणे तसेच टंचाई स्थितीच्या कायमस्वरुपी निवारणासाठी पुढील तीन वर्षात विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत असून विकेंद्रीत पाणीसाठयावर भर देण्यात येईल. कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, सिमेंट साखळी बंधारे, प्रकल्पातील गाळ काढणे यासारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
            टंचाईस्थितीच्या काळात मराठवाडयात विविध प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे मोठे काम झाले असून हे निश्चितच कौतुकास्पद आहे. टंचाई निवारणाच्या शासनाच्या विविध प्रयत्नांत जनतेनेही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी यावेळी केले.
            मराठवाड्यासारख्या भागांच्या विकासासाठी प्रयत्नांमध्ये  कसूर केली जाणार नाही अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली. विधी विद्यापीठ स्थापनेच्या निर्णयाचा त्यांनी उल्लेख केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आणखी सक्षम केले जाईल असे ते म्हणाले.
            स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा उल्लेख करुन त्यांनी या लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या लढ्यातील सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्मांना मुख्यमंत्र्यांनी  आदरांजली वाहिली.
---000--
औरंगाबादेत स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारणार
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा
            औरंगाबाद दि.17 : हैद्राबाद  मुक्तीसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचा औरंगाबाद शहरात पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. मुक्तीसंग्राम दिनानिमित्त  येथील पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्री चव्हाण यांनी मराठवाडा विभागातील स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय, स्वातंत्र्यसैनिक संघटनांचे पदाधिकारी तसेच स्वातंत्र्यसैनिक उत्ताराधिकारी संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार एम.एम.शेख, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, ॲड. काशिनाथ नावंदर, ना.वि.देशपांडे आदि उपस्थित होते.
          यावेळी  स्वातंत्र्यसैनिकांनी तसेच त्यांच्या पाल्यांनी  विविध समस्या मांडल्या व यासंदर्भात निवेदनही सादर केले.स्वातंत्र्यसैनिकांच्या मानधनातील / सन्मान वेतनातील तफावत दुर करावी, वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मिळण्यासाठीची प्रकिया अधिक सुलभ करावी, पाल्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण द्यावे, गृहनिर्माण संस्थांसाठी   जागा देण्यात याव्यात आदि मागंण्याचा निवेदनात समावेश होता.
          यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी औरंगाबादेत स्वामी रामानंद तीर्थ यांचा  पुतळा उभारला जाणे आवश्यक असुन आपण याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमुन असे जाहीर केले. ही समिती पुतळयाची जागा आणि अनुषंगिक बाबी संदर्भात निर्णय  घेईल. या पुतळयाची उभारणी शासकीय तरतुदीतुन अथवा गरज पडलीतर मुख्यमंत्री निधीतुन केली जाईल, असेही ते म्हणाले.
          स्वातंत्र्यसैनिकांच्या विविध प्रश्नाबाबत यापुर्वी राज्यमंत्री स्तरावर एक बैठक झाली असून आता आपण लवकरच मुंबईत बैठक आयोजित करुन प्रश्न मार्गी लावू. राज्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांची केंद्रीकृत यादी तयार केली जात आहे. त्यांच्या प्रश्नाबाबत सरकारचा दृष्टीकोण सकारात्मक आहे. असेही त्यांनी सांगितले. औरंगाबादसह विविध जिल्हयातील हुतात्मास्मारकांच्या देखभाली व दुरुस्ती संदर्भात निर्णय घेतला जाईल असे नमुद करुन देखभाली संदर्भात कायमस्वरुपी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले . हे काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केले जाण्याची शक्यता त्यांनी सुचित केली.
          यावेळी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्वागत केले.
                                                ---000---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा