मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

मजबूत अर्थव्यवस्थेसाठी पर्यटन व्यवसायाचा
विकास आवश्यक- मुख्यमंत्री चव्हाण
            औरंगाबाद, दि.16 --  रोजगार उपलब्ध करुन देण्याची क्षमता आणि परकीय चलन कमावण्याची संधी या दोन दृष्टीकोनातून पर्यटन उद्योगाला महत्व आहे. या उद्योगाचे हे महत्व लक्षात घेऊन त्याचा विकास करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी आज येथे केले.
            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या सहकार्याने उभारलेल्या अजिंठा आणि वेरुळ येथील भव्य अभ्यागत केंद्रांचे उदघाटन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. के चिरंजीवी यांच्याहस्ते आज अनुक्रमे अजिंठा आणि वेरुळ येथे झाले. या निमित्ताने सायंकाळी औरंगाबाद येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी  वरील प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ,  औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, आमदार अब्दूल सत्तार, आमदार सुभाष झांबड, आमदास संजय वाघचौरे, जपानचे कान्सिल जनरल  किओशी असाको, जपान इंटरनॅशनल एजन्सीचे  तोमोहिदो इचीगुची, केंद्रीय पर्यटन विभागातील सहसचिव आनंदकुमार, राज्य शासनाचे  पर्यटन विभागचे प्रधान सचिव सुमित मलिक, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल तसेच दक्षिण कोरिया आणि थायलंडचे महावाणिज्यदूत आदी उपस्थित होते.
            आपल्या भाषणात मुख्यमंत्री चव्हाण यांनी पर्यटनाचे महत्व विशद करताना  या व्यवसायाच्या राज्यातील क्षमताही स्पष्ट केल्या. ते म्हणाले की,  कोकणचा सागरी किनारा, राज्यभरातील विविध लेण्या , विदर्भातील विविध अभयारण्ये यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आकर्षित होऊ शकतात. त्यासाठी पयर्टकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आणि त्याचबरोबर राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती विविध माध्यमातून प्रभावीपणे दिली जाणे गरजेचे आहे. याबाबींवर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. पर्यटन ही अनुभवण्याची बाब आहे. आपल्याला आलेले अनुभव पर्यटक इतरांना सांगत असतात. त्यातून पर्यटन स्थळांची माहिती अनेकांना मिळत जाते. पर्यटकांना येणारा अनुभव चांगला असणे गरजेचे आहे. जगभर पर्यटन उद्योग हा रोजगार देणारा सर्वात मोठा उद्योग म्हणून पाहिला जातो. परदेशी पर्यटकांकडून परकीय चलनही मिळत असते. रोजगाराची उपलब्धता आणि परकीय चलनाची प्राप्ती या दोन्ही गोष्टी अर्थव्यवस्थेच्या दृष्टी महत्वाच्या आहेत.  पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि यासंदर्भात तक्रार आल्यावर अजिबात गय करु नका अशी सूचना आपण दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
            अजिंठा आणि वेरुळ हा केवळ राज्याचा नव्हे तर  संपूर्ण मानवतेचा वारसा आहे असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व अनुषंगिक बाबी करता जपानने दिलेल्या अर्थसहाय्याबद्दल आभार मानले. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पर्यटनासाठी विविध योजना मंजूर केल्या असून औरंगाबाद मेगासर्कीटच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तसेच सोलापूर-पंढरपूर-अक्क्लकोट-तुळजापूर या  पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी केंद्राने योजना मंजूर केल्याचीही  सांगितले.अजिंठा आणि वेरुळ येथील आज कायान्वित करण्यात आलेली अभ्यागत केंद्रे सर्व दृष्टी सुसज्ज असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
            यावेळी उदघाटनपर भाषणात केंद्रीय मंत्री डॉ. चिरंजीवी यांनी महाराष्ट्राने पर्यटनासाठी उपलब्ध करुन दिलेला पैसा योग्य पद्धतीने वापरला आहे, त्यामुळेच नव्या योजनांसाठी पैसा देणे शक्य होत आहे असे सांगितले. अजिंठा आणि वेरुळ येथील अभ्यागत केंद्रे ही देशातील अशा तऱ्हेची पहिलीच  निर्मिती असल्याचे  सांगून त्यांनी या अभ्यागत केंद्राचा पर्यटकांना उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला. औरंगाबाद पर्यटन क्षेत्राच्या विकास योजनेतील दुसऱ्या टप्प्यासाठी 25 कोटी रुपये उपलबध करुन देण्यात आपल्याला आनंद वाटेल असे ते म्हणाले.
            पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी  अजिंठा-वेरुळ येथील  लेण्यांना जगात तोड नाही असे सांगून तेथे अभ्यागत केंद्रे उभारण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या केंद्रांचा आवाका मोठा आहे.  तेथे जाणाऱ्या पर्यटकांना लेण्यांचे महत्व आणि इतिहास समजावून घेणे आता अधिक सुलभ होईल व पर्यटकांचे आकर्षण वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जपानच्या सहकार्याने होत असेल्या अजिंठा-वेरुळ विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पाही आता संपत आला असून तिसरा कार्यान्वित व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
            यावेळी श्री असाको यांचेही भाषण झाले. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक तर सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी आभार मानले.
                                               


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा