मंगळवार, ३० जुलै, २०१३

वाघांचे संरक्षण आणि वन पर्यटनाचा
समतोल राखण्याचे आव्हान -मुख्यमंत्री
       मुंबई, दि. 30 : वाघांच्या संरक्षणाला प्राधान्य देत असतानाच वन पर्यटनालाही चालना मिळणे गरजेचे आहे आणि यातील समतोल सांभाळण्यासाठी  वन पर्यटनाचे अति व्यापारीकरण रोखण्याचे आव्हान आपणासमोर आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले.
            जागतिक वाघ दिनानिमित्त (ग्लोबल टायगर डे) सह्याद्री अतिथीगृह येथे वाघ वाचवा मोहिमेचा कार्यक्रम राज्याचा वन विभाग आणि सँक्च्युअरी एशिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास वन मंत्री डॉ. पतंगराव कदम, वन्य जीव व्यवस्थापनाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक  एफ.डब्ल्यू.एच. नक्वी, प्रधान सचिव प्रविण परदेशी आणि सँक्च्युअरी एशियाचे संपादक बिट्टू सैगल, ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी तसेच ' वाघ वाचवा ' मोहिमेतील सक्रीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील अभयारण्याच्या क्षेत्रात वाढ झाली असून वाघांची संख्याही वाढली आहे. तथापि आंतरराष्ट्रीय टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्या असून वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे स्थानिक लोकांच्या सहभागाने अनेक उपाय योजना अंमलात आणण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यातील वाघांच्या शिकारीचे प्रकरण केंद्रिय गुप्तचर विभागाकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
            जागतिक वाघ दिनानिमित्त 'वाघ वाचवा मोहिमेचा' भाग म्हणून जप्त करण्यात आलेल्या वाघांच्या कातडीचे प्रतिकात्मक दहन वन मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, वाघांची शिकार रोखण्यासाठी आम्ही 'बघताक्षणी गोळी घाला' असे आदेश दिले आहेत. यामुळे वाघांच्या शिकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. ताडोबा अभयारण्यास भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली असून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य राज्य शासनाने निर्धारित केल्यामुळे राज्यातील वनाच्छादित क्षेत्रातही वाढ झाली आहे. स्थानिक लोकांच्या सहभागाने वनांचे संरक्षण करण्यात येत आहे.
000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा